IIT Kanpur Research On Diabetes Insulin : मधुमेह झाला की आयुष्यभर औषधं घ्यावी लागणार का? रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी सतत काळजी घ्यावी लागणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मधुमेह रिव्हर्स होऊ शकतो का? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याच्या दिशेने भारतीय संशोधकांनी एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. आपल्या शरीरात अशा काही पेशी आहेत, ज्या इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींना अवघ्या काही मिनिटांत इन्सुलिन सोडण्यापासून रोखू शकतात. IIT कानपूरमध्ये केलेल्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे. समोर आलेल्या या संशोधनामुळे विशेषतः लठ्ठपणा आणि टाइप 2 मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी भविष्यात उपचारांचे नवे मार्ग खुले होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण नेमकं अभ्यासावेळी काय सापडलंय? आणि या शोधाचा मधुमेहाच्या रुग्णांना काय फायदा होऊ शकतो? समजून घेऊया.
सर्वप्रथम मधुमेहामध्ये शरीरात काय बिघडतं, हे समजून घेऊया. आपल्या शरीरातील स्वादुपिंड म्हणजेच पॅनक्रियाजमध्ये बीटा सेल्स नावाच्या विशेष पेशी असतात. या पेशी इन्सुलिन तयार करतात. हे इन्सुलिन रक्तातील ग्लुकोज म्हणजेच साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्याचं काम करतं. याच स्वादुपिंडात मॅक्रोफेजेस नावाच्या रोगप्रतिकारक पेशीही असतात. या पेशी शरीराचं संरक्षण करण्यासोबतच स्वादुपिंडातील पेशींचं आरोग्य राखण्यास मदत करतात.
आतापर्यंत संशोधकांना असं माहीत होतं की, लठ्ठपणामुळे शरीरात दीर्घकाळ सौम्य स्वरूपाची सूज निर्माण होऊ शकते. या प्रक्रियेमुळे कालांतराने इन्सुलिन तयार करणाऱ्या बीटा सेल्सच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. मात्र IIT कानपूरच्या संशोधनाने यापेक्षा वेगळी प्रक्रिया समोर आणली आहे. स्वादुपिंडातील मॅक्रोफेजेस या रोगप्रतिकारक पेशी बीटा सेल्सशी थेट संवाद साधतात आणि काही विशिष्ट रासायनिक संदेशांच्या माध्यमातून अवघ्या काही मिनिटांत इन्सुलिनचा स्राव कमी करू शकतात. म्हणजेच, इन्सुलिनच्या निर्मितीवर आणि स्रावावर परिणाम करणारी प्रक्रिया केवळ दीर्घकाळ चालणाऱ्या सूजेपुरती मर्यादित नाही.
आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या पेशी इन्सुलिनचा स्राव रोखतात तरी कशा? संशोधकांनी यासाठी स्फिंगोलिपिड्स नावाच्या चरबीयुक्त रेणूंची भूमिका ओळखली आहे. मॅक्रोफेजेसमधील विशिष्ट सिग्नलिंग प्रक्रिया सक्रिय झाल्यानंतर हे रेणू बाहेर सोडले जातात. यानंतर बीटा सेल्सच्या पृष्ठभागावर असलेल्या वाहक प्रथिनाच्या मदतीने हे रेणू बीटा सेल्समध्ये प्रवेश करतात आणि तिथे इन्सुलिन सोडण्याच्या अंतर्गत यंत्रणेत अडथळा निर्माण करतात. विशेष म्हणजे, या प्रक्रियेत नेहमीच्या दाह निर्माण करणाऱ्या संदेशांऐवजी चरबीयुक्त रेणू संदेशवाहक म्हणून काम करतात. संशोधनातील हा सर्वात महत्त्वाचा खुलासा मानला जात आहे.
या संपूर्ण प्रक्रियेचा मागोवा घेताना संशोधकांना GPR18 नावाचा एक रिसेप्टर महत्त्वाचा असल्याचं आढळलं. हा रिसेप्टर मॅक्रोफेजेसमध्ये असतो आणि त्याच्याशी संबंधित सिग्नलिंग प्रक्रिया सक्रिय झाल्यानंतर इन्सुलिनचा स्राव कमी होतो. संशोधकांनी विशेष जनुकीय तंत्रज्ञानाचा वापर करून या प्रक्रियेतील सिग्नलिंग यंत्रणा चालू आणि बंद केली. त्यावेळी ही यंत्रणा सक्रिय केल्यास इन्सुलिनचा स्राव कमी झाला, तर ती रोखल्यावर इन्सुलिनचा स्राव सुधारल्याचं प्रयोगांमध्ये दिसून आलं. यामुळे भविष्यात औषधांच्या माध्यमातून या प्रक्रियेला रोखता येईल का, याचा अभ्यास करण्यासाठी तीन महत्त्वाचे पर्याय समोर आले आहेत.
पहिला म्हणजे GPR18 रिसेप्टर रोखणं, दुसरा म्हणजे स्फिंगोलिपिड्सचा संदेश रोखणं आणि तिसरा म्हणजे हे रेणू बीटा सेल्समध्ये पोहोचवणारी प्रक्रिया थांबवणं. या संशोधनाला विशेष महत्त्व मिळण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्याची मानवी ऊतींवर करण्यात आलेली पडताळणी. अमेरिकेतील Indiana Biosciences Research Institute च्या सहकार्याने संशोधकांनी दान केलेल्या मानवी स्वादुपिंडाच्या ऊतींवर प्रयोग केले. या प्रयोगांमध्येही GPR18 रिसेप्टरशी संबंधित हीच प्रक्रिया कार्यरत असल्याचं आढळलं. ही प्रक्रिया सक्रिय केल्यावर मानवी स्वादुपिंडाच्या ऊतींमध्येही इन्सुलिनचा स्राव कमी झाला.
म्हणजेच, ही प्रक्रिया केवळ प्राण्यांमध्येच आढळत नाही, तर मानवी स्वादुपिंडातही अस्तित्वात आहे. या संशोधनाचं नेतृत्व IIT कानपूरमधील डॉ. साई प्रसाद पिडी यांच्या मार्गदर्शनाखाली सिमरन सिंग आणि आशिष कुमार यांनी केलं असून, हे संशोधन प्रतिष्ठित Journal of Clinical Investigation या वैद्यकीय नियतकालिकात प्रकाशित झालं आहे.
आता सुरुवातीच्या प्रश्नाकडे पुन्हा वळूया. या संशोधनामुळे मधुमेह रिव्हर्स होऊ शकतो का? तर याचं उत्तर सध्या ‘नाही, असं आहे. कारण, सध्या हा संशोधनातील महत्त्वाचा टप्पा आहे. या निष्कर्षांचा प्रत्यक्ष उपचारांमध्ये वापर करण्यासाठी अजून संशोधन आणि वैद्यकीय चाचण्या आवश्यक आहेत. मात्र, या संशोधनामुळे टाइप 2 मधुमेहामध्ये इन्सुलिन तयार करणाऱ्या बीटा सेल्सचं कार्य टिकवून ठेवण्यासाठी भविष्यात नवीन औषधं विकसित करण्याची आशा निर्माण झाली आहे.
