यंदा जांभळांचा अभूतपूर्व सडा म्हणजे खरचं दुष्काळ पडणार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

बाजारात मोठ्या प्रमाणात दिसणारी जांभळे मी गेल्या तीन दशकात कधी पाहिली नाहीत. ज्या उन्हाळ्यात जांभळाचे असे सडे पडतात , त्यावर्षी दुष्काळ असतो.

Jamun Fruit

Jamun Fruit

Jamun Fruit Really Signal For Drought? : यंदाच्या उन्हाळ्यात राज्यातील अनेक भागांत जांभळांचा अक्षरशः सडा पडताना दिसत आहे. ज्या झाडांना मागील वर्षी तुरळक फळे आली होती, तीही यंदा जांभळांनी लगडलेली दिसत आहेत. परिणामी, “ज्या वर्षी जांभळांचा असा सडा पडतो, त्या वर्षी दुष्काळ पडतो,” असा दावा करणारा एक संदेश सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. खरचं ज्या वर्षी जांभळं जास्त प्रमाणात येतात तेव्हा दुष्काळ पडतो का? विज्ञान यावर काय सांगतं त्याबद्दल जाणून घेऊया…

प्रत्येक मध्यमवर्गीयाने वाचावी अशी गोष्ट; 1 लाख 70 हजार कमावूनही महिना अखेरीस हात रिकामे

व्हायरल होणारा मेसेज नेमका काय?

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये जांभळाच्या झाडांना जेव्हा भूगर्भातील पाण्याची कमतरता जाणवते किंवा प्रतिकूल हवामानाची चाहूल लागते, तेव्हा ती स्वतःचे अस्तित्व धोक्यात आल्याचे समजून मोठ्या प्रमाणावर फळे निर्माण करतात. यालाच “स्ट्रेस फ्रुटिंग” किंवा “मास्टिंग” म्हटले जाते. त्यामुळे जांभळांचा मोठा सडा पडणे म्हणजे येणाऱ्या दुष्काळाचा नैसर्गिक इशारा असल्याचा दावा या संदेशात करण्यात आला आहे.

विज्ञान काय सांगते?

आता तुम्हाला जांभळांबाबत व्हायरल होणाऱ्या दाव्यांमध्ये नेमकं किती तथ्य आहे? असा प्रश्न पडला असेल. तर, व्हायरल मेसेजमधील काही वैज्ञानिक संज्ञा खऱ्या असल्या तरी त्यातून काढलेले निष्कर्ष दिशाभूल करणाऱ्या असल्याचे मत वनस्पती अभ्यासक गणेश केदारी यांनी म्हटलं आहे.

‘मास्टिंग’ ही प्रक्रिया खरी, पण अर्थ वेगळा

‘मास्टिंग’ ही वनस्पतीशास्त्रातील मान्यताप्राप्त संकल्पना आहे. यामध्ये एखाद्या प्रजातीची झाडे काही वर्षांनी एकत्रितपणे मोठ्या प्रमाणात फळे आणि बिया तयार करतात. मात्र, याचा उद्देश दुष्काळाची भविष्यवाणी करणे नसतो. उलट, इतक्या मोठ्या प्रमाणात फळे तयार होतात की, ती खाणारे पक्षी, प्राणी किंवा कीटक सर्व फळे संपवू शकत नाहीत. परिणामी अधिकाधिक बिया सुरक्षित राहतात आणि नवीन रोपे तयार होण्याची शक्यता वाढते.

‘हिडन चार्जेस’मुळे भारतीयांचे 28 हजार कोटी गेले; ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांना घाम फोडणारा रिपोर्ट

‘स्ट्रेस फ्रुटिंग’ होते, पण झाडे भविष्य पाहत नाहीत

झाडांना पाण्याचा ताण जाणवला तर ती अधिक फळे तयार करण्याचा प्रयत्न करतात, हे विज्ञान मान्य करते. मात्र, याचा अर्थ झाडे भविष्यातील दुष्काळाची भविष्यवाणी करतात असा होत नसल्याचे केदारी यांनी म्हटले आहे. झाडे फक्त सध्याच्या परिस्थितीला प्रतिसाद देतात. जर सध्या उष्णता जास्त असेल किंवा भूजल पातळी कमी झाली असेल, तर त्याचा परिणाम फळधारणेवर दिसू शकतो. मात्र, यावरून पुढील काही महिन्यांत दुष्काळ पडणारच, असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे.

