करार करा नाहीतर कठोर कारवाईला सामोरं जा; इराणला डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा

Donald Trump : ट्रम्प यांनी इराणला करारासाठी संधी देण्याचे संकेत देतानाच दबाव वाढवण्याचा आणि कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

News Photo   2026 09 22T220145.332

Donald Trump

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भाषण करताना (Trump) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत करार करण्याचा मार्ग स्वीकारायचा की तेहरानवरील दबाव आणखी वाढवायचा, याबाबत आपण निर्णय घेत असल्याचे सांगितले. करार झाला नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला. मात्र, आगामी नोव्हेंबरमधील अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांनंतर इराणसोबत करार होऊ शकतो, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला.

ट्रम्प यांनी इराणसमोर दोन पर्याय असल्याचे सांगत, एकीकडे देशाला भविष्यात पुन्हा उभे राहण्याची संधी देणारा करार आणि दुसरीकडे इस्लामिक रिपब्लिकचा पूर्णपणे नाश करण्याचा पर्याय असल्याचे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे अमेरिका-इराण संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता चर्चेत आली आहे. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या पार्श्वभूमीवर इराणच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे.

सौदीवर हौथींच्या हल्ल्यांचा धोका वाढला, अमेरिकेकडून पश्चिम आशियासाठी ट्रॅव्हल अलर्ट जारी

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला उपस्थित राहण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले असून, ते बुधवारी महासभेला संबोधित करणार आहेत. मात्र, ट्रम्प बुधवारी न्यूयॉर्कहून वॉशिंग्टनला रवाना होणार आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांची प्रत्यक्ष भेट होईल का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. दुसरीकडे, इराणने युद्ध आणि त्याच्यावर करण्यात येणारे हल्ले थांबवण्याची तसेच आपल्या बंदरांवरील नाकेबंदी उठवण्याची मागणी केली आहे.

अमेरिका आणि इराणमधील संघर्षाच्या केंद्रस्थानी स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा महत्वाचा जलमार्ग आहे. जागतिक ऊर्जा वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या या मार्गावरून निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम तेलाच्या पुरवठ्यावर आणि किंमतींवर होत आहे. इराणकडून या जलमार्गावर निर्बंध कायम असून, अमेरिकेने इराणच्या बंदरांवरील नाकेबंदी आणि आर्थिक दबाव वाढवला आहे. त्यामुळे संघर्षावर तोडगा काढण्यासाठी राजनैतिक चर्चेकडेही जगाचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version