India Ranked Second Loneliest Country In The World : भारतीय संस्कृतीमध्ये ‘संयुक्त कुटुंब पद्धती’ आणि नात्यांमधील ओलावा ही आपली सर्वात मोठी ताकद मानली जाते. मात्र, जून 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका जागतिक अहवालाने यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. डिजिटल एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्म ‘JB.com’ ने 36 देशांमध्ये केलेल्या अभ्यासानुसार, भारत जगातील दुसरा सर्वाधिक ‘एकाकी’ (Loneliest) देश ठरला आहे. नेमका हा अहवाल काय? कुटुंबाच्या गराड्यात राहुनही भारतीय का पडतायत एकाकी त्याबद्दल जाणून घेऊया…
अहवालात नेमकं काय म्हटलंय?
डिजिटल मनोरंजन प्लॅटफॉर्म JB.com यांनी 36 देशांमधील नागरिकांच्या भावनिक आरोग्य आणि सामाजिक अलगावाचा अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे. अहवालानुसार, तुर्की जगातील सर्वाधिक एकाकी देश ठरला असून, त्यापाठोपाठ भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा ‘लोनलीनेस स्कोअर’ 89 इतका नोंदवला गेला आहे, तर तुर्कीचा स्कोअर 100 आहे. अभ्यासात सहभागी झालेल्या भारतीयांपैकी 58 टक्के लोकांनी आपण एकाकी असल्याची भावना व्यक्त केली, तर 34 टक्के लोकांनी स्वतःला सामाजिकदृष्ट्या वेगळे पडल्याचे सांगितले.
भारतातील 37 टक्के लोक वारंवार दुःखी
भारतातील 37 टक्के लोक वारंवार दुःखी असल्याचेही या सर्वेक्षणात आढळून आले आहे. टॉप 5 देशांमध्ये हा आकडा सर्वाधिक आहे. त्यामुळे केवळ सामाजिक एकाकीपणाच नव्हे, तर भावनिक तणाव आणि मानसिक आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नही पुढे येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
कुटुंबात राहूनही एकाकीपणा
अहवालातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भारतातील एकाकीपणाचा संबंध एकटे राहण्याशी नसून भावनिक दुराव्याशी असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. भारतात केवळ 3.7 टक्के घरे एकाच व्यक्तीची आहेत आणि सरासरी कुटुंबाचा आकार चारपेक्षा अधिक सदस्यांचा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक एकाकी वाटत असल्याने, लोक शारीरिकदृष्ट्या कुटुंबात असले तरी, भावनिकदृष्ट्या एकमेकांपासून दूर जात आहेत, असे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.
तुर्कीतील लोक सर्वात जास्त एकाकी
तुर्कीमध्ये 61 टक्के नागरिकांनी एकाकीपणाची भावना व्यक्त केली, तर 45 टक्के लोकांनी सामाजिक वेगळेपणाचा अनुभव येत असल्याचे सांगितले. तुर्कीतील 31 टक्के नागरिक वारंवार दुःखी असल्याचेही आढळले. येथे सुमारे 20 टक्के घरे एकट्या व्यक्तींची असली तरी, एकाकीपणामागील प्रमुख कारण भावनिक तुटलेपणाच असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
बदलत्या जीवनशैलीचा परिणाम?
सोशल मीडियाचा वाढता वापर, कामाचा ताण, कमी होत चाललेला प्रत्यक्ष संवाद आणि शहरी जीवनशैलीमुळे लोकांमध्ये भावनिक अंतर वाढत आहे. त्यामुळे कुटुंब आणि मित्रमंडळींच्या सहवासात असूनही अनेकांना एकटेपणाची भावना जाणवत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
भारतासाठी मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हा अहवाल चिंताजनक मानला जात आहे.
कुटुंबव्यवस्था ही भारताची ताकद मानली जात असली, तरी भावनिक संवाद आणि मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढविण्याची गरज या अभ्यासाने अधोरेखित केली आहे. हा अहवाल केवळ मानसिक आरोग्यासाठीच नव्हे, तर आपल्या सामाजिक जडणघडणीसाठी देखील एक ‘वेक-अप कॉल’ आहे. त्यामुळे कुटुंबव्यवस्था टिकवून ठेवण्यासोबतच, त्यातील भावनिक संवाद आणि मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे आता काळाची गरज बनली आहे.
