Download App

RBI : काय आहे Clean Note Policy? याच धोरणामुळे RBI ने 2000 रुपयांच्या नोटा घेतल्या परत

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकतचं 2000 रुपयांची नोट चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने नागरिकांनी त्यांच्याकडील 2 हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याचे आवाहन केले आहे. नोटा बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे. 1 ऑक्टोबर 2023 नंतर 2000 ची नोटा चलनातून हद्दपार होणार आहे. (Reserve Bank of India withdraw the Rs 2000 note)

रिझर्व्ह बँकेने क्लिन नोट पॉलिसींतर्गत हा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. आरबीआयची’क्लिन नोट पॉलिसी’ याचा उद्देश म्हणजे चांगल्या दर्जाच्या नोटा लोकांपर्यंत पोहचविणे. यासाठी आरबीआय विविध निर्णय घेत असते, धोरणं आखते आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी नियोजन करते. डिसेंबर 2013 मध्ये, रिझर्व्ह बँकेने ‘क्लिन नोट पॉलिसींतर्गत’ बँकांना खराब नोटा बदलून घेण्याचे निर्देश दिले होते.

क्लिन नोट पॉलिसी अंतर्गत काय होते?

क्लिन नोट पॉलिसींतर्गत बँका आणि वित्तीय संस्थांच्या माध्यमातून खराब झालेल्या, बनावट, गुणवत्ताहिन नोटा चलनातून काढून टाकल्या जातात. भारतीय चलनाची अखंडता राखणे हे या धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे. यासोबतच या नोटांच्या जागी नवीन नोटा बाजारात आणाव्या लागतात. एकूणच काय तर आरबीआयच्या या धोरणांतर्गत चलनात असलेल्या नोटांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवले जाते.

2018 मध्ये छपाई बंद करण्यात आली होती :

2000 च्या नोटांची छपाई 2016 मध्ये सुरू झाली होती. नोटाबंदीनंतर या नोटा चलनात आणण्यात आल्या होत्या. त्यानंतर जवळपास दोन वर्षांनंतर म्हणजे 2018-19 मध्ये सेंट्रल बँकेने या नोटांची छपाई थांबवली होती.

2000 रुपयांच्या नोटेवर गव्हर्नर काय म्हणाले?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सोमवारी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, नोटा बदलून घेण्यासाठी लोकांकडे 4 महिन्यांचा वेळ आहे. लोक कोणत्याही त्रासाशिवाय आणि घाई न करता बँकांमध्ये या नोटा बदलून घेऊ शकतात. बाजारात इतर मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. काही समस्या असल्यास, तुम्ही बँक किंवा RBI शी संपर्क साधू शकता, असेही त्यांनी सांगितले.

Tags

follow us