निवडणूक काळात धडकी भरवणारी ‘आदर्श आचारसंहिता’ जाहीर : तीन महिने काय बदलणार?
देशात 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकीची (Lok Sabha Election) घोषणा झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दुपारी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली. यानंतरच मॉडेल कोड ऑफ कंडक्ट अर्थात आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष, उमेदवार, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक यांना या आदर्श आचारसंहितेचे पालन करावेच लागते. यातही राजकीय पक्ष आणि उमेदवार यांना या नियमांचे आणि अटींचे काटेकोर पालन करावेच लागते. यातील नियम आणि अटींचे उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाल्यास निवडणूक आयोग आणि पोलीस यांच्याकडून कडक कारवाई केली जाते. त्यामुळेच या आदर्श आचारसंहितेची सर्वांनाच धास्ती लागलेली असते. (Lok Sabha election announced, what exactly is the ideal code of conduct?)
पण ही आदर्श आचारसंहिता म्हणजे नेमके आहे तरी काय? आणि तिची धास्ती का घेतली जाते? पाहुया सविस्तर
आदर्श आचारसंहिता म्हणजे काय याबद्दल अगदी थोडक्यात म्हणजे एकाच ओळीत सांगायचे तर “निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्ष, उमेदवार, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी काय करावे आणि काय करु नये याबद्दल आखून दिलेली नियमावली. याच नियमावलीला आदर्श आचारसंहिता असे म्हटले जाते.
आचारसंहितेचे नियम काय सांगतात? जाणून घेऊयात.
निवडणूक जाहीर झाल्यानंतर, मतदानाच्या दिवशी आणि त्यानंतर निकाल लागेपर्यंत अशा तीन टप्प्यांमध्ये आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी होत असते. या तिन्ही टप्प्यांमध्ये राजकीय पक्ष, उमेदवार, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांचा व्यवहार कसा असावा, निवडणुकांदरम्यान पक्षांच्या भूमिका कशा असाव्यात, मतदानादिवशी मतदान केंद्रावर काय करता येते आणि काय नाही अशा अनेक नियमांचा या आचारसंहितेत समावेश आहे.
- आचारसंहिता लागू झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाला कुठल्याही प्रकारच्या सरकारी घोषणा, नवीन योजना सुरू करता येत नाहीत. भूमिपूजन, उद्घाटन, लोकार्पण असे कार्यक्रमही घेता येत नाहीत.
- सरकारी गाडी, सरकारी बंगला किंवा सरकारी विमानाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करता येत नाहीत.
- कोणत्याही पक्षाला प्रचारसभा, रॅली, मिरवणूक किंवा अगदी कोपरा सभा देखील घ्यायची असल्यास पोलिसांची पूर्वपरवानगी घ्यावी लागते. विनापरवानगी प्रचार करणे आचारसंहितेचे उल्लंघन मानले जाते.
- कोणत्याही राजकीय पक्ष किंवा उमेदवार धर्म, जाती, पंथ याआधारे मतदारांना मत देण्याचे आवाहन करू शकत नाही.
- जातीधर्मावरून तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती प्रचारादरम्यान करता येत नाही.
- कोणाच्याही घरावर, जमिनीवर, कोणाच्याही घराच्या परिसरात, भिंतीवरदेखील राजकीय पक्षाचे झेंडे, बॅनर, पत्रके असे काही लावण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची परवान घेणे आवश्यक असते.
- प्रचार काळात रात्री दहा पर्यंत प्रचार करण्यास, प्रचार सभा घेण्यास परवानगी असते.
- सोशल मिडीयावर फेक न्यूज, जाती-धर्मांवर आधारित प्रचार, जायीत, धार्मिक तेढ निर्माण करणारा प्रचार करता येत नाही.
- मतदानापूर्वी 48 तास प्रचार थांबवावा लागतो.
- मतदारांना पैसे वाटणे, धमकी देऊन घाबरवणे, अमिष दाखविणे असे प्रकार करण्यास मज्जाव असतो.
- मतदानाच्या दिवशी दारूची दुकाने बंद ठेवावी लागतात. प्रचारादरम्यान किंवा मतदानाच्या दिवशी दारू अथवा पैसे वाटण्यास मनाई असते.
- मतदान केंद्राजवळ कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा उमेदवाराच्या समर्थकांची गर्दी जमवता येत नाही.
- मतदान केंद्रावर प्रचारसाहित्य किंवा मतदारांना भुलवणारी कोणतीही गोष्ट असता कामा नये.
- मतदारांसाठी कोणत्याही प्रकारच्या खाण्यापिण्याची व्यवस्था तिथे नसावी.
- मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणे किंवा परत आणणे, त्यांच्या जाण्या-येण्याची सोय करणे, वाहन मिळवून देणे यातले काहीही करण्यास आचारसंहितेनुसार बंदी आहे.
आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास काय कारवाई होते?
- निवडणूक आयोगाने दिलेल्या आचारसंहितेनुसार ‘भ्रष्ट आचरण’ आणि अपराध/गुन्हा या श्रेणीत बसणारी कुठलीही कृती उमेदवार किंवा त्याचे कार्यकर्ते, राजकीय पक्ष करताना आढळल्यास ते आचारसंहितेचे उल्लंघन मानले जाते.
- त्यानंतर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते.
- यात उमेदवाराला एक दिवसाच्या प्रचारबंदीपासून ते निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते.
- गंभीर गोष्ट असेल तर कायदेशीर गुन्हा दाखल केला जातो आणि कारावासाच्या शिक्षेची तरतूदही आहे.
- मतदानानंतर न्यायालयातही आचारसंहिता भंगाचा गुन्हा सिद्ध झाला तर ती निवडणूक रद्द ठरवली जाते.
- राजकीय कार्यक्रमांवर लक्ष ठेवायला निवडणूक आयोग निरीक्षक नियुक्त करतात.