मोदी-पुतिन भेटीत ‘तिरुक्कुरल’ची भेट; राजनैतिक चर्चेला मिळाला सांस्कृतिक साज, वाचा या खास पुस्तकात काय?

PM Modi Gifted Thirukkural Book to Putin : शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट झाली.

News Photo   2026 09 11T180314.108

Prime Minister Narendra Modi gifted a copy of the Thirukkural to Russian President Putin

PM Modi Gifted Thirukkural Book to Putin : भारताच्या यजमानपदाखाली होणाऱ्या 18व्या BRICS शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची शुक्रवारी नवी दिल्ली येथे द्विपक्षीय भेट झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये विविध द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा झाली. मात्र, या बैठकीतील एक विशेष बाब चर्चेचा विषय ठरली ती म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना तमिळ भाषेतील प्रसिद्ध प्राचीन ग्रंथ तिरुक्कुरल’च्या रशियन भाषेतील अनुवादाची प्रत भेट दिली. त्यामुळं भारत-रशिया संबंधांमधील राजनैतिक संवादाला साहित्य आणि संस्कृतीचीही जोड मिळाल्याचं पाहायला मिळालं.

आमदारकी पाच वर्षांची, पेन्शन मात्र आयुष्यभर ? सर्वोच्च न्यायालयाची सरकारला नोटीस

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन BRICS शिखर परिषदेसाठी शुक्रवारी नवी दिल्ली येथे दाखल झाले. भारत मंडपम येथे 12 आणि 13 सप्टेंबर रोजी 18वी BRICS शिखर परिषद होत आहे. या परिषदेत BRICS देशांमधील सहकार्य, जागतिक राजकारण, अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे. त्याआधी मोदी आणि पुतिन यांच्यात झालेल्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, दोन्ही देशांमधील पारंपरिक संबंधांच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडं लक्ष लागलं आहे.

‘तिरुक्कुरल’मध्ये नेमकं काय आहे?

पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना भेट दिलेला ‘तिरुक्कुरल’ हा तमिळ कवी आणि तत्त्वज्ञ तिरुवल्लुवर यांच्याशी संबंधित प्राचीन साहित्यग्रंथ आहे. या ग्रंथात एकूण 1,330 द्विपदी असून त्यातून नैतिकता, सद्गुण, सामाजिक आचरण, शासनव्यवस्था, अर्थकारण आणि प्रेम यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं आहे. मानवी जीवनातील विविध पैलूंवर अत्यंत संक्षिप्त स्वरूपात सखोल विचार मांडणं हे या ग्रंथाचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. त्यामुळं ‘तिरुक्कुरल’ केवळ तमिळ साहित्याचा ग्रंथ न राहता सार्वत्रिक मानवी मूल्यांचा संदेश देणारी साहित्यकृती म्हणून ओळखला जातो.

3 भाग, 133 अध्याय आणि 1,330 द्विपदी

‘तिरुक्कुरल’ची रचना ‘मुप्पाल’ या तीन प्रमुख भागांत करण्यात आली आहे. ‘अराम’मध्ये नैतिकता आणि कर्तव्याशी संबंधित 38 अध्याय व 380 द्विपदी आहेत. ‘पोरुल’मध्ये राज्यशास्त्र, शासनव्यवस्था, अर्थकारण, समाज आणि नागरिकांशी संबंधित 70 अध्याय व 700 द्विपदी आहेत. तर ‘इनबम’ किंवा ‘कामम’ या भागात प्रेम आणि मानवी भावनांवर आधारित 25 अध्याय व 250 द्विपदी आहेत. अशा प्रकारे एकूण 133 अध्याय आणि 1,330 द्विपदींच्या माध्यमातून व्यक्तीपासून राज्यव्यवस्थेपर्यंतच्या अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं आहे.

धर्माच्या पलीकडे जाणारा ग्रंथ

‘तिरुक्कुरल’चे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा कोणत्याही एका धर्म, जात किंवा प्रदेशापुरता मर्यादित नसलेला दृष्टिकोन. सद्गुण, प्रामाणिकपणा, चांगले प्रशासन, सामाजिक जबाबदारी आणि मानवी नातेसंबंध यांसारखी सार्वत्रिक मूल्ये या ग्रंथातून मांडली आहेत. त्यामुळं या साहित्यकृतीचे विविध देशांमध्ये आणि भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, रशियन, चिनी, हिंदी आणि मराठीसह 40 हून अधिक भाषांमध्ये ‘तिरुक्कुरल’ उपलब्ध असल्याचं सांगितलं जातं. रशियन भाषेतील अनुवादाचाही इतिहास जुना असून 1960 च्या दशकात अलेक्झांडर पायतीगोर्स्की आणि युरि ग्लाझोव्ह यांनी या ग्रंथाचं रशियन भाषांतर केल्याचं नमूद केलं जातं.

मोदींच्या भेटीमागे सांस्कृतिक मुत्सद्देगिरीचा संदेश

पुतिन यांना ‘तिरुक्कुरल’ची रशियन प्रत भेट देणे ही केवळ साहित्यिक भेट नसून भारताच्या सांस्कृतिक सामर्थ्याचे प्रतिनिधित्व करणारी कृती मानली जात आहे. विशेषतः शासन, नेतृत्व, नैतिकता आणि सामाजिक जबाबदारी यांसारख्या विषयांवर भाष्य करणारा हा ग्रंथ रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत भेट देणे, भारताच्या सांस्कृतिक वारशाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर परिचय करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरतं. त्यामुळं मोदी-पुतिन बैठकीत राजनैतिक मुद्द्यांसोबतच भारताची प्राचीन साहित्यपरंपरा आणि सांस्कृतिक ‘सॉफ्ट पॉवर’ही अधोरेखित झाली आहे.

Exit mobile version