Cyclone Arnab : चक्रीवादळाला ‘अर्णब’ नाव का देण्यात आले ?

Cyclone Arnab: अधिकृत चक्रीवादळ नामकरण यादीत ‘अर्णब’ या बंगाली शब्दाचा अर्थ ‘महासागर’ किंवा ‘समुद्र’ असा दिला जातो.

Aranab Cyclone

Aranab Cyclone

Cyclone Arnab: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘अर्णब’ (Arnab) चक्रीवादळ अधिक तीव्र झाली आहे. हे चक्रीवादळाचे रुपांतर ‘अतितीव्र चक्रीवादळा’त होत आहे. त्यामुळे किनारपट्टीच्या भागात वादळ, वारा, मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. बुधवारी हे चक्रीवादळ भारताच्या पूर्व किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केला आहे. चक्रीवादळाला नाव कोण देतं? त्यासाठी नेमकी कोणती प्रक्रिया अवलंबली जाते? तसेच, एखाद्या चक्रीवादळाचे नाव कसे निश्चित केले जाते? हे जाणून घेऊया…

अर्णब नाव कोणी सुचविले ?

‘अर्णब’ हे नाव बांगलादेशने सुचवले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अधिकृत चक्रीवादळ नामकरण यादीत ‘अर्णब’ या बंगाली शब्दाचा अर्थ ‘महासागर’ किंवा ‘समुद्र’ असा दिला जातो. मात्र, हवामानशास्त्रज्ञांच्या मते, चक्रीवादळाचे नाव आणि त्याची तीव्रता, दिशा किंवा ते कोणत्या देशाच्या किनारपट्टीवर धडकणार आहे, यांचा थेट संबंध नसतो. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नियमांनुसार, उत्तर हिंदी महासागर क्षेत्रासाठी तयार करण्यात आलेल्या पूर्वनिश्चित यादीतील पुढील उपलब्ध नाव चक्रीवादळाला दिले जाते. या यादीत बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील चक्रीवादळांसाठीची नावे समाविष्ट आहेत. त्यामुळे ‘अर्णब’ हे नाव बांगलादेशने सुचवले असले, तरी या वादळाचा संभाव्य मार्ग आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीच्या दिशेने आहे.


मराठवाडा पदवीधर निवडणुकीत चुरस वाढली, चव्हाण-पाटील यांच्यात अटीतटीची लढत

चक्रीवादळांची नावे कशी ठेवली जातात?
जागतिक हवामान संघटनेच्या (WMO) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जगभरातील उष्णकटिबंधीय चक्रीवादळांना प्रादेशिक विशेषीकृत हवामान केंद्रे (RSMC) आणि उष्णकटिबंधीय चक्रीवादळ इशारा केंद्रे (TCWC) यांच्यामार्फत नावे दिली जातात. उत्तर हिंदी महासागर क्षेत्रासाठी ही जबाबदारी नवी दिल्लीस्थित भारतीय हवामानशास्त्र विभागाकडे आहे. जागतिक हवामान संघटनेने या क्षेत्रासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाला प्रादेशिक विशेषीकृत हवामान केंद्र म्हणून जबाबदारी दिली आहे. समुद्रात निर्माण होणाऱ्या प्रत्येक हवामान प्रणालीला लगेच नाव दिले जात नाही. त्यासाठी वाऱ्याचा वेग ठरावीक मर्यादेपर्यंत पोहोचणे आवश्यक असते.


तुमची गँगस्टरने हत्या केली, तर कुटुंबाला विम्याचे पैसे मिळतील का?; आयोगाचा निकाल अन् नियम काय?

वाऱ्याचा वेग किती असावा?
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या निकषांनुसार, एखाद्या हवामान प्रणालीच्या पृष्ठभागाजवळील कमाल सातत्यपूर्ण वाऱ्याचा वेग किमान 34 नॉट्स म्हणजेच सुमारे 62 किलोमीटर प्रतितास झाल्यानंतर तिला ‘चक्रीवादळ’ म्हणून वर्गीकृत करून नाव दिले जाते.

चक्रीवादळांच्या नामकरणाची प्रक्रिया कशी चालते? उत्तर हिंदी महासागर क्षेत्रातील चक्रीवादळांना नावे देण्याची औपचारिक प्रक्रिया सप्टेंबर 2004 मध्ये सुरू झालीय. एप्रिल 2020 मध्ये केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, जागतिक हवामान संघटना आणि संयुक्त राष्ट्रांच्या आशिया-पॅसिफिक आर्थिक व सामाजिक आयोगाच्या उष्णकटिबंधीय चक्रीवादळांवरील समितीने या प्रक्रियेत सहभागी देशांची संख्या वाढवून 13 केली. बांगलादेश, भारत, इराण, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, कतार, सौदी अरेबिया, श्रीलंका, थायलंड, संयुक्त अरब अमिराती, येमेन या देशांचा समावेश आहे. या प्रत्येक देशाने चक्रीवादळांसाठी प्रत्येकी 13 नावे सुचवली. त्यानुसार एकूण 169 नावांची एकत्रित यादी तयार करण्यात आली. ही नावे सहभागी देशांच्या वर्णक्रमानुसार आणि निश्चित क्रमाने मांडण्यात आली आहेत. त्यानंतर चक्रीवादळांना या यादीतील नावे क्रमाने दिली जातात.


चक्रीवादळांची नावे ठेवताना कोणते नियम पाळले जातात?

चक्रीवादळांसाठी नावे सुचवताना जागतिक हवामान संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक असते. नाव लहान आणि सोपे असावे. नावात जास्तीत जास्त आठ अक्षरे असावीत. नावाचा उच्चार सहज करता यावा. नावामुळे कोणत्याही धर्माच्या, राजकीय गटाच्या किंवा सांस्कृतिक समुदायाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत. नाव तटस्थ असावे आणि त्याचा वापर सार्वजनिक इशारे देताना सहज करता यावा. या नियमांमुळे विविध देशांमध्ये चक्रीवादळांची माहिती देताना नावांचा वापर सहज होतो.


उत्तर हिंदी महासागरातील चक्रीवादळांची नावे पुन्हा वापरली जातात का?

अटलांटिक महासागरातील चक्रीवादळांच्या नामकरण पद्धतीमध्ये अत्यंत विनाशकारी वादळांची नावे यादीतून कायमची वगळली जाऊ शकतात. इतर नावे ठरावीक कालावधीनंतर पुन्हा वापरली जाऊ शकतात. उत्तर हिंदी महासागर क्षेत्रातील नामकरण प्रक्रियेत मात्र वापरलेल्या नावाचा पुन्हा वापर केला जात नाही. एखाद्या चक्रीवादळासाठी नाव वापरल्यानंतर ते यादीतून वगळले जाते. त्यामुळे प्रत्येक नव्या चक्रीवादळासाठी यादीतील पुढील उपलब्ध नाव वापरले जाते.


चक्रीवादळांना नावे देण्याची गरज काय?

चक्रीवादळांना विशिष्ट नावे देण्यामागे आपत्ती व्यवस्थापन आणि जनजागृती ही महत्त्वाची कारणे आहेत. समुद्रात एकाच वेळी अनेक हवामान प्रणाली विकसित झाल्यास त्यांची तांत्रिक माहिती किंवा भौगोलिक निर्देशांक वापरून ओळख पटवणे सामान्य नागरिकांसाठी कठीण होऊ शकते. अशा वेळी चक्रीवादळाचे स्वतंत्र नाव वापरल्याने त्यासंबंधीची माहिती सहज समजते.

Exit mobile version