7 दशकांची परंपरा मोडली! एका मुलाची आई बनली ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेचे नियम नेमके काय बदलले?

एका मुलाची आई असलेल्या जेनिफर बॅरेटोने मिस युनिव्हर्सचा मुकुट जिंकत इतिहास घडवला; स्पर्धेचे जुने नियमही चर्चेत आले.

News Photo   2026 11 25T153450.207

Miss Universe 2026 Winner

Miss Universe 2026 Winner : ‘मिस युनिव्हर्स’ या स्पर्धेच्या नावावरूनच अविवाहित महिलांसाठी ही स्पर्धा असल्याचा समज अनेक वर्षांपासून होता. मात्र, आता या स्पर्धेचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. 24 नोव्हेंबर 2026 रोजी सॅन जुआन येथे पार पडलेल्या 75 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत पोर्तो रिकोच्या जेनिफर बॅरेटोने विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, हा किताब जिंकणारी ती पहिली विवाहित महिला आणि पहिली माता ठरली आहे. तिच्या ऐतिहासिक विजयामुळे मिस युनिव्हर्सच्या बदललेल्या नियमांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

मिस युनिव्हर्स स्पर्धेचा प्रवास 1952 मध्ये अमेरिकेतील लाँग बीच येथून सुरू झाला. या स्पर्धेच्या पहिल्या पर्वात फिनलंडच्या आर्मी कुसेला हिने विजेतेपद मिळवले होते. मात्र, कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच विवाह करण्यासाठी तिने आपला मुकुट सोडला होता. त्यानंतर अनेक दशके या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महिलांनी अविवाहित असणे आवश्यक होते. एवढेच नव्हे, तर विजेतेपद मिळाल्यानंतरही संपूर्ण कार्यकाळात अविवाहित राहण्याची अट होती.

या जुन्या नियमांनुसार ऑगस्ट 2022 पर्यंत केवळ 18 ते 28 वयोगटातील अविवाहित महिलांनाच स्पर्धेत सहभागी होता येत होते. ज्या महिलांचे यापूर्वी लग्न झाले आहे किंवा ज्यांना मुले आहेत, त्यांना स्पर्धेत प्रवेश दिला जात नव्हता. गर्भवती महिलांनाही या स्पर्धेपासून दूर ठेवण्यात आले होते. त्यामुळे जवळपास सात दशकांपासून मिस युनिव्हर्स स्पर्धेत वैवाहिक स्थिती आणि मातृत्वाबाबत कठोर निकष लागू होते.

मात्र, बदलत्या काळानुसार मिस युनिव्हर्स आयोजकांनी या पारंपरिक नियमांमध्ये मोठे बदल केले. ऑगस्ट 2022 नंतर विवाहित महिला आणि मातांनाही स्पर्धेत सहभागी होण्याचा मार्ग खुला झाला. त्यामुळे सौंदर्य स्पर्धेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून महिलांच्या वैयक्तिक आयुष्याऐवजी त्यांच्या क्षमता आणि व्यक्तिमत्त्वाला महत्त्व मिळू लागले आहे. जेनिफर बॅरेटोच्या विजयाने या बदलाची ऐतिहासिक नोंद झाली असून मिस युनिव्हर्स स्पर्धेतील जुन्या परंपरेला पूर्णविराम मिळाल्याचे चित्र आहे.

Exit mobile version