नवी दिल्ली : सन २०१४ च्या आधी दहशतवाद्यांना उत्तर देण्याची ताकद संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA Government) सरकारमध्ये अजिबात नव्हती. त्यांना फक्त घोटाळे करण्यातच रस होता. त्यामुळे २०१४ च्या आधीचा भारत (India) म्हणजे ‘लॉस्ट डिकेड’ (Lost Decade) म्हणून ओळखला जाईल. तर २०१४ नंतरचा भारत हा ‘इंडिया डिकेड’ (India Decade) म्हणून ओळखला जाईल. कॉमनवेल्थ घोटाळा, टूजी घोटाळ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी पुन्हा एकदा निशाना करत काँग्रेस (Congress) पक्षावरच जोरदार हल्लाबोल केला. मात्र, अडाणी यांच्या प्रकरणावरून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केलाल्या टिकेला अथवा विचारलेल्या एकाही प्रश्नाला उत्तर दिले नाही.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर अडाणी प्रकरणावरून जोरदार टीका केली होती. त्यामुळे आज पंतप्रधान मोदी त्यावर काय उत्तर देणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. पंतप्रधान मोदी यांचे भाषण सुरु होण्यापूर्वीच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करून गोंधळ घातला. या गोंधळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. ती काँग्रेसच्या काळात झालेल्या घोटाळ्यावरून जोरदार हल्ला चढवतच पंतप्रधान मोदी म्हणाले की, सन २०१४ च्या आधी येथील सरकारमध्ये दहशतवाद्यांना उत्तर देण्याची अजिबात धमक नव्हती. काँग्रेसला फक्त घोटाळे करण्यात रस होता. कॉमनवेल्थ घोटाळा, टूजी स्पेक्ट्रमचा घोटाळा यामुळे संपूर्ण जगभर भारताची नाचक्की झाली. आम्ही २०१४ नंतर सत्तेत आल्यावर दहशतवाद्यांना जोरदार उत्तर दिले. त्यामुळे आज कोणत्याही देशाची भारताकडे वाकडया नजरेने बघण्याची ताकद नाही. कोरोना महामारीपासून शेजारी देश आज आर्थिक गर्तेत सापडले आहे. मात्र, भारत देश आज मोठया आत्मविश्वासाने प्रगती करत आहे. ते केवळ आमच्या सकारात्मक धोरणामुळे हे शक्य झाले आहे. आज जग भारताकडे आशेने पाहत आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, अहंकार असलेलं लोकं आज माझ्यावर टीका करत आहेत. मोदींना शिव्या देऊनच मार्ग निघेल असे त्यांना वाटत आहे. पण मोदी या देशातील प्रत्येक कुटुंबाचा सदस्य आहे. त्यामुळे विरोधकांचे मनःसुबे यशस्वी होणार नाही. आज त्यांनी ईडीचे आभार मानायला हवेत. कारण ईडीमुळे ते आज एकत्र आले आहेत. राहुल गांधींच्या भाषणामुळे काही जण खुश आहेत. काहींच्या भाषणातून क्षमता, योग्यता समजते असे म्हणत राहुल गांधींवर त्यांनी हल्ला केला.