रात्री 9 ते 10 गाडी चालवणं ‘रिस्की; पुरुषांपेक्षा महिलांची ड्रायव्हिंग सरस : रिपोर्ट

Safe Driving भारतात दरवर्षी लाखो रस्ते अपघात होतात. त्यामागे खराब रस्ते, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि निष्काळजीपणे वाहन चालवणे ही कारणे

Road Safety Report On Driving

Road Safety Report On Driving

Road Safety Report On Driving : भारतात दरवर्षी लाखो रस्ते अपघात होतात. त्यामागे खराब रस्ते, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि निष्काळजीपणे वाहन चालवणे ही कारणे असतात. मात्र, दिवसातील कोणत्या वेळेत वाहन चालवणे सर्वाधिक धोकादायक ठरते, याबाबत नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका रोड सेफ्टी रिपोर्टमध्ये महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, महिलांच्या ड्रायव्हिंगबाबत असलेला एक सर्वसाधारण समजही या अहवालाने खोडून काढला आहे.

रात्री 9 ते 10 हा सर्वाधिक धोकादायक काळ

टीव्ही9 हिंदीने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, Zuno General Insurance ने प्रसिद्ध केलेल्या India Road Safety Report (IRSR) 2026 नुसार, भारतात रात्री 9 ते 10 वाजेदरम्यान कार चालवणे सर्वाधिक धोकादायक असल्याचे नमुद केले आहे. रात्री 8 नंतर ड्रायव्हिंग स्कोअरमध्ये लक्षणीय घट दिसून येते. त्यामुळे उशिराच्या वेळेतील प्रवास हा दुपारच्या तुलनेत अधिक जोखमीचा असल्याचे समोर आल्याचा रिपोर्टमध्ये उल्लेख आहे.

सर्वात सुरक्षित वेळ कोणती?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, रात्रीच्यावेळी 8 ते 9 गाडी चालवणं सर्वात धोकादायक आहे तर, मग कार चालण्याची योग्यवेळ कोणती? तर, रिपोर्टनुसार दुपारी 1 ते 2 वाजेदरम्यान वाहन चालवणे तुलनेने सर्वात सुरक्षित मानले गेले आहे. या वेळेत चालकांचा ड्रायव्हिंग स्कोअर सर्वाधिक असल्याचे अभ्यासातून दिसून आले.

55 दशलक्ष किलोमीटरच्या डेटाचा अभ्यास

हा अहवाल Zuno SmartDrive अॅपमधून मिळालेल्या टेलिमॅटिक्स डेटावर आधारित आहे. यामध्ये देशातील 17 राज्यांतील सुमारे 45 लाख ट्रिप आणि 5.5 कोटी (55 दशलक्ष) किलोमीटरच्या ड्रायव्हिंग डेटाचे विश्लेषण करण्यात आले आहे. अभ्यासानुसार, रस्ते अपघातांमध्ये चालकाच्या वर्तनाचा मोठा वाटा आहे. भारतातील 80 टक्क्यांहून अधिक अपघात हे चालकांच्या ड्रायव्हिंग पद्धतीशी संबंधित कारणांमुळे घडतात, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

महिला की पुरुष… कोण चालवते अधिक सुरक्षित?

महिला चांगल्या ड्रायव्हर नसतात, असा समज अनेकदा व्यक्त केला जातो. मात्र, या अभ्यासातील आकडेवारीने वेगळेच चित्र मांडत अनेक वर्षांचा समज मोडित काढला आहे. रिपोर्टनुसार, महिलांचा सरासरी ड्रायव्हिंग स्कोअर 92.86 इतका नोंदवण्यात आला, तर, पुरुषांचा स्कोअर 92.43 इतका होता. दोघांमधील फरक अत्यल्प असला तरी, सुरक्षित ड्रायव्हिंगमध्ये महिलांनी पुरुषांपेक्षा किंचित सरस कामगिरी केल्याचे रिपोर्टमधू समोर आले आहे.

रात्री वाहन चालवताना विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. विशेषतः थकवा, कमी दृश्यमानता, जास्त वेग आणि निष्काळजीपणा यामुळे अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे रात्रीच्या प्रवासात वेगावर नियंत्रण ठेवणे, पुरेशी विश्रांती घेणे आणि वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचा सल्ला नेहमीच तज्ज्ञांकडून दिला जातो. एकूणच काय तर, सुरक्षित ड्रायव्हिंग हे केवळ अनुभवावर नाही, तर योग्य सवयी, सतर्कता आणि शिस्तबद्ध वाहन चालवण्यावर अवलंबून असल्याचे समोर आलेल्या रिपोर्टमधून अधोरेखित झाले आहे.

Exit mobile version