Download App

पुन्हा चुकला काळजाचा ठोका! संसदेत घुसलेल्या तिघांमुळे 21 वर्षांपूर्वीच्या हल्ल्याच्या आठवणी ताज्या

नवी दिल्ली : देशाच्या संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. लोकसभेच्या कामकाजावेळी तीन अज्ञात व्यक्ती सभागृहात घुसल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तीन व्यक्ती प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात शिरले आणि त्यातील दोघे लोकसभेतील बाकांवर इकडून तिकडे पळत होते. मिळालेल्या माहितीनुसार, यातील एकाने बुटातून काही तरी गॅस काढला आणि तो लोकसभेत स्प्रे केला. यामुळे उपस्थित खासदारांच्या नाकात जळजळ सुरु झाली. दरम्यान, या घटनेने लोकसभेत एकच खळबळ उडाली असून या तिन्ही व्यक्तींना सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले आहे. ते कोण आहेत त्यांच्याकडे पास होते का? याची कसून चौकशी केली जात आहे. (The visitor, who jumped into LS chamber from gallery, was seen leaping over benches)

खासदार अरविंद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेत शून्य प्रहाराचे कामकाज सुरु होते. अचानक प्रेक्षक गॅलरीतून तिघे जण खांबाला धरुन लटकले. त्यातील दोन जणांनी खाली उडी घेतली आणि ते लोकसभेतील बाकांवर इकडून तिकडे पळत होते. त्याचवेळी तिसऱ्या व्यक्तीने बुटातून काही तरी गॅसचा फवारा केला. यामुळे उपस्थित खासदारांच्या नाकात आणि डोळ्यात जळजळ सुरु झाली. त्यानंतर सभागृह तहकूब झाले. सुरक्षा रक्षकांनी या तिघांनाही ताब्यात घेतले असून ते जे काही पुढील कारवाई असेल ते करत आहेत. पण या तिघांनी कोणत्याही घोषणा दिल्या नाहीत किंवा आरडाओरड केली नाही. त्यामुळे ते नेमके कशासाठी आले होते याचा अंदाज लागू शकलेला नाही, असेही सावंत म्हणाले.

21 वर्षांपूर्वीच्या आठवणी पुन्हा ताज्या :

विशेष म्हणजे आजच्याच दिवशी 21 वर्षांपूर्वी म्हणजे 2001 साली संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता. AK47 रायफल, ग्रेनेड लाँचर, पिस्तूल आणि ग्रेनेड अशा मोठ्या शस्त्रसाठ्यासह पाकिस्तानच्या लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदचे पाच दहशतवादी गृह मंत्रालय आणि संसदेचे बनावट स्टिकर्स घालून आत घुसले होते. त्यांच्या हालचालींवरुन एक कर्मचारी, कॉन्स्टेबल कमलेश कुमारी यादव यांना संशय आला. (memories of December 13 are fresh because of the three who entered the Parliament)

अशात दहशतवाद्यांच्या गाडीजवळ जाणारे यादव हे पहिले सुरक्षा अधिकारी होते. काहीतरी संशयास्पद घडत असल्याचे जाणवल्याने, ते गेट क्रमांक 1 सील करण्यासाठी ते पोस्टवर परत गेले. त्यावेळी दहशतवाद्यांनी यादव यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्यावर 11 राऊंड फायर करण्यात आले. यात यादव यांचा जागीच मृत्यू झाला. यादव यांना मारल्यानंतर दहशतवादी अंदाधुंद गोळीबार करत पुढे सरसावले. सुमारे 30 मिनिटे हा थरार सुरु होता.

यात नऊ जवान शहीद झाले आणि 18 जण जखमी झाले. तर हा हल्ला करणारे पाचही दहशतवादी मारले गेले होते. तपासात या दहशतवादी हल्ल्यामागे मोहम्मद अफजल गुरू, एसएआर गिलानी आणि शौकत हुसैन यांच्यासह पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा हात असल्याचे समोर आले होते. त्यानंतर तब्बल 12 वर्षांनी 9 फेब्रुवारी 2013 रोजी अफझल गुरूला फाशी देण्यात आली.

Tags

follow us