Download App

ईशान्य भारतासाठी ‘अष्टलक्ष्मी’ दृष्टी; अरूणाचलमध्ये ‘सेला बोगद्याचे उद्घाटन अन् मोदींकडून काँग्रेसची चिरफाड

  • Written By: Last Updated:

PM Launches World’s Longest Sela TunnelIn Arunachal Pradesh : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आसामच्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात जंगल सफारीचा आनंद घेतल्यानंतर आज (दि.9) अरुणाचल प्रदेशमधील जगातील सर्वात लांब द्वि-लेन असलेल्या ‘सेला बोगद्याचे’ उद्घाटन करण्यात आले. सेला टनल जगातील सर्वात उंच 13000 फुटांवर बनवण्यात आलेला लांब बोगदा असून, यासाठी सुमारे 825 कोटी खर्च कररण्यात आले आहेत. याची पायाभरणी 2019 मध्ये पंतप्रधान मोदींनी केली होती. यावेळी मोदींनी काँग्रेसच्या अपयशाचा पाढा वाचत जोरदार हल्लाबोल केला. संपूर्ण ईशान्येत विकासाचे काम चौपट वेगाने सुरू असल्याचेही मोदींनी सांगितले.

काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये पीएम मोदींची हत्ती अन् जंगल सफारी… पाहा फोटो

काँग्रेसवर हल्लाबोल करताना मोदी म्हणाले की, अरूणाचलमध्ये लोकसभेच्या दोनच जागा आहेत. त्यामुळे एवढं विकासाचं काम कशाला करायचं अशी काँग्रेसची भूमिका होती. जर काँग्रसने त्यांच्या सत्तेच्या कार्यकाळात ठरवलं असतं तर, सेला बोगदा याआधीच निर्माण करता आला असता. पण, काँग्रेसने सीमावर्ती भाग अविकसित ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ईशान्य भारतासाठी भाजपची दृष्टी ‘अष्टलक्ष्मी’ असून  सेला टनलची निर्मिती मोदींची गॅरंटी होती असा टोलाही मोदींनी काँग्रेसला लगावला. गेल्या 5 वर्षांत आम्ही ईशान्येच्या विकासासाठी जेवढे काम केले आहे तेवढीच गुंतवणूक आम्ही केली आहे. काँग्रेसला एवढे काम करायला 20 वर्षे लागली असती असेही मोदी म्हणाले. ‘मोदींची गॅरंटी’ तुम्ही ऐकली असेलच याचं प्रत्यक्ष उदाहरण बघायचं असेल तर, भारतीयांना अरुणाचलमध्ये पोहोचल्यावर दिसेल. संपूर्ण ईशान्य भाग याचा साक्षीदार असून, 2019 मध्ये येथे माझ्या हस्ते सेला बोगद्याची पायाभरणी करण्यात आली होती आणि आज त्याचे उद्घाटन झाले आहे. हीच मोदींची गॅरंटी असल्याचे मोदींनी उपस्थितांना ठणकावून सांगितले.

भारताचा विकसित राज्य होण्याचा राष्ट्रीय उत्सव देशभरात वेगाने सुरू आहे. आज मला विकसित ईशान्येच्या या उत्सवात ईशान्येतील सर्व राज्यांसह एकत्र सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. ईशान्येच्या विकासाची आमची दृष्टी अष्टलक्ष्मी असून, देशाचा ईशान्य भाग भारताच्या व्यापार, पर्यटन आणि दक्षिण आशिया आणि पूर्व आशियाशी इतर संबंधांमध्ये एक मजबूत दुवा बनेल असा विश्वासही मोदींनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

यावेळी मोदींच्या हस्ते 10,000 कोटी रुपयांची UNNATI योजना आणि मणिपूर, मेघालय, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेशमध्ये 55 हजार 600 कोटींच्या विकासात्मक प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली. याशिवाय दुपारी मोदींच्या हस्ते जोरहाटमध्ये अहोम जनरल लचित बारफुकन यांच्या 125 फूट उंचीच्या ‘स्टॅच्यू ऑफ शौर्य’ पुतळ्याचे उद्घाटन केले जाणार आहे. तसेच जोरहाट जिल्ह्यातील मेलेंग मेटेली येथे सुमारे 18,000 हजार कोटींच्या विकासात्मक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली जाणार आहे.

follow us