‘सुसाईड फ्रुटिंग’चा दावा वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचा

व्हायरल मेसेजमधील सर्वात वादग्रस्त दावा म्हणजे जांभळाचे झाड स्वतःचे बलिदान देत असल्याचा. पण, जांभूळ हे बहुवर्षायू (Polycarpic) झाड आहे. ते दरवर्षी फळे देते आणि अनेक दशके जगू शकते. बांबू किंवा घायपातसारख्या काही वनस्पती फक्त एकदाच फुले-फळे देऊन मरतात; मात्र जांभूळ त्यापैकी नाही. त्यामुळे “जांभळाचे झाड आत्महत्या करत आहे” हा दावा पूर्णपणे अशास्त्रीय असल्याचे केदारी यांनी सांगितले.

मग यंदा जांभळे एवढी का आली?

एखाद्या वर्षी भरपूर फळधारणा होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. मागील वर्षातील चांगला पाऊस, झाडांची आरोग्यदायी वाढ, हवामानातील बदल, तापमानातील वाढ आणि नैसर्गिक मास्टिंग प्रक्रिया यांचा एकत्रित परिणाम म्हणून यंदा जांभळांचे उत्पादन वाढले असण्याची शक्यता आहे. तसेच वाढलेल्या तापमानामुळे फळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पिकतात आणि झाडाखाली सडा पडल्यासारखे दृश्य निर्माण होते असे तज्ज्ञांच्या मत आहे.

कुटुंबाच्या गराड्यात असूनही भारतीय ‘एकाकी’; जागतिक अहवालाने उघडलं धक्कादायक वास्तव…

आजी-आजोबांचे निरीक्षण आणि विज्ञान

ग्रामीण भागात पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या अनेक निरीक्षणांमध्ये निसर्गाचे सूक्ष्म आकलन दडलेले असते. “जांभळांचा सडा आणि दुष्काळ” यासारखी निरीक्षणेही दीर्घकालीन अनुभवातून निर्माण झाली असावीत. मात्र, अशा निरीक्षणांचा अर्थ लावताना वैज्ञानिक कारणांचा विचार करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जांभळांचा सडा हा हवामानातील काही बदलांचा संकेत असू शकतो, पण तो दुष्काळाचा खात्रीशीर अंदाज मानता येत नाही.

त्यामुळे यंदा जांभळे भरपूर येणे ही एक नैसर्गिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या समजावून सांगता येणारी घटना आहे. मात्र, “जांभळाचे झाड आगामी दुष्काळाची चाहूल लागल्याने आत्महत्या करत आहे” हा दावा वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचा आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील भावनिक आणि अर्धवट माहितीवर विश्वास ठेवण्याऐवजी तज्ज्ञांच्या मतांचा आधार घेणे आवश्यक आहे.

यंदा पडलेला जांभळांचा सडा हा विज्ञानाच्या दृष्टीने जरी दुष्काळाचा खात्रीशीर इशारा नसला, तरी हवामान बदल, वाढते तापमान आणि घटती भूजल पातळी ही वास्तवातील चिंतेची कारणे दाखवणारा आहे. त्यामुळे निसर्गातील अशा घटनांकडे केवळ कुतूहल म्हणून न पाहता, जलसंधारण आणि पाणी बचतीचे महत्त्वही लक्षात घेणे गरजेचे आहे. दुष्काळ पडो अथवा न पडो, ‘पाणी आहे तरच भविष्य आहे’ हे विसरून चालणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने पाण्याचा जपून वापर करणे आणि पाणी वाचवण्यासाठी आपापल्या परीने योगदान देणे हीच काळाची गरज आहे.

Exit mobile version