Tej Pratap Yadav Expels from RJD : बिहारमधील प्रस्थापीत राजकीय घराण्यात मोठी घडामोड घडली आहे. (RJD) कालपासून राजकारणात या घराण्याची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रीय जनता दल पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आपला मोठा मुलगा आणि माजी मंत्री तेज प्रताप यादव याला पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केलं आहे. तसंच, त्यांना कुटुंबातूनही बेदखल केल्याचं लालू प्रसाद यादव यांनी जाहीर केलं आहे.
लालू यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव यांनी दिली मोठी कबुली;या तरुणीच्या १२ वर्षापासून प्रेमात
लालू प्रसाद यादव यांचे मोठे चिरंजीव तेज प्रताप यादव यांनी काल फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये त्यांनी अनुष्का यादव नामक महिलेशी प्रेमसंबंध असून १२ वर्षांपासून आपण एकत्र असल्याचा दावा केला होता. तसंच, आता ही गोष्ट आपण सर्वांसमोर उघड करत आहोत, असं ते फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाले होते. पण काही वेळेतच त्यांनी ही पोस्ट डिलीट केली आणि एक्सवर दुसरी पोस्ट टाकत सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाल्याचा दावा केला होता. मात्र, हे सगळ आपल्याला योग्य वाटलं नाही. त्यामुळे आपण तेजप्रताप यादव यांना पक्षातून बाहेर करण्याचा निर्णय घेतल्याचं लालू म्हणाले आहेत.
काय म्हणाले लालू प्रसाद यादव?
लालू प्रसाद यादव यांनी अधिकृत एक्स हँडलवर सविस्तर पोस्ट लिहून या निर्णयाची घोषणा केली. ते म्हणाले, वैयक्तिक जीवनात नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष केल्यास सामाजिक न्यायासाठी आम्ही करत असलेला संघर्ष कमकुवत होतो. मोठा मुलगा ज्या प्रकारचे कृत्य करतो, लोकांशी त्याचे वागणे आणि बेजबाबदार वर्तन हे आमच्या कौटुंबिक मूल्य आणि संस्काराच्या विरोधात आहे. त्याच्या वरील कृत्यामुळे मी त्याला पक्ष आणि कुटुंबातून बाहेर करत आहे. आता पक्ष आणि कुटुंबात त्याची कोणतीही भूमिका राहणार नाही. त्याला पक्षातून ६ वर्षांसाठी काढून टाकण्यात येत आहे.
आपल्या वैयक्तिक जीवनातील चांगले-वाईट आणि गुण-दोष पाहण्यासाठी तो स्वतः सक्षम आहे. त्याच्याशी ज्यांनी संबंध ठेवायचे आहेत, त्यांनी विवेक वापरून निर्णय घ्यावा. मी नेहमीच सार्वजनिक जीवनात वावरताना लोकलज्जेचा पुरस्कार केला. कुटुंबातील इतर आज्ञाधारक सदस्यांनीही सार्वजनिक वावरताना याच मूल्याचा स्वीकार केला आणि आचरणातही आणले. धन्यवाद, असंही लालू प्रसाद यादव पुढे म्हणाले आहेत.
निजी जीवन में नैतिक मूल्यों की अवहेलना करना हमारे सामाजिक न्याय के लिए सामूहिक संघर्ष को कमज़ोर करता है। ज्येष्ठ पुत्र की गतिविधि, लोक आचरण तथा गैर जिम्मेदाराना व्यवहार हमारे पारिवारिक मूल्यों और संस्कारों के अनुरूप नहीं है। अतएव उपरोक्त परिस्थितियों के चलते उसे पार्टी और परिवार…
— Lalu Prasad Yadav (@laluprasadrjd) May 25, 2025