अमित शाहांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ दिल्लीत, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटलांच्या मंत्रिपदाची चर्चा!

शिष्टमंडळात मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री छगन भुजबळ, खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या समावेश होता.

Untitled Design 79

Untitled Design 79

NCP delegation in Delhi to meet Amit Shah : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काल रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांचं एक शिष्टमंडळ दिल्लीत दाखल झालं होतं. या शिष्टमंडळात मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री छगन भुजबळ, खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह दिलीप वळसे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या समावेश होता. मात्र, या भेटीमागचं अधिकृत कारण अद्याप समोर आलेलं नाही. त्यामुळे या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

केंद्र आणि राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात संभाव्य फेरबदल आणि विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. विशेषतः धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी यापूर्वी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नव्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. आता त्यांना पुन्हा मंत्रिपदाची संधी मिळणार का, याबाबत त्यांच्या समर्थकांमध्ये उत्सुकता आहे.

मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये तेजी, ऑक्टोबरमध्ये मालमत्ता नोंदणीत 9 टक्क्यांची वाढ

दुसरीकडे, अनुभवी नेते दिलीप वळसे पाटील यांना देखील नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळावं, अशी अपेक्षा राष्ट्रवादीच्या काही समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, या दोघांच्या मंत्रिपदाबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. या भेटीमागे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असल्याची चर्चा आहे, तो म्हणजे अर्थखातं. अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थखात्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवली आहे. मात्र, हे खातं पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्यात यावं, अशी मागणी पक्षाच्या नेत्यांकडून होत असल्याचं सांगितलं जात आहे. याच मुद्द्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती आहे.

आता थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने अर्थखात्याच्या वाटपाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला अर्थखातं पुन्हा मिळणार का, हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत विधान परिषद पदवीधर मतदारसंघातील पराभवाचा आढावा, आगामी मंत्रिमंडळ विस्तार, पक्षातील संघटनात्मक स्थिती आणि अर्थखात्यासह महत्त्वाच्या राजकीय विषयांवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Pune Rain : पुण्यात पावसाची संततधार ; सकाळच्या मुसळधार सरींमुळे नागरिकांची धावपळ

एकीकडे अमित शाह यांच्यासोबत झालेली भेट, दुसरीकडे अर्थखात्यासाठी सुरू असलेली चर्चा आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची संभाव्य बैठक, यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे. आता या दिल्ली भेटीतून राष्ट्रवादीच्या पदरात नेमकं काय पडणार, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिपदाची संधी मिळणार का आणि अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Exit mobile version