”योग सुरू आहे ना?”, PM मोदींचा ओमराजेंना खास प्रश्न; फिटनेसवर रंगली चर्चा

Omraje Nimbalkar विकासकामे आणि प्रलंबित प्रश्नांवर चर्चा सुरू असतानाच मोदींची ओमराजेंना त्यांच्या नियमित योगाभ्यासाबद्दल विचारपूस

PM Modi's Special Question To Omraje Nimbalkar On Yoga

PM Modi's Special Question To Omraje Nimbalkar On Yoga

PM Modi’s Special Question To Omraje Nimbalkar On Yoga : राजकारणातील धावपळ, बैठका आणि सततचा दौरा… या सगळ्या व्यस्त वेळापत्रकातही तंदुरुस्तीला प्राधान्य देणारे दोन नेते जेव्हा समोरासमोर येतात, तेव्हा चर्चेचा विषय विकासकामांइतकाच योग आणि फिटनेसही ठरतो. नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेच्या खासदारांना आज (दि.7) अल्पोपहारासाठी निमंत्रित केले होते. यावेळी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधानांनी, “योग सुरू आहे ना?” असा प्रश्न विचारत त्यांच्या नियमित योगाभ्यासाची आवर्जून चौकशी केली.

‘योग साधने’वर रंगला खास संवाद

शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी धाराशिवचे खासदार ओमराजेंची ओळख करून दिली. धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विकासकामे आणि प्रलंबित प्रश्नांवर चर्चा सुरू असतानाच पंतप्रधानांनी ओमराजेंना त्यांच्या नियमित योगाभ्यासाबद्दल विचारपूस करत “योग सुरू आहे ना?” असा प्रश्न विचारला.

ओमराजेंचे फिटनेस व्हिडिओ सोशल मीडियावर लोकप्रिय

दुसरीकडे, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हेही नियमित योग आणि व्यायाम करणाऱ्या लोकप्रतिनिधींमध्ये गणले जातात. ते वेळोवेळी आपल्या सोशल मीडिया हँडलवर योगासनांचे, व्यायामाचे आणि फिटनेसचे व्हिडिओ शेअर करत असतात. राजकारणाच्या धकाधकीतही आरोग्याकडे दुर्लक्ष न करण्याचा संदेश ते या माध्यमातून देत असतात. त्यामुळेच पंतप्रधान मोदींनी त्यांच्या योगाभ्यासाची विशेष दखल घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

विकासकामांवरही झाली सविस्तर चर्चा

या भेटीत ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विविध विकासकामे, प्रलंबित प्रश्न आणि केंद्र सरकारच्या सहकार्याची आवश्यकता याबाबत पंतप्रधान मोदींशी सविस्तर चर्चा केली. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारचे सहकार्य मिळावे, याबाबत सकारात्मक संवाद झाल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सर्व खासदारांना आपल्या-आपल्या मतदारसंघातील विकासकामे अधिक वेगाने मार्गी लावण्यासाठी उपलब्ध यंत्रणेचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन केले. तसेच, कोणत्याही विकासकामात अडचण आल्यास थेट पंतप्रधान कार्यालयाशी (PMO) संपर्क साधा, अशा सूचनाही त्यांनी दिल्याचे ओमराजे यांनी सांगितले आहे. भेटीनंतर धाराशिवच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या सहकार्याने अधिक वेगाने आणि प्रभावीपणे काम करण्याचा आपला निर्धार आणखी दृढ झाल्याची भावना ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version