समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता द्यायला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. 11 मे रोजी न्यायालयाने सुमारे 10 दिवस चाललेल्या सुनावणीनंतर या प्रकरणावरील निर्णय राखून ठेवला होता. जगातील 33 देशांमध्ये समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता असून, भारतातही याला मान्यता देण्याची मागणी केली जात होती. याबाबत अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर सुनावणी पार पडल्यानंतर आज (दि. 17) सर्व बाबींचा सखोल विचार करत वरील निकाल देण्यात आला आहे. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत तीन विरूद्ध दोन असा हा निकाल देण्यात आला आहे. (What is the LGBTQ+ community? Who exactly is in this?)
दरम्यान, या प्रकरणामुळे आता LGBTQ+ समुदाय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्या पार्श्वभूमीवर यात नेमके कोण कोण असते, ते जाणून घेऊया.
L – लेस्बियन : स्त्रीला केवळ स्त्रीचे आकर्षण वाटणे. म्हणजेच यामध्ये दोन्ही जोडीदार महिला असतात.
G – गे : एखादा पुरुष दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित होणे. म्हणजेच यामध्ये दोन्ही जोडीदार पुरुषच असतात.
B – बायसेक्शुअल : एखाद्या व्यक्तीला भिन्न आणि समान लिंग या दोन्ही प्रकारच्या व्यक्तींचे आकर्षण वाटते. स्त्री आणि पुरुष दोघेही ‘बायसेक्शुअल’ असू शकतात.
T – ट्रान्सजेंडर : एखाद्या व्यक्तीचे जन्माला येताना जे लिंग असते, त्याच्यापेक्षा तिच्या भावना पूर्णपणे विरुद्ध असणे. उदा. एखादा पुरुष जन्माला आला असेल पण काही काळानंतर तो मनाने आणि वागण्याने मुली, महिलेसारखे असल्याचे स्पष्ट होते. यात अनेकदा काही जण शस्त्रक्रिया करून लिंगबदल करुन घेतात आणि हॉर्मोन्स थेरपीही घेतात.
Q – क्विअर : या गटातील व्यक्तींना आपल्या ओळखीबद्दल आणि शारीरिक इच्छेबद्दल संभ्रम असतो, प्रश्न असतो. या व्यक्ती स्वतःला पुरुष, स्त्री किंवा ट्रान्सजेंडर किंवा लेस्बियन, गे किंवा बायसेक्शुअलही मानत नाहीत.
LGBTQ (+) :
LGBTQ सोबत प्लस चिन्ह जोडण्यात आले आहे. यामध्ये पॅनसेक्शुअल, पॉलीमोरस, डेमिसेक्शुअल यांसह इतर अनेक गटांचा समावेश आहे.
इंटरसेक्स : नेमके कोणते लिंग आहे हे ठामपणे सांगता न येणे. अशा प्रकारातील लोक स्त्री किंवा पुरुषासारखे दिसतात, परंतु त्यांचे प्रजननासाठीचे अवयव त्यांच्या लिंगाशी जुळत नाहीत.
असेक्शुअल – या व्यक्तींना लैंगिक संबंध ठेवण्यात निसर्गत:च रस नसतो.
पॉलीअॅमोर – याचा अर्थ एकाहून जास्त जणांवर प्रेम असणे, लैंगिक संबंध असणे आणि त्यास मान्यता असणे. एखाद्या लग्न झालेल्या जोडप्याचे किंवा कोणत्याही एकत्र राहणाऱ्या जोडप्याचे एकमेकांशी संबंध असतातच. पण त्या दोघांचे किंवा दोघांपैकी एकाचे एकापेक्षा जास्त लैंगिक जोडीदार असतात. त्याबाबत संबंधित सर्व जोडीदारांना याबाबत कल्पना आणि मान्यता असते.
पॅनसेक्शुअल – समान लिंग असणाऱ्या आणि भिन्न लिंग असणाऱ्या व्यक्तींसोबतच तृतीयपंथी, समलिंगी यांच्याविषयीचेही आकर्षण असते.
डेमीसेक्शुअल – डेमी म्हणजे अर्धा. डेमीसेक्शुअल व्यक्तींना कोणाशीही लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यापूर्वी त्या व्यक्तीशी तीव्र भावनिक जवळीक होणे आवश्यक असते. त्याशिवाय ते कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवत नाहीत.
ऑटोसेक्शुअल – या व्यक्तींना स्वत:च्याच शरीराचे आकर्षण असते. स्वत:ला आरशात बघून या व्यक्ती स्वत:च्या विवस्त्र प्रतिमेची कल्पना करतात.
ग्रे – या व्यक्तींना ठराविक प्रसंगी लैंगिक संबंधांची इच्छा होते; पण काही वेळा तशी इच्छा नसते.
अलाय : ही संज्ञा LGBTQI व्यक्तींचे सहकारी किंवा मित्र म्हणून त्यांच्या हक्कांसाठी बोलणाऱ्या व्यक्तींसाठी वापरली जाते. अनेकदा या व्यक्ती त्या समुदायाच्या नसतात.