Tata Sons IPO : देशातील प्रतिष्ठित उद्योगसमूह असलेल्या टाटा ग्रुपची होल्डिंग कंपनी टाटा सन्सच्या संभाव्य आयपीओची (Tata Sons IPO) चर्चा सुरू आहे. याबाबत टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा (Noel Tata) यांनी याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. टाटा सन्स शेअर बाजारात लिस्ट झाल्यास समूहाच्या कामकाजावर आणि संस्थापकांच्या तत्त्वांवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केलीय. विशेषतः कंपनीवर भागधारकांचा दबाव वाढल्यास सामाजिक बांधिलकीपेक्षा नफ्याला अधिक महत्त्व दिले जाण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली.
एका कार्यक्रमात बोलताना नोएल टाटा यांनी सांगितले की, टाटा समूहाची कार्यपद्धती आणि विचारसरणी ही केवळ नफा कमावण्यापुरती मर्यादीत नाही. समूहाने देशाच्या औद्योगिक विकासात भागीदार म्हणून काम केले आहे. त्यामुळे टाटा सन्सची संभाव्य शेअर बाजारातील लिस्टिंग समूहाच्या मूलभूत तत्त्वांमध्ये बदल घडवू शकते.
टाटा सन्सच्या आयपीओबाबत नोएल टाटा यांची चिंता काय?
नोएल टाटा यांच्या मते, भविष्यात कंपनीचे 30 हजार ते 40 हजार भागधारक झाले, तर त्यांच्याकडून नफा वाढवण्याचा दबाव निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत समूहाच्या परोपकाराच्या आणि सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेवरही परिणाम होण्याची भीती आहे. टाटा समूहाची विचारसरणी ही कोणत्याही एका व्यक्तीच्या नेतृत्वावर अवलंबून न राहता सातत्याने पुढे चालत राहिली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या संभाव्य प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी टाटा ट्रस्ट्स नियामक संस्था आणि संबंधित भागधारकांसोबत रचनात्मक चर्चा करेल, असेही त्यांनी सांगितले.
वेस्टसाइडचे 500 स्टोअर्स करण्याची योजना
टाटा समूहाच्या रिटेल व्यवसायाबाबतही नोएल टाटा यांनी महत्त्वाची माहिती दिली. देशातील वाढती ग्राहक मागणी लक्षात घेता वेस्टसाइडच्या (Westside) सध्याच्या 320 स्टोअर्सची संख्या वाढवून 500 पेक्षा अधिक करण्याचे समूहाचे नियोजन आहे. कपड्यांची निर्मिती, डिझाइन आणि ग्राहकांपर्यंत उत्पादन पोहोचवण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया स्वतःच्या नियंत्रणात ठेवणाऱ्या प्रायव्हेट लेबल मॉडेलमुळे टाटा समूहाने भारतातील सुरुवातीच्या D2C (Direct to Consumer) व्यवसायांमध्ये स्थान मिळवले, असे त्यांनी सांगितले.
जूडिओच्या यशामागचे नेमके कारण काय?
ट्रेंट लिमिटेडच्या जूडिओ (Zudio) ब्रँडच्या यशामागील विचारही नोएल टाटा यांनी स्पष्ट केले आहे. 2016 मध्ये जूडिओ सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश सर्वसामान्य ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत चांगल्या दर्जाचे आणि आकर्षक फॅशनचे पर्याय उपलब्ध करून देणे हा होता.
जूडिओच्या सुरुवातीच्या उत्पादनांच्या किमती 199 रुपयांपासून 999 रुपयांपर्यंत होत्या. विशेष म्हणजे, जवळपास दशकभरानंतरही ब्रँडने आपल्या सुरुवातीच्या किमतींच्या धोरणाला महत्त्व दिले आहे. परवडणारी किंमत आणि ग्राहकांच्या आवडीला प्राधान्य देणे हे जूडिओच्या यशामागील महत्त्वाचे घटक असल्याचे त्यांनी सांगितले.
टाटा ट्रस्ट्सच्या जबाबदारीबाबत काय म्हणाले नोएल टाटा?
टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष म्हणून काम करताना समाजातील वंचित घटकांच्या समस्या अधिक जवळून समजून घेण्याची संधी मिळाल्याचे नोएल टाटा यांनी सांगितले. समाजातील मोठ्या वर्गाला आजही अनेक मूलभूत समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्या पाहिल्यानंतर सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक तीव्र होते, असे ते म्हणाले.
