Why Monsoon Enter Through Kerala In India : देशात उन्हाच्या लाटेने जनता हैराण झालेली असतानाच मान्सूनने केरळच्या किनारपट्टीवर धडक दिली आहे. मान्सून म्हणजे केवळ पावसाचा एक दिवस नाही, तर ती वाऱ्याच्या दिशेत होणाऱ्या बदलाची एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. पण मान्सून सर्वात आधी केरळमध्येच का येतो? आणि हा पावसाचा खेळ नेमका कसा चालतो? तसेच भारतात किती प्रकारचे मान्सून आहेत त्याबद्दस सोप्या भाषेत समजून घेऊया…
केरळमध्येच मान्सून सर्वात आधी का पोहोचतो?
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, भारत देश एवढा आवाढव्य आहे मग, मान्सून सर्वात आधी केरळमध्येच का पोहोचतो तर, मान्सूनच्या प्रवासाचा मार्ग भौगोलिक स्थितीवर अवलंबून असतो. यामागे काही प्रमुख कारणे आहेत. केरळ हे अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर वसलेले पहिले मोठे राज्य आहे. अरबी समुद्राकडून येणारी मान्सूनची शाखा सर्वात आधी केरळच्या किनारपट्टीला धडकते. याशिवाय केरळच्या मागे ‘पश्चिमी घाट’ (Western Ghats) आहेत. समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे जेव्हा या उंच पर्वतरांगांना धडकतात, तेव्हा त्यांना वर जावे लागते. उंचावर गेल्यावर हवा थंड होते आणि त्याचे ढगात रूपांतर होऊन जोरदार पाऊस पडतो. यानंतर मान्सूनचा मुख्य प्रवाह दक्षिण भारतात प्रथम संघटित होतो आणि तिथूनच तो पुढे उत्तरेकडे सरण्यास सुरूवात करतो.
भारतात किती प्रकारचे मान्सून?
आपल्या देशात मान्सूनचे प्रामुख्याने दक्षिण-पश्चिम मान्सून आणि उत्तर-पूर्व म्हणजेच परतीचा मान्सून असे दोन प्रकार आहेत. दक्षिण-पश्चिम मान्सून जो जून ते सप्टेंबर दरम्यान पडतो हा देशातील पावसाचा मुख्य हंगाम आहे. ही शाखा केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीवर पाऊस पाडते. तर, बंगालच्या उपसागराची शाखा ईशान्य भारत आणि ओडिशेकडून पुढे सरकून संपूर्ण देशात पाऊस पसरवते. तर, उत्तर-पूर्व मान्सून म्हणजेच परतीचा मान्सून जो ऑक्टोबर ते डिसेंबर पडतो याला ‘रिट्रीटिंग मान्सून’ म्हणतात. हा प्रामुख्याने तमिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर पाऊस देतो.
मान्सूनचा ‘दबाव’ कसा बनतो?
पावसाची संपूर्ण गणिती प्रक्रिया ‘हवामानातील दाबाच्या फरकावर’ अवलंबून असते. एप्रिल-मे महिन्यात उत्तर भारत आणि गंगेच्या मैदानी भागात प्रचंड उष्णता असते. उष्णतेमुळे जमिनीवरील हवा गरम होऊन हलकी होते आणि वरच्या दिशेला जाते. परिणामी, तिथे ‘कमी दाबाचा पट्टा’ निर्माण होतो. याउलट, समुद्र उशिरा तापतो, त्यामुळे तिथे हवा थंड असते आणि तिथे ‘उच्च दाबाचा पट्टा’ तयार होतो. निसर्गाचा नियम आहे की हवा नेहमी उच्च दाबाकडून कमी दाबाकडे वाहते. त्यामुळे, समुद्रातील बाष्पयुक्त वारे भारतीय भूभागाकडे वेगाने धाव घेतात. दक्षिणेकडून येणारे वारे जेव्हा भूमध्य रेषा ओलांडतात, तेव्हा पृथ्वीच्या परिवलनामुळे त्यांची दिशा बदलून ते ‘दक्षिण-पश्चिम’ मान्सूनचे वारे बनतात.
