Hindenburg Case : हिंडेनबर्ग प्रकरणात एका फर्मने दिलेल्या अहवालाला जास्त महत्त्व देण्यात आले. या प्रकरणात एका औद्योगिक समूहाला लक्ष्य करण्यात आल्याचे दिसत आहे. पण, जेपीसीमध्ये म्हणजेच संयुक्त संसदीय समितीमध्ये सत्ताधारी पक्षाचे बहुमत आहे, त्यामुळे सत्य बाहेर येऊ शकत नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीतून सत्य बाहेर येण्याची शक्यता जास्त आहे, असे मत एनडीटिव्हीने घेतलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
मागील सहा दशकांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार भारतीय राजकारणात सक्रिय आहेत.लोकशाहीशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यांची मतं स्पष्ट आहेत. याच अनुषंगाने एनडीटिव्हीने त्यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.
देशातील विरोधी पक्षांनी जेपीसीची मागणी केली होती. त्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, जेपीसी नियुक्त करून प्रकरण सुटणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या समितीतून सत्य देशासमोर येईल.या प्रकरणात जेपीसी आवश्यक नाही, ते महत्त्वाचे नाही.आम्ही राजकारणात प्रवेश केला तेव्हा सरकारवर हल्ला करण्यासाठी टाटा-बिर्ला यांच्यावर हल्ला करायचो.या देशात टाटांचे योगदान किती आहे हे नंतर कळले.आजकाल टाटा बिर्ला ऐवजी अदानी, अंबानींवर हल्ले होत आहेत.अदानी यांनी ऊर्जा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
विरोधकांनी एका फर्मने दिलेल्या अहवालाला अधिक महत्त्व दिले आहे.या फर्मची पार्श्वभूमी कोणाला माहित नाही, त्यांचे नावही आम्ही ऐकलेले नाही.याप्रकरणी एका औद्योगिक समूहाला लक्ष्य करण्यात आल्याचे दिसत आहे, असे शरद पवार यावेळी म्हणाले.