Paschim Banga : पश्चिम बंगालचे नाव ‘पश्चिम बंगा’ करणार; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची घोषणा

Paschim Banga : पश्चिम बंगालचे नाव बदलले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी दिली आहे. या साठी पश्चिम बंगाल विधानसभेत

Paschim Banga

Paschim Banga

Paschim Banga : पश्चिम बंगालचे नाव बदलले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी दिली आहे. या साठी पश्चिम बंगाल विधानसभेत 9 डिसेंबर रोजी प्रस्ताव मांडले जाणार आहे. राज्याचे नाव बदलून ‘पश्चिम बंगा’ (Paschim Banga) असे केले जाणार आहे. इंग्रजीमध्येही हे नाव ‘Paschim Banga’ असेच लिहिले जाईल अशी माहिती सुवेंदू अधिकारी यांनी दिली.

सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी सांगितले की, 9 डिसेंबर रोजी विधानसभेत यासंदर्भातील एक ठराव मांडला जाईल. हा ठराव मंजूर झाल्यानंतर तो भारत सरकारकडे (Government of India) पाठवला जाईल आणि त्यानंतर संसदेत सादर केला जाईल. मंत्रिमंडळाने आजच याला मंजुरी दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.

4 डिसेंबरपासून अधिवेशन

पश्चिम बंगाल विधानसभेचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) 4 डिसेंबरपासून सुरू होणार असून ते 14 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. 9 डिसेंबर रोजी हा ठराव मांडला जाईल, असे सुवेंदू अधिकारी यांनी सूचित केले आहे. याआधी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष शामिक भट्टाचार्य यांनी संकेत दिले होते की, राज्य सरकार राज्याचे नाव बदलून ‘पश्चिम बंगा’ करू शकते आणि लवकरच विधानसभेत यासंबंधीचा अधिकृत प्रस्ताव मांडला जाईल.

ममता सरकारने ‘बांग्ला’ दिला होता नावाचा प्रस्ताव  

पश्चिम बंगालचे नाव बदलण्याचा मुद्दा काही काळापासून चर्चेत आहे. ममता बॅनर्जी मुख्यमंत्री असताना, त्यांच्या सरकारने राज्याचे नाव बदलून ‘बांग्ला’ (Bangla) करण्याचा प्रस्ताव दिला होता. इंग्रजीमध्ये ‘West Bengal’ हे नाव ‘W’ या अक्षराने सुरू होते, ज्यामुळे वर्णक्रमानुसार (alphabetically) लावलेल्या कोणत्याही यादीत ते अगदी तळाला येते. यामुळे प्रशासकीय अडचणी निर्माण होत असल्याचे अनेकदा निदर्शनास आणून देण्यात आले होते.

नाव बदलण्यामागचे कारण काय?

ममता बॅनर्जी यांनी राज्याचे नाव बदलून ‘बांग्ला’ करण्याचा प्रयत्न केला होता. विधानसभेत यासंबंधीचा ठराव मंजूर करून तो केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता, परंतु त्याला मंजुरी मिळाली नाही. आता प्रशासनाने राज्याचे नाव बदलून ‘पश्चिम बंगा’ (Paschim Banga) करण्याचा निर्णय घेतला आहे, जे इंग्रजीमध्ये ‘P’ या अक्षराने सुरू होते. सोमवारी ‘नबान्न’ (Nabanna) येथे झालेल्या बैठकीत या नवीन नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बैठकीनंतर सुवेंदू अधिकारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.

Exit mobile version