Download App

Hindenburg Report : हिंडेनबर्ग रिसर्च ते अदानी ग्रुपला धक्का : संपूर्ण प्रकरण समजून घ्या

  • Written By: Last Updated:

मागच्या आठवड्यातील देशात सर्वाधिक चर्चा झाली ती अदानी ग्रुपची (Adani Group). अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च (Hindenburg Report) या संस्थेने अदानी ग्रुपववर एक रिपोर्ट पब्लिश केला आणि जगभरात त्याची चर्चा झाली.  त्या एका रिपोर्टमुळे अदानी ग्रुप आणि गौतम अदानी यांना प्रचंड मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. अदानी ग्रुपला बसलेला हा फटका भारतीय शेअर बाजारालाही बसला त्यामुळे शेअर बाजारात प्रचंड मोठ्या प्रमाणात घसरण झाली.

हिंडेनबर्ग रिसर्चच्या या रिपोर्टमध्ये नक्की काय होत ? त्याचा काय परिणाम झाला ? आणि हा रिपोर्ट पब्लिश करणारी हिंडेनबर्ग रिसर्च संस्था काय आहे याचा सविस्तर आढावा यातून घेवू.

हिंडेनबर्ग रिपोर्ट काय आहे ?

हिंडेनबर्ग रिसर्चने रिपोर्ट पब्लिश केल्यानंतर दावा केला आहे की दोन वर्षांच्या तपासानंतर अदानी ग्रूपचा रिपोर्ट जारी केला आहे. हजारो कागदपत्रांची तपासणी करुन आणि अनेक देशांतील अदानी समूहाच्या कार्यालयांना भेटी देवून हा रिपोर्ट तयार केला आहे.

हिंडेनबर्ग रिसर्चचे आरोप काय?

1. अदानी ग्रुप अनेक दशकांपासून स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंग फ्रॉड करत आहे.

2. अदानी ग्रुपचच्या कंपन्यांचे शेअर्स विनाकारण महाग आहेत. प्रत्यक्षात त्याची किंमत खूपच कमी आहे. हिंडेनबर्गचा दावा आहे की जर सत्य बाहेर आले तर शेअर्सची किंमत 85 टक्क्यांपर्यंत घसरू शकते.

3. शेअर बाजारात लिस्ट असलेल्या महत्त्वाच्या कंपन्यांवर बरेच कर्ज आहे. शेअर्स गहाण ठेवून कर्ज घेतले आहे, ज्यामुळे संपूर्ण समूहाची आर्थिक स्थिती अडचणीत येऊ शकते.

4. अदानी ग्रुपची सरकारी पातळीवर चौकशी झाली आहे. त्यात मनी लाँड्रिंग, टॅक्स चोरी याचा समावेश आहे. याचा आकडा सुमारे 17 अब्ज डॉलर्स इतका आहे.

5. हिंडेनबर्गचा दावा आहे की अदानी कुटुंबातील सदस्यांनी कथितपणे मॉरिशस, यूएई आणि कॅरिबियन बेटांसारख्या टॅक्स हेव्हन्समध्ये ऑफशोअर शेल कंपन्यांची स्थापना केली आहे. ज्यामधून मनी लाँड्रिंग केली जातेय.

6. अहवालानुसार, 2004-05 मध्ये महसूल गुप्तचर संचालनालय म्हणजेच DRI ने गौतम अदानी यांचा लहान भाऊ राजेश अदानी याला हिऱ्यांच्या व्यापारात हेराफेरीचा आरोप केला होता. राजेश अदानी यांना बनावटगिरी आणि कर फसवणुकीच्या वेगवेगळ्या प्रकरणात किमान दोनदा अटक करण्यात आली आहे. नंतर त्यांना अदानी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक बनवण्यात आले.

7. रिसर्च फर्मनुसार, गौतम अदानी यांचा मेहुणा समीर व्होरा याच हिरे व्यापार घोटाळ्याचा मास्टरमाईंड आणि वारंवार खोटी विधाने केल्याचा DRI ने आरोप केला होता. नंतर त्यांना अदानी ऑस्ट्रेलिया विभागाचे कार्यकारी संचालक म्हणून बढती देण्यात आली.

