Modi government announcement : दिल्लीतील मोदी सरकारला नुकतीच नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. 26 मे 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतली होती. त्यावर्षी मोदी लाटेवर स्वार होऊन भाजपने प्रचंड बहुमत मिळवले होते. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मोदीच्या त्सुनामीने विरोधी पक्षांची धुळधाण झाली होती. भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर लोकसभेच्या 303 जागा जिंकल्या होत्या.
आता एनडीएच्या सत्तेला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. या 9 वर्षात नरेंद्र मोदींनी जनतेच्या हिताच्या अनेक योजना सुरू केल्या. स्वच्छ भारत अभियानापासून ते जन धन योजनेपर्यंत, प्रत्येक भारतीयाला पक्के घर ते प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याची सुविधा, अशा योजना सुरु केल्या होत्या. या घोषणा आणि योजना पूर्ण करण्यासाठी मोदी सरकारने कालमर्यादाही निश्चित केली होती. आता प्रश्न असा पडतो की या योजनांबाबत पंतप्रधान मोदींनी ठेवलेले लक्ष्य पूर्ण झाले का?
पंतप्रधान नरेंद्र मोदींची 5 मोठी आश्वासने
1. भारतातील प्रत्येक कुटुंबासाठी पक्के घर:
केंद्र सरकारच्या या योजनांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना ही एक महत्त्वाची योजना आहे. या अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील लोकांना घरे देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ‘प्रधानमंत्री आवास योजना’ ही 2015 मध्ये पंतप्रधान मोदींनी सुरू केली होती, या योजनेचा मुख्य उद्देश 2022 पर्यंत ग्रामीण आणि शहरी भागातील भारतातील प्रत्येक कुटुंबाला पक्के घर उपलब्ध करून देणे हा होता. मात्र, निर्धारित वेळेत उद्दिष्ट पूर्ण न झाल्याने योजनेचा कालावधी सन 2024 पर्यंत वाढविण्यात आला.
2. प्रत्येक घरात 24*7 वीज:
सर्वांना पक्के घर देण्याच्या घोषणेप्रमाणेच, सप्टेंबर 2015 मध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले होते की 2022 पर्यंत भारतातील प्रत्येक घरात 24 तास वीज मिळेल. सरकारच्या या घोषणेची डेडलाइनही पूर्ण झाली आहे, मात्र आजतागायत भारतातील सर्व घरांमध्ये 24 तास वीज पोहोचू शकलेली नाही. 24 तास वीज मिळण्यापासून अनेक गावे दूर आहेत, जिथे आजपर्यंत वीज पोहोचलेली नाही.
3. पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था:
सप्टेंबर 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की येत्या चार वर्षांत म्हणजे 2022 पर्यंत भारत पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था असलेला देश बनेल. पंतप्रधान मोदींच्या या घोषणेचा पुर्नउच्चार भाजपच्या अनेक नेत्यांनी आपल्या भाषणांतून आणि निवडणूक रॅलींमध्येही केली होता. आता 2022 वर्ष संपले आहे आणि या वर्षी भारताचे पाच ट्रिलियन डॉलरचे अर्थव्यवस्थेचे लक्ष्य पूर्ण होऊ शकले नाही. देशाची अर्थव्यवस्था सध्या सुमारे तीन ट्रिलियन डॉलरवर अडकली आहे.
4. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट:
2017 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की 2022 पर्यंत देशातील सर्व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले जाईल. सन 2021 पर्यंत केंद्र सरकारच्या प्रत्येक वार्षिक अर्थसंकल्पात केंद्र सरकारने या गोष्टीचा पुर्नउच्चार केला होता. आता केंद्र सरकारने ठरवून दिलेली मुदत संपली तरी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालेले नाही.
5. बुलेट ट्रेनचे स्वप्न:
14 सप्टेंबर 2017 रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथे मुंबई ते अहमदाबाद दरम्यान त्यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाची पायाभरणी केली होती. त्यावेळी मोदी सरकारने म्हटले होते की, 15 ऑगस्ट 2022 रोजी जेव्हा देश 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे, तेव्हा देशातील पहिली बुलेट ट्रेन रुळांवर धावू लागेल. आता 2022 वर्ष संपत आले आहे, पण आता भारतात बुलेट ट्रेन किती दिवस धावणार याबाबत शंका आहे.