Jagannath Temple : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडूच्या प्रसादात (Laddu Prasad) जनावरांच्या चरबीचा वापर करण्यात आला असा धक्कादायक आरोप आंध्रा प्रदेशचे मुख्यंमत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला होता. यानंतर देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे.
तर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार ओडिशा सरकारने मोठा निर्णय घेत जगन्नाथ मंदिरात प्रसाद तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपाचा दर्जा तपासण्याचा निर्णय घेतला. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.
माहितीनुसार, ओडिशा सरकारने तिरुपती बालाजी मंदिरात लाडू बनवण्यासाठी जनावरांच्या चरबी असलेले तूप वापरल्याच्या आरोपानंतर हा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाबाबत पुरीचे जिल्हाधिकारी सिद्धार्थ शंकर स्वैन म्हणाले की, जगन्नाथ मंदिरात असे कोणतेही आरोप झाले नसले तरी ‘कोठा भोग’ (देवतांना अर्पण) आणि ‘बरारी भोग’ (प्रसाद म्हणून) तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या वापराबाबत प्रशासन जागरूक असून तुपाची गुणवत्ता तपासण्याचा निर्णय घेतला आहे. ओडिशा मिल्क फेडरेशन (OMFED) पुरी मंदिरासाठी तुपाचा एकमेव पुरवठादार अशी माहिती देखील त्यांनी दिली.
तसेच कोणत्याही प्रकारची भेसळ होण्याची भीती कमी करण्यासाठी सरकारने OMFED द्वारे पुरवल्या जाणाऱ्या तुपाचे प्रमाण तपासण्याचा निर्णय घेतला आहे असं देखील ते म्हणाले. सरकारने घेतलेल्या या निर्णयानुसार आता मंदिरात प्रसाद तयार करणाऱ्या सेवकांशीही याबाबत चर्चा करण्यात येणार आहे असेही जिल्हाधिकारी सिद्धार्थ शंकर स्वैन म्हणाले.
तर सेवक जगन्नाथ स्वेन महापात्रा यांनी सांगितले की, पूर्वी मंदिर परिसरात दिवे लावण्यासाठी भेसळयुक्त तूप वापरण्यात येत होते पण आता दिवे लावण्यासाठी फक्त शुद्ध तुपाचा वापर करण्यात येणार आहे आणि आम्ही मंदिराच्या मुख्य प्रशासकांना तुपाची सखोल चौकशी करण्याची विनंती करणार आहे असं ते म्हणाले.
तिरुपती मंदिरात भाविकांसाठी तयार करण्यात येणाऱ्या लाडूच्या प्रसादात जनावरांच्या चरबीचा वापर वायएसआरसीपीच्या सरकारच्या काळात करण्यात येत होता असा धक्कादायक आरोप आंध्रा प्रदेशचे मुख्यंमत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला होता.