विशेष विश्लेषण : ‘कॉक्रोच जनता पार्टी’ भारतात नेपाळ-बांग्लादेश सारखी क्रांती घडवू शकेल का?

Cockroach Janta Party नेपाळमध्ये 2025 मध्ये 'Gen Z' तरुणांच्या तीव्र आंदोलनानंतर तत्कालीन PM के. पी. शर्मा ओलींनी राजीनामा द्यावा लागला होता.

विशेष विश्लेषण : 'कॉक्रोच जनता पार्टी' भारतात नेपाळ-बांग्लादेश सारखी क्रांती घडवू शकेल का?

विशेष विश्लेषण : 'कॉक्रोच जनता पार्टी' भारतात नेपाळ-बांग्लादेश सारखी क्रांती घडवू शकेल का?

Will Cockroach Janta Party Protest like Bangladesh Nepal Gen Z in India? : नेपाळ आणि बांगलादेशमध्ये अवघ्या काही महिन्यांपूर्वी तरुण आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत तिथली प्रस्थापित सरकारं उलथवून लावली. सोशल मीडियावरून सुरू झालेल्या एका ठिणगीने शेजारील देशांमध्ये सत्तांतराचा इतिहास लिहिला. आता नेमका तसाच काहीसा पॅटर्न भारतात ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या (CJP) रूपाने उदयास येत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

नेपाळमध्ये 2025 मध्ये झालेल्या ‘Gen Z’ तरुणांच्या तीव्र आंदोलनानंतर तिथले तत्कालीन पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर तिथे बदल झाला. आता भारतातही ‘CJP’ च्या माध्यमातून तरुण एकत्र येत असल्याने, “भारतात नेपाळ किंवा बांगलादेशसारखे परिवर्तन होणार का?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अवघ्या 5 दिवसांत 1 कोटीहून अधिक फॉलोअर्सचा टप्पा पार करणाऱ्या या ‘डिजिटल आर्मी’मध्ये नेपाळसारखं राजकीय परिवर्तन घडवण्याची ताकद आहे का? की ही केवळ एक सोशल मीडिया लाट आहे? यावर स्वतः पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके आणि राजकीय विश्लेषकांनी सर्व पैलू समोर ठेवले आहेत.

Cockroach : सोशल मीडियावर ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची हवा पण, खऱ्या झुरळाची नेमकी स्टोरी काय?

नेपाळ आणि बांगलादेशमध्ये काय घडलेलं?

आता सगळ्यात पहिले तर, भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या नेपाळ आणि बांग्लादेशात नेमकं काय घडलं होतं ते जाणून घेऊया.. तर, सप्टेंबर 2025 मध्ये प्रामुख्याने GenZ विद्यार्थ्यांनी आयोजित केलेली मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचारविरोधी आंदोलने संपूर्ण नेपाळमध्ये झाली. परिस्थिती चिघळली आणि देशभरात सार्वजनिक अधिकाऱ्यांविरुद्ध निदर्शने तसेच सरकारी आणि राजकीय इमारतींची तोडफोड झाली. 9 सप्टेंबर2025 रोजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी काही सरकारी मंत्र्यांसह राजीनामा दिला. मार्च महिन्यात नेपाळमध्ये माजी रॅपर बलेंद्र शाह यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार सत्तेवर आले.

दुसरीकडे भारताचा दुसरा शेजारी राष्ट्र बांग्लादेशात ऑगस्ट 2024 मध्ये सरकारी नोकरी आणि आरक्षण प्रणालीविरोधात आंदोलने सुरू झाली यात अधिकाऱ्यांनी केलेल्या कठोर कारवाईनंतर त्याचे देशव्यापी अशांततेत रूपांतर झाले. अखेर पंतप्रधान शेख हसीना यांच्या 15 वर्षांच्या राजवटीतील सर्वात हिंसक टप्प्यांपैकी ठरलेल्या या आंदोलनात जवळपास 300 लोक मारले गेले. त्यानंतर हसीना यांनी देश सोडला आणि सध्याच्या घडीला बांग्लादेशमध्ये तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आले.

तुमचं भविष्य उद्ध्वस्त केल्याने भाजपला अनफॉलो करा; कॉकरोच पार्टीचे संस्थापक भाजपवर भडकले

नेपाळ-बांग्लादेश सारखे परिवर्तन घडवणे ‘CJP’ ला शक्य आहे का?

