नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu)यांच्या अभिभाषणावर उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (दि.9) राज्यसभेत दाखल झाले. मोदींचं भाषण सुरू होण्यापूर्वीच विरोधी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ सुरू केल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांच्या घोषणाबाजीतच नरेंद्र मोदींनी बोलायला सुरुवात केल्याचं दिसून आलं.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, सभागृहात जे काही घडते ते देश गांभीर्यानं ऐकतो आणि गांभीर्याने घेतो. पण अशा महत्त्वाच्या सभागृहातील काही लोकांच्या भाषणामुळं सभागृहाचीच नव्हे तर देशाची निराशा होत आहे, हेही दुर्दैव आहे.
यावेळी ते म्हणाले की, त्यांच्याकडं चिखल होता, माझ्याकडं गुलाब होता, या प्रकारातील सदस्यांना मी म्हणेन की, त्यांच्याकडं जे काही होतं, ते त्यांनी सोडून दिलं. तुम्ही जितका चिखल टाकाल तितकं कमळ फुलेल. त्यांनी कमळ उमलण्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष योगदान दिल्याबद्दल मी त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो असंही यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसनं सहा दशकं देशाचं वाटोळं केलंय. देशाच्या प्रश्नांवर कायमचं उत्तर शोधण्याचा काँग्रेसनं कधीच प्रयत्न केला नाही. 60 वर्षात काँग्रेसनं देशात खड्डेच खड्डे खोदून ठेवलेत, अशी खोचक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावेळी सत्ताधाऱ्यांनी दाद दिली तर विरोधीपक्षातील खासदारांनी घोषणाबाजी करतच आपला विरोध कायम दाखवून दिला. भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केलीय.
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी जनतेला अनोखं गिफ्ट
मोदी म्हणाले, मागील 9 वर्षात आम्ही देशातील अडचणींवर कायमचा उपाय शोधण्याचा प्रयत्न केलाय. अडचणींपासून आम्ही पळणारे नाहीत, त्यावर उपाय शोधणारे असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं. देशाच्या प्रश्नांवर आम्ही नेहमीच कायमची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केलाय. देशात कमळ फुलवण्यात विरोधकांचं मोठं योगदान असल्याचंही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं.