दिल्ली : दिल्ली विधानसभेसाठी आज बुधवार (5 फेब्रुवारी) मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता सगळ्यांच्या नजरा आठ फेब्रुवारीच्या मतमोजणीकडे लागल्या आहेत. मात्र त्या अगोदरच एक्झिट पोलच्या अंदाजातून दिल्लीतील चित्र स्पष्ट झालं आहे. यात आम आदमी (Aam Adami Party) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तर भाजपला सत्ता स्थापनेसाठी मतदारांचा कौल मिळाला आहे. आप, काँग्रेस आणि भाजपा अशी तिरंगी लढत येथे झाली होती. (Two decisions of Prime Minister Narendra Modi will benefit BJP in Delhi Assembly elections)
PEOPLE’s INSIGHT सर्व्हेमध्ये भाजपचा फायदा तर आपचं नुकसान झाल्याचं दिसून येते. यात भाजपला 40-44 आणि आपला 25-29 जागा मिळण्याचा अंदाज आहे. JVC च्या सर्व्हेमध्ये देखील भाजपला जास्त जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. सर्व्हेनुसार दिल्लीत भाजपला 39 ते 45 जागा मिळू शकतात. तर आपला 22 ते 31 जागांवर समाधान मानावे लागू शकते.
Chanakya Strategies च्या सर्व्हेमध्ये देखील आपची तीच परिस्थिती आहे. यात भाजपला 39-44 आणि आपला 25-28 जागा मिळण्याचा अंदाज आहे. MATRIZE च्या सर्व्हेमध्ये मात्र आप आणि भाजपमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. यात भाजपला 35 ते 40, आपला 32 ते 37 आणि काँग्रेसला केवळ एका जागेचा अंदाज आहे. पोल डायरीनुसार दिल्लीत थेट सत्ताबदल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्व्हेनुसार भाजपला 42 ते 50 आणि आपला 18 ते 25 जागांचा अंदाज आहे.
केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजूरी दिली आहे. या निर्णयाचा दिल्ली विधानसभा निवडणुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण सर्वाधिक सरकारी कर्मचाऱ्यांचे वास्तव्य दिल्लीमध्येच आहे. दिल्लीमध्ये तब्बल सात लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारक आहेत. त्यातही केवळ निवृत्तिवेतन धारकांचीच संख्या पाच लाखांहून अधिक आहे. तर सरकारी कर्मचाऱ्यांचा प्रभाव दिल्लीतील 70 पैकी 22 मतदारसंघांमध्ये पाहायला मिळतो. त्या पार्श्वभूमीवर आठवा वेतन आयोग नेमण्याची सरकारची घोषणा म्हणजे दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीचा मास्टरस्ट्रोक ठरू शकतो असेही बोलले जाते.
निवडणूक तज्ज्ञ यशवंत देशमुख यांनी दिल्लीत वोटिंग पॅटर्न कसा राहिला, याबाबत काही निरीक्षण नोंदवले आहे. दिल्लीतील निवडणुका दोन भागात विभागल्या गेल्या. एका बाजूला पुरुष मतदारांना भाजपा सत्तेत हवा आहे. तर, महिलांचा अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास कायम असून, आम आदमी पक्षाची सत्ता कायम राहावी, अशी इच्छा असल्याचं देशमुख म्हणाले. दिल्लीतील अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील महिला आणि पुरुषांची मते पूर्णपणे विभागली गेली आहेत.
यातच बजेटनंतर दिल्लीकरांचा सूर बदलेला दिसून येतो. महिलांना 2100 किंवा 2500 रुपये देण्याचे आश्वासन असले तरी ही बाब त्यांच्यासाठी महत्त्वाची नाही. मोफत बस प्रवास आणि मोहल्ला क्लिनिकसारख्या सुविधांचा त्यांच्यावर स्पष्टपणे परिणाम दिसून येतो. मध्यमवर्गीय पुरुष मतदारांबद्दल बोललो तर ‘शीशमहाल’वरून अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा बदलली आहे. तर केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दिल्लीकरांचा सूर बदलला असून, त्यांचा कल भाजपाकडे असल्याचे दिसून येते, असे देशमुख यांनी म्हटले आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. याचा फायदा दिल्लीतील मोठ्या प्रमाणात असलेल्या मध्यमवर्गाला होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. नोएडा, गुडगाव अशा भागात आयटी सेक्टरमध्ये काम करणारे बहुतांश दिल्लीतील रहिवासी आणि मतदार आहेत. याच वर्गाला केंद्रीत ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जाते. त्याचा फायदा आता भाजपला होताना दिसून येत आहे.