Muslim population in India rise to 20 percent, Hindu proportion to decline by 3 percent Pew Research Center estimate : जगभरातील लोकसंख्येवर संभाव्य अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामध्ये विविध आकडेवारी समोर आली आहे. प्यू रिसर्च सेंटरने हा अभ्यास केला आहे. ज्यामध्ये समोर आलं आहे की, इस्लाम हा लवकरच जगातील सर्वात मोठा धर्म ठरू शकतो आणि 2035 पर्यंत ख्रिश्चन धर्माला मागे टाकण्याची शक्यता आहे. तसेच या अभ्यासानुसार, 2070 पर्यंत भारताच्या एकूण लोकसंख्येतील हिंदूंचे प्रमाण 79 टक्क्यांवरून 76 टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. तर मुस्लिमांचे प्रमाण 15 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत वाढू शकते.
बाळासाहेबांचा फोटो फाडला, ठाकरे गट संतापला; मुंबईत आंदोलन, शायना एन. सी. यांनी मागितली माफी!
प्यू रिसर्च सेंटरच्या अंदाजानुसार, सध्याचे लोकसंख्यावाढीचे कल कायम राहिल्यास 2070 पर्यंत जगभरातील मुस्लिमांची संख्या 360 कोटींपेक्षा अधिक होईल. तर ख्रिश्चनांची संख्या 300 कोटींपेक्षा थोडी कमी असेल. त्याचबरोबर 2070 पर्यंत अमेरिका हा ख्रिश्चनबहुल देश राहणार नसल्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय, इंडोनेशियाला मागे टाकत पाकिस्तान जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश बनेल, तर भारत दुसऱ्या क्रमांकावर येईल, असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. बांगलादेशातील मुस्लिम लोकसंख्येतही वाढ होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी गुड न्युज! 12 व्या वेतन कराराने भरघोस पगारवाढ मिळणार
भारतासह जगभरातील हिंदूंची एकूण संख्या 2020 मध्ये 120 कोटी होती. ती 2070 पर्यंत वाढून 140 कोटी होण्याचा अंदाज आहे. आगामी अनेक दशकांपर्यंत भारतात हिंदूंचे बहुमत कायम राहील, मात्र देशाच्या धार्मिक लोकसंख्येच्या स्वरूपात हळूहळू बदल होण्याची शक्यता असल्याचे अहवालात म्हटले आहे. 2020 ते 2070 या कालावधीत जगाच्या एकूण लोकसंख्येत 29 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. याच काळात ख्रिश्चनांच्या संख्येत 30 टक्के, तर मुस्लिमांच्या संख्येत तब्बल 80 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. प्यू रिसर्च सेंटरच्या अंदाजानुसार, प्रमुख धर्मांमध्ये नव्या सदस्यांची भर पडण्यामागे धर्मांतर करणाऱ्या प्रौढ व्यक्तींपेक्षा त्या धार्मिक समुदायांमध्ये जन्माला येणारी मुले हे सर्वात मोठे कारण आहे.
कोणत्या धर्मांचा अभ्यास करण्यात आला?
प्यू रिसर्च सेंटरने केलेल्या या अभ्यासात जगातील 201 देश आणि प्रदेशांचा समावेश करण्यात आला आहे. या देशांमध्ये जगातील एकूण लोकसंख्येपैकी 99.98 टक्के लोक राहतात. 2020 ते 2070 या कालावधीत जगातील सात धार्मिक गटांचे भौगोलिक वितरण आणि त्यांच्या लोकसंख्येत होणारे संभाव्य बदल या अभ्यासात तपासण्यात आले आहेत. यामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू, हिंदू, बौद्ध आणि इतर धार्मिक गटांचा समावेश आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष ‘प्यू-टेम्पलटन ग्लोबल रिलिजियस फ्युचर्स प्रोजेक्ट’चा भाग आहेत. जगातील धार्मिक बदलांचा आणि त्यांचा समाजावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
मात्र, या निष्कर्षांच्या माध्यमातून जगात भविष्यात होणाऱ्या प्रत्येक बदलाचे भाकीत करण्याचा संस्थेचा उद्देश नाही. कारण सामाजिक-आर्थिक परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती, युद्ध आणि अशा अनेक घटनांचा एखाद्या धार्मिक समुदायाच्या लोकसंख्येवर परिणाम होऊ शकतो, असे संस्थेने स्पष्ट केले आहे.
मुस्लिमांमध्ये जन्मदर सर्वाधिक; लोकसंख्यावाढीचे प्रमुख कारण
अहवालानुसार, मुस्लिम समुदायामध्ये मुलांचा जन्मदर सर्वाधिक आहे. त्यामुळेच मुस्लिम हा जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारा धार्मिक समुदाय ठरला आहे. प्यू रिसर्च सेंटरच्या आकडेवारीनुसार, 2020 ते 2025 या कालावधीत मुस्लिम महिलांचा प्रजनन दर प्रति महिला सरासरी 3.1 मुले इतका होता. तर ख्रिश्चन महिलांमध्ये हा दर 2.5 इतका होता. इतर सर्व धार्मिक गटांतील महिलांचा सरासरी प्रजनन दर 1.6 इतका नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, लोकसंख्येचे प्रमाण स्थिर ठेवण्यासाठी प्रत्येक महिलेचा प्रजनन दर साधारणपणे 2.1 असणे आवश्यक मानले जाते. यापेक्षा कमी प्रजनन दर असल्यास पुढील पिढीत लोकसंख्या कमी होण्याची शक्यता असते. जगाच्या एकूण लोकसंख्येत होणाऱ्या वाढीच्या तुलनेत दोन्ही प्रमुख धार्मिक समुदायांची लोकसंख्याही वाढत राहण्याचा अंदाज आहे.
भारतात हिंदूंची संख्या 17.6 कोटींनी वाढणार
सध्याचे लोकसंख्याशास्त्रीय कल कायम राहिल्यास 2020 ते 2070 या 50 वर्षांच्या कालावधीत भारतातील हिंदूंची संख्या 17.6 कोटींनी वाढण्याचा अंदाज आहे. 2020 मध्ये भारताच्या एकूण लोकसंख्येत मुस्लिमांचे प्रमाण 15.2 टक्के होते. 2070 पर्यंत हे प्रमाण वाढून 19.6 टक्के होण्याची शक्यता आहे. भारताबाहेरील हिंदू लोकसंख्येत होणाऱ्या वाढीचा मोठा हिस्सा पाकिस्तान आणि अमेरिकेतून येण्याचा अंदाज आहे. पाकिस्तानमध्ये हिंदूंची संख्या 50 लाखांपेक्षा अधिक, तर अमेरिकेत 40 लाखांपेक्षा अधिक वाढू शकते. प्यू रिसर्च सेंटरच्या अंदाजानुसार, अमेरिकेत जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी हिंदू लोकसंख्या असेल. नेपाळ आणि भारत हे दोनच देश असे असतील, जिथे हिंदूंचे बहुमत कायम राहील.
