Vishnugad Pipalkoti Hydro Electric Project : उत्तराखंडमधील हिमालयाच्या कुशीत वसलेल्या चमोली जिल्ह्यातील पीपलकोटीमध्ये गुरुवारी एक भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सात जणांना जीव गमवावा लागला आहे. पीपलकोटी येथे निर्माणाधीन विष्णुगड पिपलकोटी जलविद्युत प्रकल्पाच्या बोगदा कोसळला आहे. त्या बोगद्यात (Vishnugad Pipalkoti Hydro Electric Project) पाणी शिरले. त्यात अनेक कामगार अडकले आहेत. या दुर्घटनेत 14 कामगार जखमी झाले आहेत. तर तिघांचा शोध सुरू आहे.
मेगा प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे हा बोगदा
बोगदा म्हटले की डोंगर फोडून रस्ता किंवा वाहतुकीचा मार्ग तयार केला जात असल्याची कल्पना येते. मात्र पीपलकोटीतील THDCचा हा बोगदा एका महत्त्वाकांक्षी जलविद्युत प्रकल्पाचा भाग आहे. या प्रकल्पाचे पूर्ण नाव 444 मेगावॅट विष्णुगाड-पीपलकोटी जलविद्युत प्रकल्प (Vishnugad-Pipalkoti Hydro Electric Project – VPHEP) असे आहे. हा प्रकल्प चमोली जिल्ह्यातील अलकनंदा नदीवर उभारला जात आहे.
विष्णुगाड-पीपलकोटी जलविद्युत प्रकल्प काय आहे?
अलकनंदा नदीवर उभारला जाणारा हा एक मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. विष्णुगाड-पीपलकोटी जलविद्युत प्रकल्प हा ‘रन-ऑफ-द-रिव्हर’ प्रकारातील प्रकल्प आहे. म्हणजेच नदीच्या नैसर्गिक प्रवाहाचा उपयोग करून वीज निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी अलकनंदा नदीतील सुमारे 237 मीटरच्या जलपातळीतील फरकाचा उपयोग केला जाणार आहे. हा प्रकल्प ऋषिकेशपासून सुमारे 225 किलोमीटर अंतरावर असून, राष्ट्रीय महामार्ग-58 जवळ आहे. THDC इंडिया लिमिटेड या प्रकल्पाची उभारणी करत आहे. प्रकल्पातील बोगद्यांच्या बांधकाम सुरू आहे.
किती क्षमतेचा प्रकल्प ?
या प्रकल्पाची एकूण क्षमता 444 मेगावॅट आहे. त्यासाठी 111 मेगावॅट क्षमतेची 4 युनिट्स उभारली जाणार आहेत. प्रकल्प 2028च्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
तीन प्रमुख भागांमध्ये विभागला आहे प्रकल्प
उत्तराखंडमधील हा महत्त्वाचा जलविद्युत प्रकल्प मुख्यतः तीन प्रमुख भागांमध्ये विभागण्यात आला आहे.
1) डायव्हर्जन डॅम-अलकनंदा नदीचे पाणी वळवण्यासाठी सुमारे 65 मीटर उंच काँक्रीट डायव्हर्जन डॅम उभारला जाणार आहे.
2. हेड रेस टनल-पाण्याला टर्बाइनपर्यंत पोहोचवण्यासाठी सुमारे 13.4 किलोमीटर लांबीचा हेड रेस बोगदा बांधण्यात येत आहे.
3. टेल रेस टनल-वीज निर्मितीनंतर पाणी पुन्हा नदीत सोडण्यासाठी सुमारे 3 किलोमीटर लांबीचा टेल रेस बोगदा तयार केला जात आहे. याच बोगद्यात 13 ऑगस्ट रोजी दुर्घटना घडली आहे.
प्रकल्प कधीपर्यंत पूर्ण होणार? प्रकल्पाच्या वेळापत्रकानुसार, 2028च्या अखेरपर्यंत संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्रकल्पातील पहिली युनिट 2027मध्ये तयार होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर चौथी आणि अंतिम युनिट 2028च्या अखेरपर्यंत पूर्ण होण्याचे लक्ष्य आहे. या प्रकल्पात एकूण 4 युनिट्स असून प्रत्येक युनिटची क्षमता 111 मेगावॅट आहे.
स्थानिकांसह आसपासच्या राज्यांना होणार फायदा
विष्णुगाड-पीपलकोटी जलविद्युत प्रकल्पाचा फायदा केवळ उत्तराखंडलाच नव्हे, तर आसपासच्या राज्यांनाही होण्याची शक्यता आहे.
प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर 95 टक्के प्लांट लोड फॅक्टरवर दरवर्षी सुमारे 1,657.09 दशलक्ष युनिट वीज निर्मिती होण्याचा अंदाज आहे. प्रकल्प सुरू झाल्यानंतर विशेषतः वीजेची मागणी वाढणाऱ्या पीक अवर्समध्ये उत्तराखंड आणि आसपासच्या राज्यांना मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे वीजटंचाई आणि वीजकपात कमी होण्याची शक्यता आहे.
