Download App

भाजपला टॉनिक! निवडणुकीआधीच आणखी एक बड्या नेत्याची ‘एनडीए’त एन्ट्री

UP Politics : लोकसभा निवडणुकांच्या आधी उत्तर प्रदेशच्या राजकारणात रोज नवीन घडामोडी घडत आहेत. समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांना द्वेषपूर्ण वक्तव्याप्रकरणी न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर सपाचे आमदार दारासिंह यांनी आमदारकीचा राजीनामा देत अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांना दुसरा झटका दिला. त्यानंतर आता राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना घडली आहे.

राज्यातील दिग्गज नेते तथा सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष ओपी राजभर (OP Rajbhar) यांनी पुन्हा एनडीएत प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशाने निवडणुकीआधी भाजपाला टॉनिकच मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली होती. त्यानंतर शाह यांनी ट्विट करत राजभर हे एनडीएमध्ये दाखल झाल्याची घोषणा केली आहे. शाह यांनी राजभरबरोबरील फोटो शेअर करत राजभर यांचे एनडीए परिवारात स्वागत करत आहोत, असे ट्विट केले आहे.

तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुकांचा विचार करता राजभर लवकरच भाजपाबरोबर जातील अशा चर्चा सुरू होत्या. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांनी दिल्लीत शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता अमित शाह यांनी ट्विट केल्यानंतर राजभर एनडीएत दाखल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आज राजभर स्वतः पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाची माहिती देणार असल्याचे समजते.

‘देशात 8० कोटींहून अधिक इंटरनेट यूजर्स, देशासमोर सायबर सुरक्षेचे आव्हान; अश्विनी वैष्णव यांची माहिती

आता उत्तर प्रदेशात लढाईच नाही – राजभर

यानंतर राजभर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आम्ही एनडीए सोबत गेल्याने राज्यात आता कोणतीही लढाई शिल्लक राहिलेली नाही. आता कोणतीही आघाडी जरी तयार झाली तरी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील आघाडीसमोर त्यांचा टिकाव लागणार नाही. विरोधी पक्षांवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. विपक्षी एकतेचा घटक बनण्याच्या प्रश्नावर राजभर म्हणाले, आणखी किती दिवस आम्ही वाट पाहणार होतो? आम्ही विरोधी पक्षातील नेत्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.

समाजवादी पक्षात पडलेल्या फुटीच्या प्रश्नावर ते म्हणाले, भाजपा आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टी आणि जे आमचे अन्य सहकारी पक्ष आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशात आता लढाई नावाची गोष्ट शिल्लक राहिलेली नाही. आता तुम्ही कितीही नव्या आघाडीच्या गप्पा मारल्या तरी प्रत्यक्षात काहीच शिल्लक राहिलेले नाही.

Tags

follow us