Haryana Election 2024 : हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि बारामुल्लाचे खासदार रशीद इंजिनिअर या दोन्ही नेत्यांची जामिनावर मुक्तता होण्यामागे राजकीय डावपेच असल्याचा दावा केला जात आहे. (Haryana Election ) दोन्ही नेत्यांच्या पक्षांना मिळणाऱ्या अधिक मतांचा फायदा भाजपला होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Haryana Elections : हरियाणात काँग्रेस-भाजपसमोर नवं संकट; बंडखोरांनी दिलं ‘अपक्ष’ चॅलेंज!
जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यांत मतदान होणार असून पहिल्या टप्प्याचे मतदान येत्या १८ सप्टेंबरला होणार आहे. तसंच, हरियाणामध्ये एकाच टप्प्यात येत्या पाच ऑक्टोबरला मतदान होणार आहे. रशीद इंजिनिअर यांचा काश्मीर खोऱ्यात प्रभाव आहे तर मुख्यमंत्री केजरीवाल यांचे दिल्लीला लागून असलेल्या हरियाणातील मतदारसंघांवर वर्चस्व असल्याचं दिसून येत असल्याने या मतांचा फायदा भाजपाला होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
रशीद इंजिनिअर यांना यूएपीएअंतर्गत अटक करण्यात आली असून ते तिहार तुरुंगात होते. त्यांनी तुरुंगातूनच लोकसभेची निवडणूक लढवून उमर अब्दुल्ला यांचा पराभव केला आहे. त्यांच्या अवामी इत्तेहाद पक्षाने काश्मीर खोऱ्यात ३४ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सला(एनसी) टक्कर देणारा पक्ष म्हणून या पक्षाकडे पाहिले जाते. खोऱ्यात काँग्रेस-एनसीच्या आघाडीला रोखण्यासाठी रशीद इंजिनिअर यांच्या पक्षाला बळ देण्यासाठीच त्यांना जामीन देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, राजकीय फायद्यासाठी जामीन मिळाल्याच्या आरोप रशीद इंजिनिअर यांनी फेटाळून लावला आहे. ‘मी कोणत्याही पक्षाचा राजकीय हस्तक नाही’ असे रशीद इंजिनिअर यांनी स्पष्ट केलं आहे.
काँग्रेसला १५ मतदारसंघात फटका?
अरविंद केजरीवाल यांच्या जामिनामागे राजकीय गणित असल्याचं बोललं जात आहे. हरियाणात भाजपची स्थिती चांगली असल्याचे संकेत मिळाले आहेत. आम आदमी पक्षाच्या (आप) उमेदवारांचा भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे. आपचे उमेदवार काँग्रेसची मते घेतील, असा भाजपचा होरा आहे. दिल्लीला लागून असलेल्या जवळपास १५ मतदारसंघांमध्ये आपचा प्रभाव आहे.
मोठी बातमी : केजरीवालांचा तुरूंगवास संपला; CBI प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर
या मतदारसंघात आपने चांगली कामगिरी केल्यास काँग्रेसला चांगलाच धक्का बसण्याची शक्यता आहे. गुरुग्राम, फरीदाबाद, वल्लभगड, पलवल या मतदारसंघांमध्ये आपचा चांगलाच प्रभाव आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर आपच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह संचारला आहे. हरियाणाच्या मतदानाला अद्यापही तीन आठवडे आहेत. या काळात मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या प्रचाराचा फायदा भाजपला होण्याची शक्यता अधिक आहे.