अहमदाबादमध्ये आढळला इबोलाचा संशयित रुग्ण; मुंबई, दमण, सिल्व्हासा प्रवासाने वाढवली धास्ती

गुजरातमधील अहमदाबाद येथे एका 37 वर्षीय व्यावसायिकामध्ये इबोला संसर्गासारखी लक्षणे दिसून आल्याने प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत.

Untitled Design 108

Untitled Design 108

Suspected Ebola patient : आफ्रिकेतील काही देशांमध्ये पुन्हा एकदा थैमान घालणाऱ्या जीवघेण्या इबोला विषाणूमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः कांगो आणि शेजारील काही आफ्रिकी देशांमध्ये वाढत्या संसर्गाच्या घटनांमुळे जागतिक आरोग्य संघटना आणि विविध देशांच्या आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अशातच भारतातही इबोलासदृश लक्षणे असलेला एक संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे एका 37 वर्षीय व्यावसायिकामध्ये इबोला संसर्गासारखी लक्षणे दिसून आल्याने प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यावसायिक हा व्यवसायाच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वी आफ्रिकेतील कांगो देशात गेला होता. या महिन्याच्या सुरुवातीला तो भारतात परतला. भारतात आल्यानंतर तो सर्वप्रथम मुंबईत दाखल झाला होता. त्यानंतर जवळपास पाच दिवस तो आपल्या घरी थांबला. या काळात त्याने सिल्व्हासा आणि दमण येथेही प्रवास केला होता. पुढे 22 मे रोजी तो बडोद्याला गेला. सुरुवातीला त्याची प्रकृती सामान्य होती. मात्र 26 मे रोजी अचानक त्याला ताप, सर्दी, अंगदुखी आणि अशक्तपणाची लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर त्याने वैद्यकीय तपासणी केली असता डॉक्टरांना त्याची अलीकडील ट्रॅव्हल हिस्ट्री संशयास्पद वाटली.

विशेष म्हणजे, संबंधित व्यक्ती नुकतीच इबोला बाधित देशातून परतल्याने डॉक्टरांनी कोणताही धोका न पत्करता त्याला तातडीने अधिक उपचारांसाठी अहमदाबाद येथे हलवले. सध्या त्याच्यावर विशेष आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरू असून डॉक्टरांचे एक विशेष पथक त्याच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. याशिवाय त्याच्या संपर्कात आलेल्या तीन जणांनाही वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या तिघांमध्ये कुटुंबातील सदस्य आणि व्यावसायिक संपर्कातील व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

 

या घटनेनंतर गुजरातसह देशातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. विमानतळांवर विशेष तपासणी सुरू करण्यात आली असून आफ्रिकन देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. संबंधित व्यक्तीने प्रवासादरम्यान कोणकोणत्या ठिकाणी भेट दिली, कोणाच्या संपर्कात आला आणि त्याच्याशी संपर्क आलेल्या लोकांची संख्या किती आहे, याचा शोध घेण्यासाठी आरोग्य विभागाने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोहिम सुरू केली आहे.

या प्रकरणाबाबत माहिती देताना गुजरातचे आरोग्यमंत्री प्रफुल्ल पानशेरिया यांनी सांगितले की, “संबंधित रुग्णाला विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतरच नेमके कोणते संक्रमण झाले आहे, याबाबत स्पष्ट माहिती मिळेल.” त्यांनी नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही केले.

दरम्यान, भारतात इबोला विषाणूचा संसर्ग झाल्याच्या कोणत्याही प्रकरणाला अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र आणि राज्य आरोग्य विभागाकडून सर्व आवश्यक उपाययोजना राबवल्या जात आहेत. संशयित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून त्यांची नियमित आरोग्य तपासणी केली जात आहे.

इबोला हा अत्यंत धोकादायक आणि संसर्गजन्य विषाणू मानला जातो. संक्रमित व्यक्तीच्या शारीरिक द्रवांच्या संपर्कातून हा विषाणू पसरतो. ताप, उलट्या, अतिसार, अशक्तपणा आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये अंतर्गत रक्तस्राव अशी त्याची लक्षणे असतात. योग्य वेळी उपचार न झाल्यास हा विषाणू जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे जगभरातील आरोग्य संस्था अशा प्रकरणांकडे अत्यंत गांभीर्याने पाहतात.

सध्या या संशयित रुग्णाचा तपासणी अहवाल येण्याची प्रतीक्षा असून त्यानंतरच भारतात इबोलाचा धोका आहे की नाही, हे स्पष्ट होणार आहे. मात्र या घटनेमुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर गेली असून नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Exit mobile version