Flydubai Flight Captain Smit Machchhar : Flydubai च्या विमानातील संकटाच्या प्रसंगी 174 प्रवाशांचे प्राण वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे भारतीय पायलट कॅप्टन स्मित मछार सध्या चर्चेत आहेत. त्यांच्या धाडसाचं इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही कौतुक केलं आहे. त्यानंतर सोशल मीडियावर आणि काही वृत्तांमध्ये स्मित मच्छार यांना इस्राइलचा ‘President’s Medal of Honor’ मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. इतकंच नाही, तर हा सन्मान मिळाल्यानंतर ते आयुष्यभर इस्राइलचे सरकारी पाहुणे राहतील, असाही दावा केला जात आहे. मात्र, या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे? स्मित मच्छार यांना खरंच हा सन्मान मिळणार आहे का? आणि ‘आयुष्यभर सरकारी पाहुणे’ ही सुविधा या पुरस्काराचा भाग आहे का? जाणून घेऊया…
स्मित मच्छार यांना ‘President’s Medal of Honor’ मिळणार?
सध्या उपलब्ध माहितीनुसार, स्मित मच्छार यांना इस्राइलचा President’s Medal of Honor देण्याची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे त्यांना हा पुरस्कार निश्चित मिळणार आहे, असं म्हणणं सध्या योग्य ठरणार नाही. मात्र, या पुरस्कारासाठी परदेशी नागरिकांचाही विचार केला जाऊ शकतो. इस्राइलच्या राष्ट्रपती कार्यालयाच्या माहितीनुसार, President’s Medal of Honor हा केवळ इस्राइली नागरिकांसाठी मर्यादित नाही. तर, इस्राइल किंवा संपूर्ण मानवतेसाठी असाधारण योगदान देणाऱ्या परदेशी व्यक्तींनाही हा सन्मान दिला जाऊ शकतो. त्यामुळे मच्छार यांच्या शौर्याची इस्राइलकडून दखल घेतली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु, अद्याप इस्त्रायलकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
‘President’s Medal of Honor’ नेमका काय आहे?
‘President’s Medal of Honor’ हा इस्राइलच्या राष्ट्रपतींकडून दिला जाणारा महत्त्वाचा नागरी सन्मान आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या कौशल्याने, सेवेद्वारे किंवा इतर कोणत्याही माध्यमातून इस्राइल किंवा मानवतेसाठी असाधारण योगदान दिलं असेल, तर तिच्या नावाचा या सन्मानासाठी विचार केला जाऊ शकतो. या सन्मानाची सुरुवात इस्राइलचे नववे राष्ट्रपती शिमोन पेरेस यांच्या कार्यकाळात झाली. पहिल्यांदा हा पुरस्कार 2012 मध्ये देण्यात आला. या सन्मानासाठी व्यक्तींची नावं सुचवण्यासाठी राष्ट्रपतींकडे एक सल्लागार समिती असते. त्यानंतर निवड झालेल्या व्यक्तीला राष्ट्रपतींकडून विशेष समारंभात हा सन्मान प्रदान केला जातो. यापूर्वी इस्राइलसह विविध देशांतील प्रमुख व्यक्तींना हा सन्मान मिळाला आहे. त्यात राष्ट्राध्यक्ष, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती तसेच जगभरातील ज्यू समुदायातील प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे. 2025 मध्ये, या सन्मानासाठी 10 नावांची घोषणा करण्यात आली होती. ज्यात अमेरिकेच्या डॉ. मिरियम अॅडेलसन, जर्मनीचे मॅथियास डॉप्फनर आणि शेख मुवफ्फाक तारीफ यांसारख्या प्रमुख नावांचा समावेश होता.
President’s Medal of Honor मिळाल्यानंतर व्यक्तीला आयुष्यभर इस्राइलचा सरकारी पाहुणा म्हणून राहण्याची सुविधा मिळते, असा कोणताही अधिकृत उल्लेख उपलब्ध माहितीत नाही. म्हणजेच, स्मित मच्छार यांना भविष्यात हा सन्मान मिळाला तरी त्याचा अर्थ असा होत नाही की त्यांना आयुष्यभर इस्राइल सरकारकडून राहण्याची, प्रवासाची किंवा इतर सुविधा दिली जाईल. त्यामुळे ‘सरकारी पाहुणे’ आणि ‘President’s Medal of Honor’ यांची थेट सांगड घालणं चुकीचं ठरेल.
My salute to the Indian pilot Captain Smit Machchhar for his extraordinary bravery.
Despite being stabbed and seriously injured, he fought back, resisted, opened the cockpit door, and enabled passengers and crew to overpower the attacker — preventing a catastrophic mid-air…
— Benjamin Netanyahu – בנימין נתניהו (@netanyahu) September 30, 2026
सध्या सार्वजनिकरित्या समोर आलेली महत्त्वाची बाब म्हणजे इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्मित मछार यांना हिरो अर्थात नायक म्हणून संबोधित केल्याचं वृत्त आहे. Flydubai च्या विमानातील गंभीर परिस्थितीत 174 प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. अशा वेळी विमान सुरक्षितपणे हाताळण्यात मच्छार यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याने त्यांच्या धाडसाची चर्चा झाली. मात्र, पंतप्रधानांकडून कौतुक होणं आणि राष्ट्रपतींकडून अधिकृत पदक जाहीर होणं या दोन स्वतंत्र बाबी आहेत. इस्राइलमध्ये असाधारण शौर्य दाखवून एखाद्याचा जीव वाचवणाऱ्या नागरिकांसाठी नागरी शौर्याचा स्वतंत्र सन्मान देखील आहे. मात्र, उपलब्ध माहितीनुसार हा सन्मान इस्राइली नागरिकांसाठी आहे.
खरचं स्मित मच्छार होणार इस्त्राइलचे सरकारी पाहुणे?
संपूर्ण प्रकरण चार मुद्द्यांत समजून घ्यायचं झालं तर, स्मित मच्छार यांच्या धाडसाचं इस्राइलकडून कौतुक झालं आहे. इस्राइलच्या पंतप्रधानांनी त्यांना हिरो म्हटलंय. त्यांच्या असाधारण धाडसाबद्दल मच्छार यांना President’s Medal of Honor हा परदेशी व्यक्तींनाही दिला जाऊ शकतो. मात्र, स्मित यांना हा पुरस्कार देण्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. तसेच जर, भविष्यात हा पुरस्कार जाहीर झाला तरी, मच्छार आयुष्यभर इस्राइलचे सरकारी पाहुणे होतील असा अधिकृत नियम उपलब्ध नाही.
This man is a hero.
Captain Smit Machchhar, the Indian captain of flydubai Flight 1073, fought back after being stabbed in the cockpit.
Despite being severely injured, he managed to unlock the cockpit door – allowing Israeli passengers and the Emirati crew to intervene and save… pic.twitter.com/x4W3mtQkag
— Israel Foreign Ministry (@IsraelMFA) September 30, 2026
