NTA NEET UG Exam Pattern Changed From Next Year : नीट यूजी परीक्षेसंदर्भात एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर आता पुन्हा ही परीक्षा 21 जून रोजी घेतली जाणार असून, पुढील वर्षापासून नीट परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली आहे. पुढील वर्षापासून, नीट यूजी परीक्षा सीबीटी (CBT) पॅटर्नचा वापर करून ऑनलाइन घेतली जाईल. यामुळे नीट यूजी पेपरफुटीसारख्या घटना टाळण्यास मदत होणार असल्याचा विश्वास केंद्राला आहे.
सीबीआय या प्रकरणाची सखोल चौकशी करेल. जे फसवणूक करण्याचा प्रयत्न करतील त्यांना शिक्षा केली जाईल. विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याचा आर्थिक भार पडू नये, याची काळजी घेतली जात आहे. त्यांनी पुढे सांगितले की, सुधारणेसाठी अनेक सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यांनी एनटीए (NTA) मध्ये सुधारणांच्या गरजेवर भर दिला आणि सुधारणा करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी असेही सांगितले की, पुढील वर्षीची नीट (NEET) परीक्षा संगणक-आधारित म्हणजेच ऑनलाइन असेल.
नीट परीक्षेत कोणते बदल करण्यात आले आहेत?
– सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनटीएची स्थापना झाली, जी 1 कोटी मुलांच्या परीक्षा आयोजित करते.
– एनटीएने विद्यार्थ्यांची फी परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
– विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी त्यांच्या पसंतीचे शहर निवडण्याचे स्वातंत्र्य दिले जाणार
– ओएमआरमध्ये सही करण्यासाठी पूर्वी तेवढाच वेळ लागायचा, पण आता परीक्षेची वेळ १५ मिनिटांनी वाढवली आहे.
– प्रवेशपत्रे 14 जून पर्यंत विद्यार्थांपर्यंत पोहोचणार
– हवामानाची परिस्थिती देखील विचारात घेतली जात आहे.हवामान अनुकूल नसल्यास, आम्ही त्यानुसार निर्णय घेऊ.
शिक्षण माफियाने 21 जूनच्या नीट परीक्षेपासून दूर राहावे
शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की, अनियमितता करणाऱ्यांविरुद्ध झिरो टॉलरन्स धोरण अवलंबले जाणार आहे. ही परीक्षा माफियांच्या विरोधातली एक मोठी लढाई आहे. नीट परीक्षेला आव्हान दिले जात आहे, त्यामुळेच तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. आता सीबीआय त्रुटींची चौकशी करेल. आम्ही या परीक्षेत गैरप्रकार होऊ देणार नसल्याचे सांगत शिक्षण माफियांनी 21 जून रोजी होणाऱ्या परीक्षेपासून दूर राहावे, अन्यथा त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल असा थेट इशारा प्रधान यांनी दिला आहे.
