परदेशात जाताना सिम कार्डची कटकट संपणार; WhatsApp वरूनच मिळणार eSIM

WhatsApp eSIM नवीन eSIM साठी फोनमधील जुने SIM काढण्याची गरज नाही, ज्या देशात जाणार त्या देशासाठीचा डेटा प्लॅन थेट अ‍ॅपमधून निवडता येईल.

WhatsApp eSIM

WhatsApp eSIM

WhatsApp Users Buy International eSIM Data Plans How? : परदेशात फिरायला जायचं म्हटलं की, तिथे इंटरनेट कसं वापरायचं, स्थानिक SIM कुठे मिळेल किंवा महागडं इंटरनॅशनल रोमिंग रिचार्ज करावं लागेल का, असे अनेक प्रश्न पडतात. मात्र, आता या त्रासातून लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे. कारण लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp एका नव्या फीचरवर काम करत आहे. या फीचरमुळे परदेशासाठी लागणारा eSIM डेटा प्लॅन थेट WhatsApp वरूनच खरेदी आणि इन्स्टॉल करता येऊ शकणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी विमानतळावर SIM कार्ड शोधण्याचीही गरज भासणार नाही. नेमकं काय आहे हे नवीन फीचर आणि ते कसं काम करणार? जाणून घेऊया.

WhatsApp वरूनच खरेदी करता येणार eSIM

WhatsApp आपल्या युजर्ससाठी ट्रॅव्हल eSIM ही सुविधा आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी कंपनी विविध eSIM सेवा पुरवणाऱ्या कंपन्या आणि टेलिकॉम ऑपरेटर्ससोबत भागीदारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये रिलायन्स जिओ, स्मार्ट अ‍ॅक्सियाटा, स्मार्ट कम्युनिकेशन्स आणि Verizon यांसारख्या कंपन्यांची नावे चर्चेत आहेत. तसेच WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp 1Global सोबतही या सुविधेवर काम करत आहे. या फीचरच्या माध्यमातून युजर्सना परदेशात जाण्यापूर्वीच इंटरनेट डेटा प्लॅन खरेदी करता येऊ शकतो. म्हणजेच, ज्या देशात प्रवास करायचा आहे, त्या देशासाठीचा डेटा प्लॅन थेट अ‍ॅपमधून निवडता येईल.

कसं काम करणार WhatsApp चं eSIM फीचर?

या सुविधेचा वापर करण्यासाठी युजर्सना WhatsApp मध्ये प्रवासाच्या ठिकाणाचे नाव शोधावे लागेल. त्यानंतर संबंधित देशासाठी उपलब्ध असलेले eSIM डेटा प्लॅन्स दिसू शकतात. यामध्ये मर्यादित डेटा, अनलिमिटेड डेटा तसेच ग्लोबल डेटा प्लॅनचे पर्याय मिळण्याची शक्यता आहे. आपल्या इंटरनेट वापरानुसार युजर्सना योग्य प्लॅन निवडता येईल. प्लॅन खरेदी केल्यानंतर तो थेट फोनमध्ये इन्स्टॉल करण्याची सुविधा मिळू शकते. त्यामुळे वेगळ्या अ‍ॅपचा वापर करण्याची किंवा स्थानिक SIM कार्ड खरेदी करण्याची गरज कमी होईल.

जुना मोबाइल नंबरही सुरू राहणार

या फीचरची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, नवीन eSIM वापरण्यासाठी फोनमधील जुने SIM कार्ड काढण्याची गरज भासणार नाही. म्हणजेच, तुमचा मूळ मोबाइल नंबर सुरू ठेवून तुम्ही परदेशातील इंटरनेट सेवाही वापरू शकाल. समजा तुम्ही भारतातून दुबईला प्रवास करत असाल, तर तुमचे भारतीय SIM कार्ड फोनमध्ये सुरू ठेवून दुबईसाठीचा eSIM डेटा प्लॅन वापरता येऊ शकतो. त्यामुळे जुन्या नंबरवर येणारे कॉल आणि मेसेज मिळवण्याची सुविधाही कायम ठेवता येईल. मात्र, यासाठी मूळ SIM चे रोमिंग आणि ऑपरेटरचे शुल्क लागू होऊ शकते.

परदेशात पोहोचल्यानंतरच डेटा प्लॅन होणार ॲक्टिव्ह?

समोर आलेल्या माहितीनुसार, युजर्सने आधीच eSIM खरेदी करून इन्स्टॉल केलेली असेल, तरी संबंधित देशातील नेटवर्कशी फोन कनेक्ट झाल्यानंतरच डेटा प्लॅन सक्रिय होऊ शकतो. त्यामुळे प्रवास सुरू होण्यापूर्वीच प्लॅन खरेदी करून ठेवता येईल आणि परदेशात पोहोचल्यानंतर इंटरनेट वापरणे शक्य होईल.

डेटा किती शिल्लक आहे, हेही कळणार

केवळ eSIM खरेदी करण्याचीच नाही, तर डेटा वापरावर लक्ष ठेवण्याची सुविधाही WhatsApp मध्ये मिळू शकते. युजर्सना किती डेटा वापरला, किती शिल्लक आहे आणि प्लॅन कधी संपणार आहे, याची माहिती मिळण्याची शक्यता आहे. डेटा संपण्याच्या आधी अलर्ट किंवा नोटिफिकेशनही मिळू शकते.

WhatsApp चे eSIM फीचर कधी लॉन्च होणार?

सध्या हे फीचर विकसित करण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात असल्याची माहिती आहे. WhatsApp च्या Android बीटा व्हर्जन 2.26.47.4 मध्ये या फीचरची झलक दिसल्याचे WABetaInfo ने म्हटले आहे. तसेच दुसऱ्या रिपोर्टमध्ये 2.26.47.10 या व्हर्जनच्या कोडमध्येही ट्रॅव्हल eSIM संदर्भातील संकेत मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, कंपनीने अद्याप या फीचरच्या अधिकृत लॉन्चची तारीख जाहीर केलेली नाही. तसेच कोणत्या देशांमध्ये ही सुविधा सुरुवातीला उपलब्ध होईल, याबाबतही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. यासाठी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे तुमचा स्मार्टफोन eSIM सपोर्ट करणारा असणे आवश्यक आहे.

WhatsApp चे हे फीचर प्रत्यक्षात उपलब्ध झाल्यास परदेशात प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी सोय ठरू शकते. विमानतळावर SIM कार्ड शोधण्याची धावपळ कमी होईल आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळवणे अधिक सोपे होऊ शकते. मात्र, फीचर लॉन्च होईपर्यंत त्याच्या प्लॅन्स, किंमती आणि उपलब्धतेबाबत अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Exit mobile version