Robert Kiyosaki’s warning about the market : जागतिक अर्थव्यवस्थेवर पुन्हा एकदा मंदीचे ढग दाटून येत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. प्रसिद्ध लेखक आणि गुंतवणूकदार रॉबर्ट कियोसाकी यांनी केलेल्या नव्या विधानामुळे बाजारात खळबळ उडाली आहे. आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी दिग्गज मार्केट विश्लेषक जिम रिकार्डस यांच्या अंदाजच हवाला देत सोनं, चांदी आणि बिटकॉइनच्या किमतींमध्ये ऐतिहासिक वाढ होणार असल्याचा दावा केला आहे.
कियोसाकी यांच्या मते, येत्या काळात सोन्याची किंमत थेट 3 लाख रुपये प्रति तोळा तर चांदी 5 प्रति किलोच्या पुढे जाऊ शकते. याशिवाय बिटकॉइन 7 लाख 50 हजार डॉलरपर्यंत झेपावेल, असाही त्यांचा अंदाज आहे. सध्या सोनं आणि चांदीचे दर या आकड्यांच्या तुलनेत खूपच कमी असल्याने या दाव्यांची आर्थिक क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
मार्केट कोसळणार हे निश्चित आहे, असा इशाराच कियोसाकी यांनी आपल्या पोस्टमध्ये दिला. त्यांच्या मते, जागतिक बाजारपेठ सध्या अत्यंत नाजूक टप्प्यावर उभी आहे. वाढता भू-राजकीय तणाव, महागाईचा दबाव, सरकारांवर वाढत चाललेले प्रचंड कर्ज आणि केंद्रीय बँकांच्या अनिश्चित धोरणांमुळे पारंपरिक आर्थिक व्यवस्थेवरचा विश्वास कमी होत चालला आहे.
मोदी सरकार लवकरच कोसळणार; राहुल गांधींचा खळबळजनक दावा, कारणही सांगितलं
याच पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार आता सुरक्षित आणि ठोस मालमत्तेकडे वळतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कियोसाकी यांनी गुंतवणूकदारांना सावध करताना म्हटले की, भविष्याचा अंदाज घेऊन आधीच तयारी करणारे लोकच खरे यशस्वी गुंतवणूकदार ठरतात. आर्थिक मंदी ही केवळ संकट नसते, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास ती मोठी संधीही ठरू शकते.
गेल्या अनेक वर्षांपासून कियोसाकी हे केवळ कागदी चलनावर किंवा पारंपरिक वित्तीय व्यवस्थेवर अवलंबून राहू नका, असा सल्ला देत आहेत. त्याऐवजी सोने, चांदी आणि बिटकॉइनसारख्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्यावर त्यांनी सातत्याने भर दिला आहे. त्यांच्या ताज्या विधानामुळे पुन्हा एकदा या पर्यायी गुंतवणुकींकडे लक्ष वेधले गेले आहे.
दरम्यान, काही बाजारतज्ज्ञ कियोसाकी यांच्या मताशी अंशतः सहमत आहेत. वाढते जागतिक कर्ज आणि अस्थिर आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता सोने-चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता त्यांनीही व्यक्त केली आहे. मात्र, काही विश्लेषकांनी कियोसाकी यांच्यावर टीका करताना ते अनेक वर्षांपासून सातत्याने आर्थिक संकटाचीच भविष्यवाणी करत असल्याचे म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार, जगभरातील सरकारी कर्ज 100 ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेले असून ते जागतिक जीडीपीच्या जवळपास ९४ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. अमेरिका, जपानसह अनेक मोठे देश सध्या प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था नेमकी कोणत्या दिशेने चालली आहे, याबाबतची चिंता आणखी वाढली आहे.
