भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर काल सोमवार न्यायलयात बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा (Gavai) वकील राकेश किशोर याने आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सरन्यायाधीश गवई यांनी मनाचा मोठेपणा दाखवत त्याच्यावर गुन्हा दाखल न करता त्याला माफ केलं. मात्र, यानंतरही राकेश किशोर याचा मुजोरपणा कायम आहे.
परमात्म्याने माझ्याकडून जे करवून घेतले ते मी केले. मला या गोष्टीचे कोणतेही दु:ख नाही. मी कोणाचीही माफी मागणार नाही, असं राकेश किशोर याने म्हटलं आहे. 16 सप्टेंबरला एका व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गवई साहेबांनी त्या दाव्याची थट्टा उडवली. त्यांनी म्हटलं की, तुम्ही मूर्तीला प्रार्थना करा, मूर्तीलाच सांगा, स्वत:ची पुर्नबांधणी करा. जेव्हा न्यायालयात दुसऱ्या धर्माबाबतच्या याचिका येतात तेव्हा मोठे निर्णय घेतले जातात. पण जेव्हा सनातन धर्माबाबतची याचिका न्यायालयात येते तेव्हा न्यायालय त्याबाबत काहीतरी नकारात्मक निर्णय देते.
मी हिंसेच्या विरोधात आहे. माझ्यावर आजपर्यंत एकही केस दाखल नाही. मीदेखील खूप शिक्षण घेतलेलं आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे. मी नशेतही नव्हतो. मात्र, माझ्यासारख्या व्यक्तीने हे कृत्य का केलं, याचा विचार करा. माझ्यावर कोणतीही कारवाई झाली तरीही हरकत नाही, मी त्यासाठी तयार आहे, असं राकेस किशोर याने म्हटलं आहे. सरन्यायाधीश गवई यांनी काही दिवसांपूर्वी खजुराहो येथील विष्णू मूर्तीच्या पुनर्बांधणीची याचिका फेटाळून लावली होती. कारण, ते भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या अधिकारक्षेत्रात येते. ‘तुम्ही इथून जा आणि भगवान विष्णूकडं प्रार्थन करा आणि त्यालाच काहीतरी करायला सांगा असं ते म्हणाले होते.
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई! राकेश किशोर यांची प्रॅक्टिस स्थगित
तुम्ही असा दावा करत आहात की, तुम्ही विष्णूचे भक्त आहात. मग भगवान विष्णूलाच काहीतरी करायला सांगा, असं सरन्यायाधीश गवई यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला होता. यावर सरन्यायाधीश गवई यांनी मी सर्व धर्मांचा आदर करत असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र, यावरुन राकेश किशोर प्रचंड नाराज झाला होता. राकेश किशोर याने सोमवारी सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्यावेळी त्याच्याजवळ एक कागद सापडला. त्यावर लिहलं होतं की, ‘माझा संदेश हा प्रत्येक सनातन्यासाठी आहे. हिंदुस्थान सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’.
या प्रकारानंतर बार कौन्सिल ऑफ इंडियाने राकेश किशोर याच्यावर कठोर कारवाई करत त्याची वकिलीची सनद रद्द केली होती. विशेष गोष्ट म्हणजे राकेश किशोर याने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केल्यानंतरही सरन्यायाधीश बी.आर. गवई हे शांत राहिले होते. त्यांनी म्हटलं होतं की, ‘हे सगळं पाहून कोणीही विचलित होऊ नका. मीदेखील विचलित झालेलो नाही. अशा घटनांनी मला काहीच फरक पडत नाही’. यानंतर सरन्यायाधीशांनी सुनावणी सुरुच ठेवली होती.