Download App

कर्नल सोफिया कुरेशीची जगभरात चर्चा; जाणून घ्या, कुठेच वाचनात न आलेल्या खास गोष्टी….

Colonel Sophia Qureshi  : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर मोठी

Colonel Sophia Qureshi  : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर मोठी कारवाई करत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला आहे. भारताच्या या कारवाईत 90 दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त आहे. भारताने या कारवाईला ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) असं नाव दिले आहे. या ऑपरेशनबाबत भारतीय सैन्याने दिलेल्या पत्रकार परिषदेत दोन महिला अधिकारी देखील उपस्थित होत्या,त्यापैकी एक सोफिया कुरेशी. सध्या सोशल मीडियावर 44 वर्षीय भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी (Colonel Sophia Qureshi) चर्चेत आहे.

कोण आहे कर्नल सोफिया कुरेशी?

पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरची जगभरात चर्चा सुरु आहे. ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी भारताने सशस्त्र दलातील दोन महिला अधिकाऱ्यांची निवड केली होती आणि यानंतर संपूर्ण देशात सोफिया कुरेशी यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. माहितीनुसार, सोफिया कुरेशी मूळची गुजरातची आहे. त्यांचा जन्म 1981 मध्ये वडोदरा (Vadodara) येथे झाला असून त्यांनी शिक्षण देखील वडोदरा येथे घेतले आहे. त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

शांतता मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका

टीओआयच्या मते, सोफिया कुरेशी  संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत सक्रियपणे सहभागी आहे, जिथे त्यांची भूमिका शांतता मोहिमा (पीकेओ) आणि मानवतावादी खाण कारवाईशी संबंधित प्रशिक्षणावर केंद्रित आहे. 2006 मध्ये, सोफिया कुरेशी संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेअंतर्गत काँगोमध्ये तैनात होत्या आणि 6 वर्षांहून अधिक काळ शांतता मोहिमांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

सोफिया यांनी 1999 मध्ये चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतले आणि त्याच वर्षी  त्यांना लेफ्टनंट म्हणून नियुक्ती मिळाली.  कर्नल सोफिया यांनी 2016 मध्ये भारताने आयोजित केलेल्या सर्वात मोठ्या परदेशी लष्करी सराव – एक्सरसाइज फोर्स 18 चे नेतृत्व केले. हा सराव 2 मार्च ते 8 मार्च दरम्यान पुण्यात आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये 18 देशांनी भाग घेतला होता.

कर्नल सोफिया यांची कामगिरी

कर्नल सोफिया कुरेशी यांनी लहान वयात अनेक महत्त्वाच्या कामगिरी केल्या आहेत. कर्नल सोफिया यांना 18 देशांच्या बहुराष्ट्रीय लष्करी सरावात भारताच्या बाजूचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यावर त्यांनी प्रसिद्धी मिळवली. त्यावेळी, कोणत्याही देशाच्या लष्करी तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी होत्या. कर्नल सोफिया कुरेशी या सिग्नल कॉर्प्समधून आहेत, ज्या भारतीय सैन्याच्या संप्रेषण आणि माहिती प्रणालींसाठी जबाबदार आहेत.

यापुढे कोणाची हिंमत होणार नाही… एअर स्ट्राईकवर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया

सोफियाचे भारतीय सैन्याशी खूप जुने नाते आहे. सोफिया यांचे आजोबाही सैन्यात होते आणि त्यांच्या वडिलांनीही काही वर्षे सैन्यात धार्मिक शिक्षक म्हणून काम केले. कर्नल सोफिया यांचे लग्न मेजर ताजुद्दीन कुरेशी यांच्याशी झाले आहे, जे मेकॅनाइज्ड इन्फंट्रीमध्ये अधिकारी आहेत. दोघांनाही समीर कुरेशी नावाचा एक मुलगा आहे.

follow us