Jammu Kashmir Terror Attack : जम्मू काश्मीरातील पहलगाम येथे काल (Pahalgam Terror Attack) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला. हल्ल्यात या अतिरेक्यांनी हिंदू धर्मियांना टार्गेट केलं. त्यांची धार्मिक ओळख आणि नावं विचारून (Jammu Kashmir Attack) त्यांना गोळ्या घातल्या. भारताचं स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जाणारं पहलगाम रक्तरंजित झालं. या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटकांचाही मृत्यू झाला. यात पु्ण्यातील दोन तर डोंबिवलीतील मावसभावंडांचा दुर्दैवी अंत झाला.
हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा पहलगाममधील हल्ल्यात मृत्यू झाला. संजय लेले शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांचे मेहुणे होते. तिघेजण कुटुंबियांसह काश्मीरात फिरण्यासाठी गेले होते. त्यांची ही सहल मात्र अखेरची ठरली. हे तिघे डोंबिवली पूर्व पश्चिम भागातील नवापाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली या भागातील रहिवासी आहेत. संजय लेले यांच्या मुलाच्या हाताच्या बोटाला गोळी घासून गेली. या हल्ल्यात कुटुंबातील बाकी सदस्य बचावले आहेत.
15 वर्षे, 11 दहशतवादी हल्ले अन् 227 बळी; काश्मीरात अतिरेक्यांनी पाडला रक्ताचा सडा
या धक्कादायक घटनेमध्ये पुण्यातल्या दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहे. तर या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 2 जण जखमी झाले आहेत. त्यातील एक माणिक पटेल हे पनवेलचे आहेत. एस. भालचंद्रराव हे दुसरे जखमी आहेत. सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. तर दुसरीकडे जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या आम्ही संपर्कात आहोत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे.
पुण्यातील आसावरी जगदाळे, प्रगती जगदाळे, संतोष जगदाळे, कौस्तुभ गणबोटे, संगिता गणबोटे हे सर्वजण काश्मीरात फिरण्यासाठी म्हणून गेले होते. जगदाळे कुटुंबीय कर्वेनगर येथे तर गणबोटे कुटुंबीय रास्ता पेठ भागात राहतात. पनवेल येथील दिलीप देसले यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
दहशतवादाविरोधातील लढाईत आम्ही भारताबरोबर; पहलगाम हल्लानंतर अमेरिका अध्यक्ष ट्रम्प काय म्हणाले?