Hindustan Petroleum Company : अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये गेल्या अकरा दिवसांपासून सुरु असणाऱ्या युद्धामुळे भारतासह जगातील अनेक देशात गॅस आणि तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. अनेक देशात तेल पुरवठा विस्कळीत झाल्याने याचा थेट फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसताना दिसत आहे. तर दुसरीकडे भारतात देखील अनेक शहरात गॅस पुरवठा विस्कळीत होताना दिसत आहे.
देशातील अनेक शहरात गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याने घरगुती गॅसच्या (LPG Gas) किंमतीमध्ये 60 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर व्यावसायिक गॅसच्या (Commercial Gas) किंमतीमध्ये देखील 115 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. अचानक झालेल्या या दरवाढीमुळे देशात गॅस पुरवठा अगदी कमी प्रमाणात शिल्लक असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. तर आता देशात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही असा मेसेज हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीकडून (Hindustan Petroleum Company) सर्व ग्राहकांना पाठवण्यात आले आहे.
कंपनीने (HPCL) दिलेल्या माहितीनुसार, देशात इंधनाचा तुटवडा नाही. देशभरात गॅस आणि इतर इंधनाचा भरपूर साठा उपलब्ध असल्याची माहिती हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीने आपल्या ग्राहकांना दिली आहे. तसेच नागरिकांनी चिंता करू नये असे आवाहन देखील कंपनीकडून ग्राहकांना करण्यात आले आहे.
तर दुसरीकडे मुंबईत जर गॅस पुरवठा सामान्य झाला नाहीतर पुढील दोन दिवसात हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बंद करावे लागणार असल्याचा दावा हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स असोसिएशनचे अध्यक्ष विजय शेट्टी (Vijay Shetty) यांनी केला आहे.
गॅसचा तुटवडा आणखी वाढत आहे. जर परिस्थिती अशीच राहिली तर मुंबईतील सर्व रेस्टॉरंट पुढील दोन दिवसांत बंद करावे लागू शकतात. सध्या असोसिएशनच्या सुमारे 10 ते 12 टक्के सदस्यांना गॅस पुरवठ्याची समस्या येत असल्याचा दावा इंडिया हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स असोसिएशनचे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी केला आहे. तर आता परिस्थिती वेगाने बिकट होत आहे.
भारतीय शेअर बाजाराची दमदार सुरुवात; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा-
मंगळवारपर्यंत हे संकट 60 टक्के रेस्टॉरंटे्सपर्यंत पोहोचू शकते आणि बुधवारपर्यंत 100 टक्के रेस्टॉरंट्स प्रभवित होण्याची शक्यता आहे. आम्ही या मुद्द्याबाबत पेट्रोलियम मंत्र्यांना पत्र लिहिले आहे. महाराष्ट्र नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशीही संपर्क साधण्यात आला असं देखील यावेळी विजय शेट्टी म्हणाले.
