दिल्लीपाठोपाठ भाजपने अयोध्येतील पराभवाचाही बदला घेतला आहे. मिल्कीपूर विधानसभा पोटनिवडणूक जिंकली आहे. भाजपचे (BJP) उमेदवार चंद्रभानू पासवान यांनी समाजवादी पक्षाच्या (Samjwadi Party) अजित प्रसाद यांना 50 हजारांहून अधिक मतांनी पराभूत केले आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही हा पराभव स्वीकार केला आहे. पण त्याचवेळी त्यांनी अयोध्या पोलीस प्रशासन आणि प्रशानावर पराभवाचे खापर फोडले. (Milkipur assembly by-election, BJP candidate Chandrabhanu Paswan defeated Samajwadi Party’s Ajit Prasad by more than 50,000 votes.)
अयोध्याच्या मिल्कीपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपने जुन्या दिग्गजांऐवजी नवीन चेहरा असलेल्या चंद्रभानू पासवान यांना उमेदवारी दिली होती. समाजवादी पक्षाने इथून खासदार अवधेश प्रसाद यांचे पुत्र अजित प्रसाद यांना उमेदवार म्हणून आधीच घोषित केले होते.
अवधेश प्रसाद म्हणजे अयोध्यामध्ये भाजपचा पराभव करून देशभरात ओळख मिळवलेले नेते होय. गतवर्षीच्या लोकसभा निवडणुकीत अवधेश प्रसाद यांनी अयोध्या म्हणजेच फैजाबाद लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या लल्लू सिंह यांचा 54 हजार मतांनी पराभव केला होता. आता त्यांच्याच मुलाचा पराभव करून भाजपने अयोध्याचा बदला पूर्ण केला आहे.
व्यवसायाने वकील असलेले चंद्रभानू पासवान हे अयोध्येतील रुदौलीच्या परसौली गावचे रहिवासी आहेत. रुदौली येथून दोनदा जिल्हा पंचायत सदस्य राहिले आहेत. सध्या त्यांची पत्नी जिल्हा पंचायत सदस्या आहे. चंद्रभानू हे भाजपच्या जिल्हा शाखेतील कार्यकारिणीचे सदस्य देखील आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ते अनुसूचित जाती संपर्क प्रमुख होते. तर त्यांचे वडील बाबा राम लखन दास हे गावचे प्रमुख आहेत.
चंद्रभानू पासवान यांचे संपूर्ण कुटुंब साडी व्यवसायात सक्रिय आहे. सुरत व्यतिरिक्त ते रुदौलीमध्येही साडीचा व्यवसाय करतात. चंद्रभानू गेल्या दोन वर्षांपासून मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघात सक्रिय होते. म्हणूनच ते मिल्कीपूर पोटनिवडणुकीतही प्रमुख दावेदारांमध्ये होते. चंद्रभानू उच्च शिक्षित असून त्यांनी बी.कॉम, एम.कॉम आणि एलएलबी केले आहे. अवधेश प्रसाद यांच्याप्रमाणेच चंद्रभानू पासवान हे पासी समुदायातून येतात.
राजकीय जाणकारांच्या मते, मिल्कीपूर जागेसाठी भाजपच्या तिकिटासाठी सुमारे अर्धा डझन दावेदार होते. दोनवेळचे माजी आमदार गोरखनाथ बाबा आणि रामू प्रियदर्शी हे देखील दावेदारांमध्ये होते. याशिवाय उपपरिवहन आयुक्त सुरेंद्र कुमार हे देखील तिकिटाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. स्पर्धकांमध्ये असे अनेक मोठे चेहरे समाविष्ट होते. परंतु चंद्रभानू यांनी त्या सर्वांना मागे टाकून दावेदारी जिंकली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मंत्र्यांनी इथे जोरदार प्रचार केला होता. समाजवादी पक्षानेही कोणती कसर सोडली नव्हती. अखिलेश यादव आणि डिंपल यादव यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी अजित प्रसाद यांच्या समर्थनार्थ रॅली आणि जाहीर सभा आयोजित केल्या होत्या. पण शेवटी विजय भाजपला मिळाला.
मिल्कीपूरमधील बहुतेक मतदार अनुसूचित जातीचे आणि मागासवर्गीय आहेत. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत मिल्कीपूरमधून सपाचे अवधेश प्रसाद विजयी झाले होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अयोध्या मतदारसंघ जिंकल्यानंतर ते खासदार झाल्याने जागा रिक्त झाली होती. त्यामुळेच इथे पोटनिवडणूक घेण्यात आली. पण आता भाजपने इथे दणदणीत विजय मिळविला आहे.