पुणे : राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या जागांसाठीचे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचे उमेदवार अनेक ठिकाणी जाहीर झाले आहेत. अमरावती पदवीधर मतदारसंघातून भाजपने माजी मंत्री आणि विद्यमान आमदार डाॅ. रणजित पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवार देण्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टाळले.
नाशिक पदवीधऱ मतदारसंघातून काॅंग्रेसचे डाॅ. सुधीर तांबे हे विद्यमान आमदार आहेत. काॅंग्रेसतर्फे त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. पण त्यांनी अद्याप अर्ज भरलेला नाही. या जागेवर भाजपकडून विखे कुटुंबातील डाॅ. राजेंद्र विखे यांचे नाव चर्चेत होते. मात्र मतदार नोंदणी आणि इतर बाबींत सक्रिय नसल्याने ते रिंगणात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विखे कुटुंबातील इतर कोणाचे नाव भाजप जाहीर करणार का, याकडे अनेकांचे लक्ष आहे.
मात्र मिळालेल्या माहितीनुसार येथे काॅंग्रेसला मोठा धक्का देण्याच्या तयारीत भाजप असल्याचे सांगण्यात येत आहे. काॅंग्रेसच्या एका बड्या नेत्याचा नातेवाईक असलेल्या युवा नेत्याला विधान परिषदेची उमेदवारी देण्याची तयारीची रणनीती सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोन दिवस शिल्लक असताना काॅंग्रेसच्या उमेदवाराने अद्याप का अर्ज भरला नाही, याकडेही अनेकांनी लक्ष वेधले आहे. काॅंग्रेस संघटनेत चांगली जबाबदारी सांभाळलेल्या या युवा नेत्याला योग्य पदावर संधी मिळाली नसल्याची खंत होती. ती आता भाजप देणार असल्याचे सांगण्यात येते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित युवा नेत्याचे चांगले संबंध आहेत. या नेत्याची आणि फडणवीस यांची दोन दिवसांपूर्वीच भेट झाल्याचे सांगण्यात आले. या युवा नेत्याला भाजपने संधी दिली तर नगर जिल्ह्यातील अनेक राजकीय समीकरणे बदलणार आहेत. त्यामुळे भाजप कोणता डाव टाकणार, याकडे अनेकांचे लक्ष आहे.