सोनिया गांधींच्या जन्मघरावर तिरंगा, आता संग्रहालयाची तयारी! काय आहे इटलीतील या ‘इंडियन हाऊस’चा इतिहास?

सोनिया गांधींच्या आत्मचरित्राच्या निमिताने हे घर चर्चेत आल्यानंतर कांग यांनी या वास्तूचे संग्रहालयात रूपांतर करण्याची इच्छा व्यक्त केली.

Untitled Design   2026 11 22T152142.901

Untitled Design 2026 11 22T152142.901

Tricolour at Sonia Gandhi’s ancestral home : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे इटलीतील बालपणीचे घर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सोनिया गांधी यांसह आत्मचरित्र प्रकाशित झाल्यानंतर त्यांच्या बालपणीच्या आठवणी, कुटुंबियांशी असलेले भावनिक नाते आणि इटलीतील वडिलोपार्जित घराबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, आता सोनिया गांधी यांच्या याच बालपणीच्या घराचे अत्याधुनिक संग्रहालयात रूपांतर करण्याची घोषणा घराच्या सध्याच्या मालकाने केली आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या आयुष्यातील सुरूवातीच्या आठवणी जपणारी ही वास्तू आता ऐतिहासिक ठेवा म्हणून जतन केली जाणार आहे.

इटलीस्थित व्यावसायिक सुखदेव सिंग कांग यांनी 2020 मध्ये हे घर आपल्या पत्नी आणि मुलीच्या नावावर खरेदी केले होते. सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राच्या निमिताने हे घर पुन्हा चर्चेत आल्यानंतर कांग यांनी या वास्तूचे संग्रहालयात रूपांतर करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या माहितीनुसार, या घराला इंडियन हौस म्हणून ओळखले जाते. घरावर भारताचा तिरंगा लावण्यात आला असून, बाहेर असलेल्या नामफलकावर सोनिया गांधी यांचे जन्मस्थान’ असा उल्लेख करण्यात आला आहे. सोनिया गांधी यांचा जन्म 9 डिसेंबर 1946 रोजी याच घरात झाला होता. आपल्या बालपणातील सुरुवातीची वर्षे त्यांनी याच वास्तूमध्ये घालवली होती.

इटलीमधील व्हिसेन्झा प्रांतातील लुसियाना येथे हे घर असून दगड आणि काँक्रीटपासून बांधलेल्या या इमारतीमध्ये एकूण सहा खोल्या आहेत. या घराच्या सध्याच्या मालकाचे वास्तव्य ब्रेस्सिया येथे असून त्यांच्या घरापासून सोनिया गांधी यांच्या बालपणीच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी साधारण एक तास लागतो. सुखदेव सिंग कांग हे मूळचे पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील एका गावचे रहिवासी आहेत. 1992 मध्ये ते इटलीला गेले आणि त्यानंतर ते तिथेच स्थायिक झाले.

पुण्यात कॅम्प ते एमजी रोडपर्यंत FDA ची तपासणी मोहीम, स्वच्छतेचे नियम धाब्यावर, आठ हॉटेल्सचे परवाने निलंबित

सध्या या घराच्या देखभालीसाठी एका काळजीवाहकाची नेमणूक करण्यात आली आहे. पर्यटकांनाही ही वास्तू पाहता येते. घराची देखभाल आणि मालमत्ता कर यासाठी दरवर्षी सुमारे एक हजार युरो खर्च येत असल्याचे कांग यांनी सांगितले. त्यांचे कुटुंब गांधी कुटुंबाचे प्रशंसक असून, इटलीतील काही ओळखीच्या व्यक्तींकडून या घराबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ही वास्तू खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता.

विशेष म्हणजे, हे घर भाड्याने देण्याचा किंवा त्याचे गुरुद्वारामध्ये रूपांतर करण्याचा प्रस्तावही समोर आला होता. मात्र, कांग यांच्या कुटुंबाने हे दोन्ही प्रस्ताव स्वीकारले नाहीत. सोनिया गांधी आणि त्यांच्या मायनो कुटुंबाशी संबंधित असलेला ऐतिहासिक वारसा जतन करण्याची त्यांची इच्छा असल्याने त्यांनी या घराचे संग्रहालय करण्याचा निर्णय घेतला आहे.

आता लवकरात लवकर या वास्तूचे अत्याधुनिक संग्रहालयात रूपांतर करण्याची तयारी सुरू आहे. मात्र, या प्रकल्पासमोर एक महत्त्वाची अडचण असल्याचे कांग यांनी सांगितले आहे. सोनिया गांधी यांच्या बालपणीच्या घराशी संबंधित वैयक्तिक आठवणी, वस्तू, छायाचित्रे आणि कागदपत्रांची पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याने संग्रहालयाची आखणी करताना अडचणी येत आहेत.

भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील चौघांना संधी; नितीन नबीन यांची घोषणा!

त्यामुळे या संग्रहालयाच्या प्रकल्पासाठी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेण्याची कांग यांची इच्छा आहे. प्रस्तावित संग्रहालयामध्ये कोणत्या प्रकारच्या वैयक्तिक वस्तू, जुनी छायाचित्रे, कागदपत्रे आणि स्मृतीचिन्हे प्रदर्शित करता येतील, याबाबत गांधी कुटुंबाकडून माहिती घेण्याची त्यांची तयारी आहे. या माध्यमातून सोनिया गांधी यांच्या बालपणीच्या आठवणी आणि त्यांच्या कुटुंबाशी संबंधित ऐतिहासिक संदर्भ पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

एकीकडे सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रामुळे त्यांच्या बालपणीच्या आठवणी पुन्हा चर्चेत आल्या आहेत, तर दुसरीकडे इटलीतील त्यांच्या जन्मस्थानाचे संग्रहालयात रूपांतर करण्याच्या घोषणेमुळे या वास्तूला नवी ओळख मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भविष्यात हे घर केवळ एक खासगी मालमत्ता न राहता सोनिया गांधी यांच्या जीवनप्रवासातील सुरुवातीच्या टप्प्याची आठवण करून देणारे महत्त्वाचे ठिकाण ठरू शकते.

Exit mobile version