Oracle’s data center plans cause major upheaval : जागतिक आयटी क्षेत्रात खळबळ उडवून देणारी मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे ओरॅकल या दिग्गज आयटी कंपनीने हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याची. काही अहवालांनुसार ही कपात तब्बल 30 हजारांपर्यंत जाऊ शकते. विशेष म्हणजे, कंपनीने नुकतीच मजबूत महसूल वाढ नोंदवली असताना देखील हा निर्णय घेतल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या कपातीचा परिणाम भारतासह मेक्सिकोसारख्या अनेक देशांमध्ये दिसून आला आहे. भारतातच जवळपास 30 हजार कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 12 हजारांवर गंडांतर आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे भारतीय आयटी क्षेत्रातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या मोठ्या निर्णयामागे कंपनीची बदलती रणनीती कारणीभूत असल्याचं स्पष्ट होत आहे. विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सेंटरच्या क्षेत्रात ओरॅकल मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. कंपनीने पुढील पाच वर्षांत तब्बल 156अब्ज डॉलर्सचा करार केला असून हा करार प्रामुख्याने ओपन एआय डेटा सेंटरसाठी उभारण्यासंबंधी असल्याचं सांगितलं जात आहे.
या प्रकल्पासाठी ओरॅकलला जवळपास 30 लाख अत्याधुनिक चिप्स खरेदी कराव्या लागणार आहेत. त्यामुळे कंपनीचा खर्च प्रचंड वाढला आहे. दोन वर्षांपूर्वी सुमारे 6.9 अब्ज डॉलर्स असलेला वार्षीक खर्च आता थेट 50 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. या वाढत्या खर्चाचा भर संभाळण्यासाठीच कंपनी इतर क्षेत्रांमध्ये, विशेषतः कर्मचारी कपात करत असल्याचं दिसून येतं.
याशिवाय ओरॅकल वर सध्या 108 अब्ज डॉलर्सहून अधिक कर्ज आहे. या कर्जाचा दबाव देखील कंपनीवर मोठ्या प्रमाणावर आहे. गुंतवणूक बँक टीडी कोवेनच्या अंदाजानुसार, या कर्मचाऱ्यांच्या कपातीमुळे ओरॅकलला 8 ते 10 अब्ज डॉलर्सपर्यंत रोख प्रवाह मोकळा करता येईल. हा निधी एआय आणि डेटा सेंटर प्रकल्पांसाठी वापरण्याची योजना आहे.
फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचे धडकेबाज 6 निर्णय; 12 वर्षांनंतर दिव्यांग विद्यार्थ्यांबाबत घेतला मोठा निर्णय
कंपनीचे मार्च महिन्यात 2.1 अब्ज डॉलर्सचा पुनर्रचना आराखडा देखील सादर केला होता, त्यापैकी जवळपास 1 अब्ज डॉलर्स आधीच खर्च करण्यात आले आहेत. त्यातच कर्ज विम्याचा खर्च वाढल्याने आणि बँकिंग क्षेत्रातील काही संस्थांनी कर्ज देण्यास नकार दिल्याने आर्थिक ताण अधिकच वाढला आहे. बारक्लेजने तर ओरॅकलच्या कर्जाचे मूल्यांकन कमी करत जंक दर्जाच्या जवळ पोहोचल्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, ओरॅकलच्या मोठ्या ग्राहकांपैकी एक असलेल्या ओपन एआयकडून देखील अनिश्चिततेचे संकेत मिळत आहेत. ओपन एआय आणि एनव्हीडीयाच्या अधिक प्रगत आणि वेगवान चिप्सकडे वळण्याचा विचार करत असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे ओरॅकलने उभारलेल्या डेटा सेंटरची पूर्ण क्षमता वापरली जाईल की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील झपाट्याने होणाऱ्या बदलांमुळे चिप्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर लवकरच कालबाह्य होण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत ओरॅकलने केलेली मोठी गुंतवणूक भविष्यात कितपत फायदेशीर ठरेल, यावर देखील चर्चा सुरू आहे.
तथापि, या नकारात्मक घडामोडीनंतर देखील ओरॅकलच्या शेअरमध्ये 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीने अलीकडेच 17.2 अब्ज डॉलर्सचा तिमाही महसूल नोंदवला, जो गेल्या 15 वर्षांतील सर्वाधिक आहे. मात्र, दीर्घकालीन दृष्टीने कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. सप्टेंबर 2025 मध्ये 346 डॉलर्सवर पोहोचलेला शेअर सध्या सुमारे 146 डॉलर्सवर आला आहे.
या घसरणीचा परिणाम कंपनीचे संस्थापक लॅरी इलिसन यांच्या संपत्तीवर देखील झाला असून त्यांच्या संपत्तीत मोठी घट झाल्याची माहिती आहे. एकूणच पाहता, ओरॅकल सध्या मोठ्या संक्रमणाच्या टप्पातून जात आहे. पारंपरिक व्यवसायातून बाहेर पडत कंपनी एआय आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरकडे झपाट्याने वळत आहे. मात्र, या बदलाची किंमत हजारो कर्मचाऱ्यांना नोकरी गमावून मोजावी लागत आहे. येणाऱ्या काळात ओरॅकलच्या या धोरणाचा कंपनीच्या वाढीवर आणि जागतिक आयटी क्षेत्रावर काय परिणाम होतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