8. संशोधनानुसार, अनेक विदेशी शेल कंपन्या अदानी समूहाच्या सर्वात मोठ्या सार्वजनिक भागधारक (नॉन-प्रमोटर्स) आहेत. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) च्या नियमांची योग्य अंमलबजावणी झाल्यास या कंपन्यांना शेअर बाजारातून डीलिस्ट करावे लागेल.

अदानी ग्रुपच्या लिस्टेट कंपन्या कोणत्या?

अदानी पोर्ट्स

अदानी टोटल गॅस

अदानी एंटरप्रायझेस

अदानी ट्रांसमिशन

अदानी पॉवर

अदानी विल्मर

अदानी ग्रीन एनर्जी

हिंडेनबर्ग रिसर्च नक्की काय आहे ?

हिंडेनबर्ग रिसर्च या कंपनीची स्थापना 2017 मध्ये नॅथन अँडरसन यांनी केली होती. कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार हिंडनबर्ग रिसर्च ही आर्थिक संशोधन संस्था आहे जी इक्विटी, क्रेडिट आणि डेरिव्हेटिव्ह्जचे विश्लेषण करते. त्यात त्यांचा मुख्य उद्देश हा मानवनिर्मित आपत्ती आणि आर्थिक अनियमितता तपासणे हा आहे.

हिंडेनबर्ग रिसर्चचे संस्थापक कोण ? 

हिंडेनबर्ग रिसर्च कंपनीची स्थापना नॅथन अँडरसन यांनी केली असून अँडरसन हे इंटरनॅशनल बिझनेसमध्ये पदवीधर झालेत. अँडरसन यांनी आपल्या रिसर्च करिअरची सुरुवात FactSet Research Systems Inc. या डेटा कंपनीमधून केली. त्यापुर्वी ते इस्रायलमध्ये अॅम्ब्युलन्स चालवत होते.

हिंडेनबर्ग रिसर्चचा आजवरचा इतिहास

हिंडेनबर्ग रिसर्च कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार हिंडेनबर्ग रिसर्च कंपनीने एखादया कंपनीवर रिसर्च प्रकाशित केल्यानंतर पुढील कारवाईपूर्वीच अनेक कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार हिंडनबर्गने 2020 पासून 30 कंपन्यांवर रिसर्च प्रकाशित केले आहेत आणि अहवाल प्रकाशित केल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्या सर्व कंपनीचे शेअर्स सरासरी 15% नी घसरले आहेत.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार या सर्व कंपन्याचे पुढील सहा महिन्यांत सरासरी 26 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. याच गणितानुसार विचार केला तर अदानी ग्रुपचे रिपोर्ट पब्लिश झाल्यानंतर दोनच ट्रेडिंग दिवसामध्ये अदानी ग्रुपचे शेअर्स सरासरी 25% पेक्षा जास्त घसरले आहेत.

अदानी ग्रुपने काय दिलंय स्पष्टीकरण?

हिंडेनबर्गचा रिपोर्ट पब्लिश झाल्यानंतर अदानी ग्रूपकडून त्यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की हा रिपोर्ट दिशाभूल करणारा असून त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत. अदानी ग्रुपची प्रतिमा खराब करण्यासाठी कोणत्याही संशोधनाशिवाय हा रिपोर्ट तयार करण्यात आलेला आहे. अदानी एंटरप्रायझेस च्या FPO ला नुकसान पोहोचवण्यासाठी हा प्रयत्न असल्याचा दावा अदानी ग्रुपकडून करण्यात आला आहे.

अदानी ग्रुपवर 3 मोठे परिणाम

अदानी यांची संपत्ती $96.6 अब्ज म्हणजे 7.88 लाख कोटी रुपये इतकी कमी झाली आहे.

अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडची रु. 20,000 कोटी फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (FPO) शुक्रवारी ओपन झाली. ज्याची प्राइस बँड 3 हजार 112 रुपये ते 3 हजार 276 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. पण आज घसरणीमुळे अदानी एंटरप्रायझेसचा शेअर 2,768 रुपयांवर आला आहे. म्हणजेच 18% ची घट झाली आहे.

अदानी समूहाचे मालक गौतम अदानी फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत चौथ्या स्थानावरून सातव्या स्थानावर घसरले आहेत. 25 जानेवारी रोजी त्यांची एकूण संपत्ती 9.20 लाख कोटी रुपये होती, जी शुक्रवारी 7.88 लाख कोटींवर आली.

 

Tags

follow us