मान्सूनची आनंदवार्ता! अंदमानात वेळेआधी धडकण्याचे संकेत; महाराष्ट्राला उष्णतेतून लवकर दिलासा मिळणार?

बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे नैर्ऋत्य मान्सूनला वेग मिळणार असून तो लवकरच अंदमानात दाखल होऊ शकतो.

Untitled Design 7

Untitled Design 7

Monsoon will arrive early this year : राज्यात एकीकडे प्रचंड उष्णतेचा तडाखा आणि कोकणात असह्य उकाड्याने नागरिक हैराण झालेले असतानाच दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा मान्सूनचे अंदमानातील आगमन सरासरीपेक्षा आधी होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. खासगी हवामान संस्था ‘स्कायमेट’च्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे नैर्ऋत्य मान्सूनला वेग मिळणार असून तो लवकरच अंदमानात दाखल होऊ शकतो.

हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार, 12 आणि 13 मे दरम्यान विषुववृत्तीय प्रदेशाजवळ तसेच बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पश्चिम भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या प्रणालीमुळे विषुववृत्तीय वाऱ्यांचा वेग वाढेल आणि मान्सूनच्या प्रगतीला पोषक वातावरण निर्माण होईल. यापूर्वी मान्सून 14 ते 22 मेदरम्यान अंदमानात पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र आता तो सरासरी वेळेच्या आधीच दाखल होण्याचे संकेत मिळत आहेत.

अंदमानात मान्सून दाखल झाल्यानंतर साधारणपणे पुढील 21 दिवसांत तो कोकण किनारपट्टीपर्यंत पोहोचतो. त्यामुळे अंदमानातील आगमन लवकर झाल्यास महाराष्ट्रातही मान्सून वेळेवर किंवा अपेक्षेपेक्षा लवकर दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भारतीय हवामान विभागानेही 14 ते 20 मेदरम्यान अंदमान समुद्र परिसरात नैर्ऋत्येकडील वारे सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता मान्सूनच्या पुढील हालचालींकडे लागले आहे.

Maharashtra Weather : मुंबई, कोकणासह ‘या’ भागात आज उष्णेतेची लाट; यलो अलर्ट जारी

दरम्यान, राज्यभरात उष्णतेची तीव्र लाट कायम असून अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा चाळीशीपार गेला आहे. पालघर, कल्याण आणि डोंबिवली परिसरात तापमान 40 ते 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. कोकण किनारपट्टीवर वाढलेल्या आर्द्रतेमुळे उकाड्याची तीव्रता अधिक जाणवत असून नागरिक अक्षरशः घामाघूम झाले आहेत. रायगड जिल्ह्यातही तापमान 39 अंशांवर पोहोचले असताना शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या दरम्यान वीज पडून एका 14 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे मान्सूनच्या प्रतीक्षेबरोबरच अवकाळी पावसाचे संकटही नागरिकांसमोर उभे राहिले आहे.

दुसरीकडे वाढत्या तापमानाचा परिणाम राज्यातील पाणीस्थितीवरही दिसून येत आहे. वाशिम जिल्ह्यातील अनेक जलस्रोत कोरडे पडल्याने तब्बल 33 गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाने 29 विहिरी आणि 6 खासगी बोअरवेल तात्पुरत्या ताब्यात घेतल्या असून त्यामार्फत संबंधित गावांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मंगरूळपीर तालुक्यात सर्वाधिक 10 गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे.

एकीकडे मान्सूनच्या आगमनाची आशा आणि दुसरीकडे उष्णतेचा वाढता कहर, अशा दुहेरी परिस्थितीत महाराष्ट्रातील नागरिक सध्या दिलासा देणाऱ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

Exit mobile version