Rajnath Singh on Operation Sindoor : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानचा बदला घेतला. हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरच्या हद्दीत ‘एअर स्ट्राईक’ करत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. दरम्यान, ऑपरेशन सिंदूरबद्दल आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी भाष्य केलं.
आपल्या सैन्याने अचूक ऑपरेशन केलंय, अद्भूत शौर्य आणि पराक्रम दाखवत एक नवा इतिहास रचला. आम्ही हनुमानजींच्या आदर्शांचे पालन केलंय. आणि निष्पाप लोकांना मारणाऱ्यांनाच मारले आहे, असं ते म्हणाले.
दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, भारतीय सैन्याने अद्भुत धैर्य आणि शौर्य दाखवून एक नवा इतिहास रचलाय. सैन्याने अचूकता, दक्षता आणि संवेदनशीलतेने काम केलंय. आम्ही आमच्या टार्गेट अचूकतेने उद्ध्वस्त केले आणि कोणत्याही नागरी स्थानावर अजिबात हल्ला होऊ न देण्याची संवेदनशीलता देखील दाखवली. आम्ही हनुमानजींच्या आदर्शाचे पालन केले आहे, जो त्यांनी अशोक वाटिका नष्ट करताना पाळला होता. जिन मोही मारा, तिन मोही मारे… आम्ही फक्त त्यांनाच मारले ज्यांनी आमच्या निष्पाप लोकांना मारलं होतं, असं राजनाथ सिंह म्हणाले.
पाकिस्तानचा जळफळाट! भारताला प्रत्युत्तराची तयारी; पंतप्रधान शरीफ यांचा पाकिस्तानी सैन्याला फ्री हँड
राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्या सैन्याने ऑपरेशन सिंदूर सुरू करून आणि पूर्वीप्रमाणेच दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणाऱ्या तळांना उद्ध्वस्त करून योग्य उत्तर दिलंय. मी आपल्या सैन्याच्या सैनिकांचे आणि अधिकाऱ्यांचे ऑपरेशन सिंदूरसाठी अभिनंदन करतो. भारताने प्रतिसाद देण्याचा अधिकार वापरला आहे आणि ही कारवाई खूप विचारपूर्वक करण्यात आली, असंही ते म्हणाले.
भारताने आपल्या भूमीवरील हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ‘प्रतिसाद देण्याचा अधिकार’ वापरला आहे. दहशतवाद्यांचे मनोबल तोडण्याच्या उद्देशाने, ही कारवाई केवळ त्यांच्या छावण्या आणि पायाभूत सुविधांपुरती मर्यादित करण्यात आलीये. आपल्या सशस्त्र दलांच्या शौर्याला मी सलाम करतो, असं राजनाथ सिंह म्हणाले.
फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, २३ एप्रिल रोजी भारत सरकारने सिंधू पाणी करार स्थगित केला. त्यानंतही पाकने दहशतवाद्यांवर कोणतीही कारवाई केली नाही आणि उलट भारतावरच आरोप केला. त्यामुळं भारताने प्रत्युत्तर दिलं. मात्र, आम्ही काळजीपूर्वक विचार करून कारवाई केली आहे. आम्ही फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला.
तर भारतीय लष्कराच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या, जी ठिकाण आम्ही निवडली त्यात सामान्य नागरिकांचा जीव जाणार नाही, कुठल्याही निष्पाप माणसाला मारलं जाणार नाही, त्यांना कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही, याची पूर्णपणे खबरदारी घेतली.