Download App

माणिक साहा होणार त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री, भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत निर्णय

  • Written By: Last Updated:

अगरतळा : त्रिपुराच्या नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित झाले आहे. पक्षाने माणिक साहा यांच्यावरच पुन्हा विश्वास दाखवला आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत माणिक साहा यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. बुधवार, 8 मार्च रोजी मुख्यमंत्री आणि नवनिर्मित मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित राहणार आहेत.

विशेष म्हणजे, मे 2022 मध्ये, तत्कालीन मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी राजीनामा दिल्यानंतर काही तासांतच पक्षाने डॉ. माणिक साहा यांना पुढील मुख्यमंत्री म्हणून घोषित केले होते. साहा यांनी 15 मे 2022 रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यातील बारदोवली मतदारसंघातून निवडणूक जिंकलेले 70 वर्षीय माणिक साहा यांनी पक्षाच्या कामगिरीचे अपेक्षेप्रमाणे वर्णन केले आहे.

ते म्हणाले, “भाजपची ही कामगिरी अपेक्षित होती… आम्ही त्याची आतुरतेने वाट पाहत होतो. आता आमची जबाबदारी वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवलेल्या मार्गावर आम्ही पुढे जाऊ.”

माणिक साहा यांनी 2016 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यापूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना बूथ व्यवस्थापन समिती आणि राज्यस्तरीय सदस्यत्व मोहिमेच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली. मुख्यमंत्री होण्यापूर्वीच साहा यांची राज्यसभा खासदार म्हणून निवड झाली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी राज्यसभेचे सदस्यत्व सोडले. 2020 मध्ये त्यांना त्रिपुरामध्ये पक्षप्रमुख बनवण्यात आले.

Nana Patole कार्यक्रमाला आले नाही म्हणून आयोजकाचा घरी जाऊन संताप, व्हिडिओ व्हायरल 

त्रिपुरामध्ये, भाजप-आयपीएफटी युतीने 60 सदस्यांच्या विधानसभेत 33 जागा जिंकून सलग दुसऱ्यांदा सत्तेत परतले आहे. तत्कालीन राजघराण्याचे वंशज प्रद्योत किशोर देबबर्मा यांनी स्थापन केलेल्या टिपरा मोथा पक्षाने 13 जागा जिंकल्या आहेत, तर डाव्या-काँग्रेस आघाडीने 14 जागा जिंकल्या आहेत. देबबर्मा यांच्या पक्षाने आदिवासी भागात डाव्यांच्या मतांमध्ये घसरण केली. राज्यात तृणमूल काँग्रेसची (टीएमसी) कामगिरी अत्यंत खराब होती. टीएमसीने 28 जागांसाठी उमेदवार उभे केले पण कुठेही यश मिळाले नाही.

 

Tags

follow us