International Women’s Day Special : भारताच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत एकूण 53 व्यक्तींना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले आहे. या व्यक्तींमध्ये पाच महिलांचा समावेश आहे. भारतासारख्या पुरूषप्रधान संस्कृतीत या पाच महिलांनी भारतरत्न पुरस्कार मिळवला आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भारतरत्नने सन्मानित करण्यात आलेल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, मदर तेरेसा, लता मंगेशकर, अरुणा असफ अली आणि एम.एस. सुब्बुलक्ष्मी यांच्याबद्दल जाणून घेऊया.
इंदिरा गांधी : आयर्न लेडी
इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी अलाहाबादच्या प्रतिष्ठित नेहरू कुटुंबात झाला. त्यांचे कुटुंब राजकीयदृष्ट्या सक्रिय असले तरी, एक महिला म्हणून त्यांच्या काळात राजकीय शिखरावर पोहोचणे सोपे नव्हते. इंदिराजींनी त्यांचे शिक्षण शांतिनिकेतन आणि ऑक्सफर्ड येथून पूर्ण केले. सुरुवातीला आलेल्या अडचणींवर मात करत आणि त्यानंतर त्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयांनी जगाला आश्चर्यचकित केले.
1966 मध्ये इंदिरा देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. 1971 चे भारत-पाकिस्तान युद्ध आणि बांगलादेशचा उदय हे त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे यश होते. त्यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि गरिबी निर्मूलन यासारखी धाडसी पावले उचलली. एक महिला प्रतिकूल परिस्थितीतही संपूर्ण राष्ट्राचे नेतृत्व करू शकते हे त्यांनी दाखवून दिले. इंदिराजींच्या आयुष्यात असे अनेक क्षण आले जेव्हा लोकांना वाटले की, त्या संपल्या पण त्या कठीण परिस्थित मार्ग काढत पुन्हा पुन्हा उभ्या राहिल्या. 1971 मध्ये भारताचा विकास आणि युद्धातील नेतृत्वासाठी इंदिरा गांधींना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले.
मदर तेरेसा : नन होण्यासाठी वयाच्या 18 व्या वर्षी सोडले घर
मदर तेरेसा यांचा जन्म अल्बेनियामध्ये झाला होता, पण त्यांनी भारताला आपली कर्मभूमी बनवले. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी नन बनण्यासाठी घर सोडले. 1929 मध्ये त्या भारतात आल्या आणि कोलकाता येथील एका शाळेत शिकवू लागल्या. मदर तेरेसा यांना गरीब आणि आजारी लोकांबद्दल खूप प्रेम होते. त्यांनी अनेक असाह्य लोक रस्त्यावर मरताना पाहिले. हे चित्र पाहून त्या विचलित झाल्या आणि त्यांनी सर्व सुख-सुविधांचा त्याग करत झोपडपट्टीत राहणे पसंत केले. मदर तेरेसा यांच्याकडे ना पैसा होता नाही कुण्या बड्या व्यक्तीचा पाठिंबा मात्र, या परिस्थितीतही त्यांनी मिशनरीज ऑफ चॅरिटीची स्थापना केली. एका लहान खोलीत सुरू झालेला त्यांचा हा प्रवास हळूहळू जगभरातील सेवा केंद्रांच्या जाळ्यापर्यंत विस्तारला. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य कुष्ठरोगी आणि अनाथांच्या कल्याणासाठी समर्पित केले. मदर तेरेसा यांना मानवता आणि शांतीसाठी निःस्वार्थ सेवेसाठी 1980 मध्ये सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.
अरुणा असफ अली: 1942 च्या क्रांतीची नायिका
अरुणा असफ अली यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ग्रँड ओल्ड लेडी म्हणून ओळखले जाते. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अरूणा यांनी त्यांच्या काळातील सामाजिक अडथळे झूगारून टाकत राजकारणात प्रवेश केला. 1942 च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान, जेव्हा सर्व प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली, तेव्हा अरुणा यांनी मुंबईच्या ग्वालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवून ब्रिटिशांना आव्हान दिले होते. त्या अनेक वर्षे भूमिगत राहून स्वातंत्र्यासाठी लढल्या. स्वातंत्र्यानंतर त्या दिल्लीच्या पहिल्या महापौरही झाल्या. एका बंडखोर विद्यार्थ्यापासून ते भारताच्या स्वातंत्र्याच्या आधारस्तंभ बनण्यापर्यंतचा अरूणा यांचा प्रवास सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे. स्वातंत्र्यलढ्यातील अरूणा यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना 1997 मध्ये मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आले.
एम.एस. सुब्बुलक्ष्मी: संगीताची अमर साधक
मदुराई षण्मुखावादिवु सुब्बुलक्ष्मी, ज्यांना एम.एस. सुब्बुलक्ष्मी म्हणूनही ओळखले जाते, त्यांचा जन्म एका सामान्य संगीत कुटुंबात झाला. अगदी लहान वयातच त्यांनी शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केली. सुब्बुलक्ष्मी यांच्या आवाजात इतकी दैवी शक्ती होती की, महात्मा गांधीही त्यांच्या भजनांचे चाहते होते. सुब्बुलक्ष्मी यांच्या गाण्याचे केवळ भारतातच नव्हे तर, संयुक्त राष्ट्रांमध्येही मोठा चाहता वर्ग होता. रॅमन मॅगसेसे पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय कलाकार होत्या. जागतिक स्तरावर भारतीय शास्त्रीय संगीताला गौरव मिळवून दिल्याबद्दल त्यांना 1998 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
लता मंगेशकर
लता मंगेशकर यांची कहाणी संघर्षाचे एक उत्तम उदाहरण आहे. दीदी केवळ 13 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्या कोल्हापूरहून मुंबईत राहायला आल्या आणि छोट्या भूमिका आणि गाणी शोधू लागल्या. सुरुवातीला अनेक संगीतकारांनी त्यांना आवाज खूपच बारीक असल्याचे सांगून नाकारले. पण लताजींनी कधीही हार मानली नाही. कठोर परिश्रम आणि सरावाने त्यांनी त्यांची ओळख निर्माण केली. लतादीदींनी 36 हून अधिक भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. संगीत क्षेत्रातील त्यांच्या ऐतिहासिक आणि अविस्मरणीय योगदानासाठी त्यांना 2001 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आतापर्यंत भारत सरकाकडून भारतरत्न पुरस्कारांमध्ये 48 पुरूषांना मिळालेल्या संख्येमध्ये फक्त पाच महिलांचा समावेश आहे. महिलांची संख्या जरी कमी असली तरी, त्यांचा प्रभाव खोलवर आहे. भारतरत्न मिळवलेल्या या सर्व महिलांमध्ये एक गुण समान होता आणि तो म्हणजे त्यांनी कधीच हार मानली नाही. भारतरत्न विजेत्या या महिला केवळ पुरस्कार विजेत्या नाहीत तर, लाखो मुलींसाठी आशेचा किरण आहेत. आंतरराष्ट्रीय महिला दिनी या नायिकांना लेट्सअप मराठीकडून आदरांजली.