आता नेपाळ आणि बांग्लादेशासारखं आंदोलन करणं आणि सत्ताधाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणं भारतातील GenZ ना शक्य आहे का? आणि त्यामागची कारणं कोणती तर, भारतात सध्या पदवीधरांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण अंदाजे 29% च्या वर आहे. त्यातच ‘NEET’ आणि इतर परीक्षांच्या पेपरफुटीमुळे तरुणांमध्ये व्यवस्थेविरुद्ध प्रचंड राग आहे. हाच राग ‘CJP’ च्या माध्यमातून बाहेर पडत आहे. दुसरं म्हणजेच आजचा तरुण पारंपारिक राजकारण, जात-पात आणि धार्मिक वादाला कंटाळला आहे. ‘CJP’ चा ‘सेक्युलर, सोशालिस्ट, डेमॉक्रॅटिक आणि लेझी’ हा अजेंडा या तरुणांना आकर्षित करत आहे. त्याशिवाय अवघ्या 5 दिवसांत कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचण्याची ताकद या चळवळीने दाखवली आहे. सोशल मीडियाच्या जोरावर जनमत बदलणे आजच्या काळात अशक्य नाही.

‘कॉकरोच जनता पार्टी’चा धुमाकूळ! सरन्यायाधीशांनी ‘झुरळ’ म्हटलं अन् मराठी तरुणाने थेट पक्षच काढला

नेपाळ-बांग्लादेश सारखं परिवर्तन घडवण्यात मर्यादा

नेपाळ आणि बांग्लादेशसारखं आंदोलन करणं आणि त्या मागची कारणं आपण समजून घेतली. पण अशाप्रकारचं तीव्र आंदोलन करून सत्ता उलथवून ठाकण्यात कॉक्रोच जनता पार्टीसमोर काही मर्यादा आहेत. यात प्रमुख कारण म्हणजे नेपाळ किंवा बांग्लादेश हे भौगोलिकदृष्ट्या लहान देश आहेत, तिथे एका शहरात उदा. काठमांडू किंवा ढाका येथे सुरू झालेले आंदोलन संपूर्ण देशाची सत्ता हलवू शकते. पण, दोन्ही देशांच्या तुलनेत भारत हा प्रचंड मोठा आणि विविधतेने नटलेला देश आहे. इथे केवळ ‘डिजिटल’ लाटेच्या जोरावर प्रत्यक्ष निवडणुकीत बदल घडवणे अत्यंत कठीण आहे.

दुसरं म्हणजे ‘CJP’ ही सध्या केवळ एक ‘डिजिटल चळवळ’ किंवा ‘मेम पॅटर्न’ आहे. निवडणूक लढवण्यासाठी गावपातळीवर कार्यकर्त्यांचे जाळे, निधी आणि मजबूत निवडणूक यंत्रणा लागते, जी सध्या या पक्षाकडे नाही. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनेक तरुण सुरू करण्यात आलेल्या या पक्षाशी केवळ मजा किंवा ट्रेंड म्हणून जोडले गेले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर एखाद्या पक्षाला फॉलो करणे आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी घराबाहेर पडून मतदान करणे, यामध्ये खूप मोठा फरक आहे.

“भारतातील तरुणांना कमी लेखू नका”

हे सर्व झाले आंदोलन करता येईल का? त्या करण्यामागे नेमक्या मर्यादा काय? याबाबत तुम्हाला पडलेल्या या सर्व प्रश्नांबाबत कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी स्वतः भाष्य केले आहे. याबाबत त्यांनी सोशस मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी नेपाळ आणि बांग्लादेशमधील आंदोलनांशी होत असलेल्या तुलनेवर अत्यंत परिपक्व भूमिका मांडली आहे.

ते म्हणाले की, मला अनेक पत्रकार विचारत आहेत की, नेपाळ किंवा बांगलादेशमध्ये जे घडले, तशी या GenZ चळवळीची परिणती होईल का? त्यावर दिपके यांनी मी एक गोष्ट अगदी स्पष्ट करू इच्छितो, अशी तुलना करून भारतातील ‘Gen Z’ चा अपमान करू नका किंवा त्यांना कमी लेखू नका. या देशातील तरुण अत्यंत प्रगल्भ, जागरूक आणि राजकीयदृष्ट्या सुज्ञ आहेत. ते आपले घटनात्मक अधिकार चांगल्या प्रकारे समजतात आणि त्यांचा निषेध हा नेहमी शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गानेच असेल असे दिपके यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता कॉक्रोच जनता पार्टी नेपाळप्रमाणे थेट रस्त्यावर उतरून हिंसक क्रांती किंवा सरकार उलथवून लावणार नाही, हे त्यांच्या भूमिकेवरून स्पष्ट आहे. मात्र, ही चळवळ भारतातील तरुण मतदारांना जागृत करण्याचे काम नक्कीच करत आहे. 2029 च्या निवडणुकीत हा ‘कॉक्रोच फॅक्टर’ प्रस्थापित राजकीय पक्षांना तरुणांच्या बेरोजगारी आणि पेपरफुटीसारख्या मूळ मुद्द्यांवर बोलण्यास भाग पाडेल, यात शंका नाही.

Exit mobile version