PM Narendra Modi Independence Day Speech 2024 : आज देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशवासियांना संबोधित केले. मोदी म्हणाले, देशातील नागरिकांसाठी आम्ही दीड हजारांपेक्षा जास्त कायदे रद्द केले. यामुळे लोकांचे जीवन अधिक सुसह्य झाले. किरकोळ गोष्टींसाठी सुद्धा कारावासाची शिक्षा असणारे कायदे रद्द करण्यात आले. अपराधिक कायदे बदलण्यात आले.
आता मी सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या इज ऑफ लिविंग मिशनमध्ये सहभागी व्हावे. सन 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी आम्ही शिफारसी मागितल्या आहेत. काही लोकांनी भारताला कौशल्य राजधानी बनविण्याची सूचना केली आहे. काही लोकांनी देश आत्मनिर्भर व्हावा यावर भर दिला. शासन आणि न्याय प्रणालीत सुधारणा, ग्रीनफिल्ड शहरांचे निर्माण, भारताचे स्वतःचे स्पेस स्टेशन अशा अनेक आशा भारतीय नागरिकांच्या आहेत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
दहा वर्षांत रस्ते अन् रुग्णालयांचे जाळे
मागील दहा वर्षांच्या काळात देशात रस्ते, रेल्वे, महामार्ग, स्कूल कॉलेज, रुग्णालये, मेडिकल कॉलेज, अमृत सरोवर, दोन लाख ग्रामपंचायतीत ऑप्टिकल फायबर, चार कोटी पक्की घरे अशा सुविधा निर्माण करण्यात आल्या.
मेडिकलच्या 75 हजार जागा आणखी वाढणार
वैद्यकिय शिक्षणासाठी देशातील विद्यार्थ्यांना दुसऱ्या देशात जावे लागत आहे. दहा वर्षांच्या काळात मेडिकल जागांची संख्या एक लाख झाली आहे. आगामी पाच वर्षांच्या काळात देशातील वैद्यकिय महाविद्यालयांत आणखी 75 हजार नवीन जागा उपलब्ध करून देण्यात येतील.
