नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल पी. पी. यांचे लोकसभा सदस्यत्व पुन्हा रद्द करण्यात आले आहे. केरळ उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्यानंतर लोकसभा सचिवालयाने ही कारवाई केली आहे. लक्षद्वीपच्या स्थानिक न्यायालयाने त्यांना हत्येचा प्रयत्न करण्याच्या खटल्यात दोषी ठरवले असून या प्रकरणात त्यांना दहा वर्षांची शिक्षा झाली आहे. या प्रकरणी त्यांनी केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली होती. (Lakshadweep NCP MP Mohammed Faizal disqualified from Lok Sabha after Kerala High Court rejected his plea in an attempt to murder case.)
Lakshadweep NCP MP Mohammed Faizal disqualified from Lok Sabha after Kerala High Court rejected his plea in an attempt to murder case. pic.twitter.com/pAlb9ShOYS
— ANI (@ANI) October 4, 2023
याबाबत अधिक माहिती अशी की, लक्षद्वीपच्या न्यायालयाने फैजल यांना 2009 मधील एका प्रकरणात 11 जानेवारी 2023 रोजी दोषी ठरवले होते. यानंतर 13 जानेवारी रोजी त्यांना 10 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. यानंतर लोकसभा सचिवालयाने तात्काळ प्रभावाने त्यांची खासदारकी रद्द केली होती. मात्र फैजल यांनी केरळ उच्च न्यायालयात धाव घेत लक्षद्वीप न्यायालयाच्या निकालाला स्थगिती मिळविली होती. यानंतर 29 मार्च रोजी त्यांचे सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आले होते. मात्र आता केरळ उच्च न्यायालयाने त्यांची ही याचिका फेटाळून लावल्याने त्यांचे सदस्यत्व पुन्हा एकदा रद्द करण्यात आले आहे.
मोहम्मद फैजल यांच्यावर काँग्रेस नेते मोहम्मद सलिया यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. मोहम्मद सलिया यांच्यावर जमावाने हल्ला केला आणि बेदम मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले. फैजल यांनीच जमावाचे नेतृत्व केल्याचा आरोप होता. मोहम्मद सलिया यांच्यावर अनेक महिने उपचार सुरू होते. या प्रकरणात 32 जणांना आरोपी केले होते. त्यापैकी चार जणांना दोषी ठरवले त्यात मोहम्मद फैजल यांचाही समावेश होता.